कानोबा म्हणजे झाडीपट्टीतील जन्माष्टमी. कानोबा हे श्रीकृष्णाचे नाव असून त्यात हिंदीतील कन्हैया आणि मराठीतील विठोबाचा बा या दोहोंचे मिश्रण झालेले आहे. संतांनी विठ्ठलाला जसे विठोबा केले तसे झाडीपट्टीने कन्हैयाला कानोबा बनविले आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सायंकाळी कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतात. कृष्णाला दही व लाहया प्रिय असतात, म्हणून त्याच्या मूर्तीच्या एका बाजूला दही देणारी गवळण आणि दुस-या बाजूला लाह्या देणारी ढिवरीन म्हणजे कोळीण असते. कानोबा तयार करण्याचे काम गावातील मडकी बनविणारा कुंभार किंवा घरी पाणी भरणारा ढिवर म्हणजे कोळी करतो. कानोबाच्या मुर्तीवर पाच नारळांचा आणि पाच पक्वान्नाचा फुलोरा (देवावर बांधावयाची खाद्यपदार्थाची माळ) ठेवलेला असतो.जन्माष्टमीच्या रात्री भजने व कानोबाची गाणी गात रात्रभर जागरण करतात. दुस-या दिवशी दिवसभर एकमेकांच्या घरचा कानोबा पाहणे, त्याच्या पाया पडणे आणि प्रसाद खाणे ह्या बाबी केल्या जातात. याप्रसंगी  रात्री जेवण करीत नाही. हरभ-याचे उकडलेले दाणे म्हणजे उसळ, लाह्या, पोहे व चणे हेच खायचे असते. कानोबा ‘दिडा दिसाचा’ समजला जातो. ‘औट घटकेचे राज्य’ या अर्थाचा ‘दिडा दिवसाचा कानोबा’ हा वाक्यप्रचार झाडी बोलीत रूढ आहे. दुस-या दिवशी सायंकाळी काला करतात आणि रात्री वाजत गाजत भजनाच्या निनादात जवळच्या तलावामध्ये कानोबा सिरवतात म्हणजे विसर्जित करतात. कोकणात जसा गणेश चतुर्थीला घरोघरी गणपती मांडतात तसाच झाडीपट्टीच्या प्रत्येक घरी जन्माष्टमीला कानोबा मांडला जातो.

संदर्भ :

  • लांजे, हिरामण, समग्र झाडीपट्टी,विवेक प्रकाशन, नागपूर, २००६.

प्रतिक्रिया व्यक्त करा