पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धानंतर लष्करी विमाने मोठ्या प्रमाणावर विकसित झाली. ही विमाने टेहळणीसाठी, शत्रूच्या शहरांवर, सैन्यावर आणि सैन्याच्या शस्त्र आणि पुरवठा यंत्रणांवर तसेच संपर्क प्रणालींवर हवाई हल्ले चढविण्यासाठी वापरण्यात येऊ लागली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान विमाने शत्रूच्या आरमारावर हल्ला करण्यासाठीसुद्धा वापरण्यात येऊ लागली. मोठ्या विमानवाहू नौकांवरून विमानांची वाहतुक सुरू झाली. विमानांतून मशिनगनचा मारा, बाँबफेक, रॉकेटचा मारा इत्यादी होऊ लागले. काही काळानंतर सैन्याच्या वाहतुकीसाठी, पुरवठा यंत्रणेसाठी विमानांचा वापर होऊ लागला. त्यानंतर हेलिकॉप्टरचे आगमन झाले.

जसजशी हवाई ताकत वाढू लागली आणि जसजशी विमानांची क्षमता आणि हवाई हल्ला करण्याच्या पद्धतीत विविधता येऊ लागली, तसतशी जमिनीवरून मारा करून शत्रूची विमाने पाडण्यासाठी शस्त्रास्त्रे विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झाली. या गरजेतून हवाई सुरक्षा तोफखान्याचा जन्म झाला. अशाप्रकारे शत्रूच्या विमानांना मज्जाव करून त्यांचा विध्वंस करण्याचे मुख्यतः वायुसेनेचे, तर आघाडीवरील रणांगणावर लष्कराच्या हालचालींना शत्रूच्या विमानांपासून निकट संरक्षण देण्याचे काम हवाई सुरक्षा गटाचे असते. युद्धक्षेत्रात ज्या ठिकाणी आपल्या रणगाड्यांचा, तोफांचा, सैनिकांचा किंवा इतर महत्त्वाच्या सैनिकी साहित्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात तैनात असेल, तेथे त्यांना शत्रूच्या विमानांच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी हवाई सुरक्षा तोफखान्याच्या विमानभेदी तोफा तैनात केल्या जातात.

विमान विरोधी एल-६० गन
विमानविरोधी दोन नळाकांड्यांची जहाजावरील तोफ

विमानविरोधी शास्त्रास्त्रांचा विकास आजतागायत सुरूच आहे. विमानांची क्षमता, त्यांच्या हल्ला करण्याच्या पद्धती, क्षेपणास्त्रांचा वाढलेला आवाका आणि त्यातून निर्माण होणारे हवाई सुरक्षेसंबंधीचे धोके, हे सर्व लक्षात घेऊन हवाई सुरक्षेसाठी वापरात येणाऱ्या शस्त्रास्त्रांमध्ये लक्षणीय विकास झाला आहे.

पहिले महायुद्ध ते १९६० पर्यंतच्या अवधीतील विकास : पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने सर्वप्रथम हवाई सुरक्षा तोफखान्याची तुकडी उभी केली. त्यानंतर फ्रान्स आणि इंग्लंड यांनी सुद्धा अशा तुकड्या उभ्या केल्या. परंतु प्रत्यक्षात अशा सैनिकी तुकड्यांची प्रगती दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली. सुरुवातीला जमिनीवर मारा करणाऱ्या मशीनगन्स कमी उंचीवरून हल्ला करणाऱ्या शत्रूच्या विमानांविरोधात वापरल्या जाऊ लागल्या. पण विमानांची हल्ला करण्याची उंची वाढू लागल्यावर या मशीनगन्स निरुपयोगी ठरू लागल्या. म्हणून जास्त लांब पल्ल्याच्या आणि जास्त व्यासाच्या तोफांची निर्मिती झाली. सुरुवातीला या तोफा हवाईपट्टी आणि महत्त्वाची सामरिक ठिकाणे यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात केली जात असत. पण नंतरनंतर पुढे आक्रमक हालचाली करणाऱ्या किंवा संरक्षणात्मक पवित्रा घेतलेल्या सैन्याला शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी अशा तोफा वापरण्यात येऊ लागल्या. वायुदलात अतिवेगाने जाणाऱ्या विमानांचा अंतर्भाव होऊ लागल्यानंतर लक्ष्यावरील अचूक माऱ्याच्या शक्यतेचे प्रमाण वाढविण्यासाठी तोफांच्या भडिमाराचा वेग वाढविण्यात आला. तसेच एका तोफ प्रणालीमध्ये जास्त नळकांड्या बसविण्यात आल्या. त्याला ‘मल्टी बॅरल गन’ म्हणतात. पुढे आक्रमक हालचाली करणाऱ्या रणगाडा दलावरील हवाई हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या तोफा स्वयंचलित चिलखती गाड्यांवर बसविण्यात आल्या. या सर्व तोफांना रडारच्या साहाय्याने विमानविरोधी निर्देशन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. त्याचबरोबर पायदळातील जवानांसाठी हवाई हल्ल्याविरोधात मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे सुद्धा वापरात येऊ लागली. अशी क्षेपणास्त्रे १९७३च्या अरब-इझ्राएली युद्धात इजिप्तच्या सैन्याने इझ्राएलच्या वायुसेनेवर प्रभावी रीत्या वापरली होती.

पायदळासाठी विमानविरोधी क्षेपणास्त्र
रणगाड्यावर बसविलेली विमानविरोधी दोन नळाकांड्यांची तोफप्रणाली

१९७० नंतर हवाई हल्ल्याविरोधातील तोफखान्याची प्रगती : जसजशी वायुदलाच्या विमानांच्या तंत्रज्ञानात प्रगती होत गेली, तसतशी विमानांची मारा करण्याची क्षमता वाढत गेली आणि युद्धतंत्रात बदल होत गेला. मारा करण्यासाठी शत्रूच्या माऱ्याच्या पल्ल्याबाहेर राहून हल्ला करण्याची पद्धत रूढ होत चालली. मार्गदर्शक अस्त्रे (Guided Weapons) वापरण्यात येऊ लागली. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जमिनीवरून मारा करणारी लांब पल्ल्याची, मध्यम पल्ल्याची आणि आखूड पल्ल्याची मार्गदर्शक अस्त्रे अस्तित्वात आली.  तसेच नौदलाच्या जहाजांवरसुद्धा अशी क्षेपणास्त्रे बसविली गेली. ७०च्या दशकात नौदल, वायुदल आणि भूदल यांची हवाई हल्ल्याविरोधात एक सर्व समन्वयक प्रणाली अस्तित्वात आली. त्यात लांब पल्ल्याची रडार यंत्रणा, तसेच अस्त्र आणि तोफा यांच्या नियंत्रणाची कार्यप्रणाली यांचा समावेश होता. शत्रूच्या विमानांचा ठाव घेणारी आणि जमिनीवरील शस्त्रास्त्रांना वेळीच सावध करणारी आणि त्यांना दिशा दर्शविणारी विमाने अस्तित्वात आली (AWAC विमाने) आणि त्यांच्या साहाय्याने जमिनीवरून आकाशात मारा करणे सुकर होऊ लागले.

ॲवॅक (AWAC) विमान
विमानविरोधी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे

हवाई हल्याविरोधातील तोफखान्याचे महत्त्व आणि कार्यप्रणाली : एकविसाव्या शतकात हवाई हल्ल्यासाठी जसा अद्ययावत विमानांचा वापर होत आहे, तसाच जमिनीवरून मारा करणाऱ्या दूर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही धोका वाढला आहे आणि विमानविरोधी तोफखान्यात ‘क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रे’ अंतर्भूत करण्यात आली आहेत. स्वतःच्या सैन्याला, शहरांना, महत्त्वाच्या ठिकाणांना, आरमाराला आणि विमानतळांना संरक्षण पुरविण्याची गरज वाढली आहे. म्हणूनच सैन्याचा हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.

शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देणे, वेगवेगळ्या शास्त्रास्त्रांना दिशा देणे, अचूक मारा करणे आणि भूदल, वायुदल आणि नौदल यांच्यात समन्वय साधणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे सर्व कमीतकमी वेळांत साध्य करणारी यंत्रणा अस्तित्वात आली आहे. शत्रूचा हल्ला आपल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर येण्यास मज्जाव करणे, हे या यंत्रणेचे मुख्य काम आहे.

संदर्भ :

  • www.claws.in/…/1397629827Naresh%20Chand%20%20CJ%20Summer%202010.pdf
  • www.indiandefencereview.com›News›Military&Aerospace
  • www.part-time-commander.com/army-air-defense-artillery-history-10-cool-facts/

                                                                                                                                                                   समीक्षक : शशिकांत पित्रे