आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील)

आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची  पहिली आंबील या सणाला करतात.झाडीपट्टीतील सर्वसामान्य लोकांचे पूर्वी आंबील हे नित्याचे पेय होते. त्यामुळे या आसीनचे महत्त्व असून म्हणूनच या नवीन आंबीलला ते ‘‘मोठी आंबील’’ असे म्हणतात. पंचांगातील नवान्न् पौर्णिमा या शब्दाचा अर्थ झाडीपट्टीतील लोक याप्रकारे पाळतात. गृहिणी सायंकाळी स्वयंपाक घरातील चूल शेणाने सारवते. नवीन हांडी व नवीन चाटू म्हणजे लाकडी पळी घेऊन त्यांना साहारा या वृक्षाची पाने लपेटते आणि त्या हांडीची पूजा करते. या नवीन मडक्यात मोठी आंबील शीजवतात. ही मोठी आंबील फक्त ७ कुळातील व्यक्तींनीच खायची असते. ती खाण्यास इतरांना मनाई असते. तसेच ती खाल्ल्यानंतर हात आचवायचे म्हणजे धुवायचे पाणीदेखील बाहेर फेकता येत नाही. ही मोठी आंबील तीन वेळ खायची असते. म्हणजे कोजागिरीच्या रात्री खाल्लेली आंबील दुस-या दिवशी म्हणजे प्रतिपदेला सकाळी व रात्री खावी लागते. तेव्हा ती संपली नाही तर ती मुरात जाते असे म्हणतात आणि ते अशुभ मानतात. त्यामुळे ही आंबील अनेकदा कोजागिरीच्या एकदोन दिवस पूर्वी बनविली जाते. याचा अर्थ असा की आसीन ही दस-यानंतर दुस-या दिवसांपासून म्हणजे कोजागिरीच्या पाच दिवसांपूर्वी  सुरू होते आणि बरोबर कोजागिरीला संपते.

आटीव : आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाडी बोलीत आटीव असे संबोधतात. या दिवशी नवीन धान्याची आक्षी खायला सुरूवात करतात. या दिवशी नवीन तांदळाचे पीठ भिजवून दोस्याप्रमाणे तव्यावर केलेल्या या आक्ष्यासोबत गोड गुरसेल व सुरणाची भाजी केली जाते. आटीवला गृहिणी हत्ती पूजतात. हा मातीचा हत्ती गावामधील सोनाराने तयार करून दिलेला असते. याच दिवशी त्या गौर करतात. ही गौर शहरी गौरीपेक्षा भिन्न असते. गावातील सर्व सासुरवाशिणी बायका नटूनथटून वाजत गाजत तलावावर जातात.आपल्यासोबत आणलेली नवीन टवरी घेऊन तीन बायका तिनदा माती किंवा रेती काढून ती टवरी भरतात. तिलाच ‘‘गौर’’ असे नाव देण्यात आले आहे. ती गौर समारंभापूर्वक घरी आणतात आणि तिच्यात नाकातील मुकरा म्हणजे नथ आणि तीन बांगडया टेवून पीठ भरतात व तिची पूजा करतात.

संदर्भ :

  • लांजे, हिरामण, समग्र झाडीपट्टी, विवेक प्रकाशन ,नागपूर, २००६.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा