प्रगतीचा इतिहास : पूर्वी समोरासमोरील लढ्यात सैनिक हातघाईची शस्त्रे वापरीत असत. कालांतराने शत्रूवर दुरून मारा करण्याच्या कलेचा आणि अस्त्रांचा उदय झाला आणि लांब पल्ल्याची प्रक्षेपक अस्त्रे अस्तित्वात आली. सुरुवातीला ही प्रक्षेपक अस्त्रे दगडांच्या स्वरूपात होती. परंतु इ.स.पू. ४००० ते इ.स.पू. २०००च्या दरम्यान दगडांची जागा भाल्यांनी आणि नंतर धनुष्यबाणांनी घेतली. ‘दस्त्याचे धनुष्य’ (Crossbow) हे साध्या धनुष्यबाणापेक्षा अधिक भेदक होते.

यंत्रचलित बेचक्या (गलोल)

त्यामुळे बाण लांब पल्ल्यापर्यंत पोहोचू लागले. दूर पल्ल्यावर मोठे दगडगोटे फेकण्याऱ्या ‘यंत्रचलित बेचक्या’ (Catapult) या इ.स.पू. तिसर्‍या ते इ.स.पू. दुसर्‍या शतकांमध्ये वापरात आल्या. रोमन सैन्याने इ.स.पू. पहिल्या शतकात यांचा खूप वापर केला गेला. किल्ल्याबाहेरून किल्ल्यातील मोर्च्यांवर दगडांचा वर्षाव करण्यासाठी तसेच समोरून येणार्‍या शत्रूच्या घोडदळाविरुद्ध या बेचक्यांचा वापर होत असे.

जेव्हा चीनमध्ये स्फोटकांचा (Gun Powder) शोध लागला, तेव्हा यांत्रिक पद्धतीने तोफगोळ्याचे प्रक्षेपण करण्याच्या पद्धतीमध्ये तिसर्‍या शतकात क्रांती झाली. जरी स्फोटकांचा शोध तिसर्‍या शतकात लागला, तरी प्रक्षेपक अस्त्रांच्या वापरासाठी त्याचा उपयोग नवव्या शतकात सुरू झाला. तेव्हापासून स्फोटकयुक्त हातगोळे (Hand Grenade) आणि यंत्रचलित बेचक्यातून स्फोटक गोळ्याचा मारा करण्याचे तंत्र विकसित झाले.

मध्ययुगातील तोफखानाप्रणालीतील प्रगती : १४व्या शतकात यूरोपमध्ये लांब नळकांडीत स्फोटके घालून आणि त्या स्फोटकांना पेटवून त्यातून निर्माण झालेल्या धुराकरवी निर्माण झालेल्या दाबाच्या साहाय्याने धातुगोळ्याला दूरच्या पल्ल्यावर फेकण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. या गोळ्याला ‘शॉट’ असे संबोधले जात असे. ही तोफांच्या निर्मितीची सुरुवात होती.  सुरुवातीला अशा तोफा पितळेच्या (कासे, तांबे आणि कथील यांच्या मिश्रणाने बनविलेला धातू) असत. लवकरच धातूंच्या वेगवेगळ्या मिश्रणांचा वापर करण्यात येऊ लागला आणि तोफांची लांबी, व्यास आणि प्रक्षेपक गोळ्यांचा आकार वाढून तोफांचा पल्ला वाढू लागला. हे प्रक्षेपक गोळे घन धातूंचे असून लक्ष्याचा विध्वंस करण्याची क्षमता त्यांच्यात होती.

हळूहळू प्रक्षेपकांमध्ये स्फोटके वापरण्यात येऊ लागली आणि सन १४१५ पासून तोफांच्या आणि प्रक्षेपकांच्या तंत्रज्ञानात भर पडू लागली. अशा तोफा ‘१०० वर्षीय’ युद्धादरम्यान (Hundred Years War) वापरण्यात आल्या. फ्रेंच सैन्याने अशा तोफा प्रतिपक्षी घोडदळाविरुद्ध समर्थपणे वापरल्या. या तोफा गाड्यांमध्ये घालून युद्धभूमीवर नेल्या जात असत. पुढे या तोफांना चाके बसविण्यात येऊ लागली आणि घोड्यांच्या गाड्यांमागे युद्धभूमीपर्यंत त्या ओढत नेण्याचा शिरस्ता पडला. भारतात मोगल बादशाह बाबर याने १५२६ साली इब्राहिमखान लोदीबरोबर झालेल्या पानिपतच्या पहिल्या युद्धात सर्वप्रथम तोफांचा वापर केला. त्यामुळे त्याला यश मिळाले.

तोफखान्याची शस्त्रसामग्री :

  • तोफ (Gun/Cannon) : आंतरराष्ट्रीय स्तरावर या शस्त्राची एकच अशी व्याख्या उपलब्ध नाही. पण सर्वसाधारण मान्यतेनुसार ज्यात स्फोटके वापरून प्रक्षेपक गोळे (स्फोटके) दूर अंतरावर प्रक्षेपित केली जातात, अशा  शस्त्रप्रणालीला ‘तोफ’ या नावाने संबोधिले जाते. नळकांड्याची एक बाजू भक्कम धातूने बंद करून त्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूने स्फोटके नळकांड्यामध्ये ठासली जातात आणि त्यात प्रक्षेपक गोळा भरला जातो. त्या नळकांड्याचा व्यास २० मिमी.पेक्षा जास्त असतो. पूर्वीच्या तोफा या थेट भडिमारासाठी (Direct Firing) वापरल्या जात असत. गोळाफेक करणारा गोलंदाज आपले लक्ष्य समोर पाहू शकत असे. या तोफा घोडदळ, पायदळ आणि शत्रूच्या किल्ल्यांविरोधात वापरल्या जात.
  • सुधारित तोफप्रणाली (Gun System) : याचे पायाभूत तंत्रज्ञान जुन्या तोफांच्या प्रणालीसारखेच आहे, परंतु यात तोफांचा पल्ला खूप लांबचा असल्यामुळे गोलंदाजाला लक्ष्य समोर दिसत नाही. प्रक्षेपक स्फोटकांचा आकार बदलला आहे आणि नळकांड्याचा व्यास आणि लांबी यांतही वृद्धी झाली आहे.
    २० व्या शतकातील तोफप्रणाली

आधुनिक तोफखानाप्रणालीचा विकास : धातुशास्त्रात (Metallurgy) त्याचप्रमाणे स्फोटकशास्त्र आणि उत्क्षेपणाशास्त्र (Ballistic) यांत झालेल्या प्रगतीमुळे सुधारित तोफप्रणाली जास्त परिणामकारक झाली आहे. तोफांचा पल्ला वाढला आहे आणि मारक क्षमतेमध्ये वृद्धी झाली आहे. याचबरोबर संपर्कप्रणाली (Communication), लक्ष्यवेधप्रणाली आणि लक्ष्यापर्यंत प्रक्षेपक अस्त्राला पोहोचविण्याची प्रणाली यांमध्ये तांत्रिक प्रगती झाल्यामुळे तोफखान्याची क्षमता वाढली आहे.

तोफखान्याची क्षमता आणि वैविध्य वाढविण्यासाठी उखळी तोफा (उंच कोनात मारा करण्याची क्षमता असणाऱ्या तोफा), अग्निबाण (Rocket) प्रणाली (मार्गदर्शक/निम-मार्गदर्शक लांब पल्ल्याचा मारा करू शकणारी आणि जास्त स्फोटके वाहून नेणारी प्रणाली), ‘हॉवित्झर’ (लघू आणि उंच कोनात मारा करणारी हलकी तोफ), स्वयंचलित तोफ (Self Propelled) आणि अनेक नलिकांच्या समूहाने बनलेली अग्निबाणप्रणाली या विविध शस्त्रांचा उदय झाला.

पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीने एक ‘बिग बर्था’ नावाची अतिविशाल तोफप्रणाली विकसित केली होती. ही तोफ वाहून नेण्यासाठी रेल्वेची गरज पडत असे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ८०० मिमी. व्यास असलेली, २८ मैल लांब पल्ल्याची आणि ७.५ टन वजनाचे स्फोटक प्रक्षेपित करणारी तोफ वापरात आणली होती.

स्वयंचलित तोफ

तोफखान्याचा विकास एकविसाव्या शतकात सातत्याने सुरू राहिला आणि स्वयंचलित तोफांच्या बरोबरीने स्फोटक क्षेपणास्त्रे आणि लेसर प्रकाशशलाकाद्वारे नियंत्रित होणारी प्रक्षेपके आणि अणुच्छादित प्रक्षेपके (Nuclear Tipped) यांचा विकास झाला. यामुळे लष्करी सेनापतींच्या दिमतीस असलेल्या शस्त्रसमूहात लक्षणीय वाढ झाली आणि त्यायोगे शत्रूच्या प्रदेशावर हुकमत गाजविण्याची आणि त्यांच्या युद्धशक्तीची क्षती साधण्याची त्यांची क्षमता वाढली.

तोफा, अग्निबाण, उखळी तोफा, स्वयंचलित तोफा, क्षेपणास्त्रे इत्यादी शस्त्रे ‘मैदानी तोफखाना’ (Field Artillery) या वर्गात मोडतात. विमानविरोधी शस्त्रास्त्रे ‘विमानविरोधी तोफखाना’ (Air Defense Artillery) या वर्गात मोडतात. विमानविरोधी तोफखान्याचा विकास दुसऱ्या महायुद्धापासून सुरू झाला. भारतामध्ये या प्रकारच्या तोफखान्यात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे,  क्षेपणास्त्रे आणि स्वयंचलित तोफा इत्यादी समाविष्ट झाले. हा विभाग १९७०च्या दशकानंतर मैदानी तोफखान्यापासून विभक्त करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान समुद्र तटांच्या संरक्षणासाठी ‘सागरतटीय तोफखाना’ (Costal Artillery) स्थापन करण्यात आला. समुद्रमार्गे चाल करून येणाऱ्या शत्रूचे नाविक दल आणि समुद्रमार्गे येणारे सैन्य यांच्या विरुद्ध हा तोफखाना कार्यरत केला जाऊ लागला. आरमाराच्या वेगवेगळ्या मोठ्या बोटींवरसुद्धा शत्रूच्या आरमाराविरुद्ध भडिमार करण्यासाठी आणि सागरतटीय लढाईसाठी तोफा आणि क्षेपणास्त्रे बसविलेली असतात. तसेच विमानविरोधी तोफासुद्धा तैनात केल्या जातात.

बहू नळकांड्या असलेली अग्निबाणप्रणाली

रणांगणावर (जमीन, सागरीपृष्ठभाग आणि अवकाश) शस्त्रास्त्रांच्या माऱ्याने स्वतःचे एवढे प्रभुत्व निर्माण करावयाचे की, आपल्या सेनेला आखलेली सामरिक कार्ये बिनधोक करता यावीत आणि त्याचबरोबर शत्रूच्या सामरिक कार्यात परिणामकारक बाधा आणावी, हा तोफखान्याचा मूलभूत उद्देश आहे. म्हणूनच म्हटले जाते की, तोफखाना ‘युद्ध जिंकतो’.

संदर्भ :

समीक्षक : शशिकांत पित्रे