आदिवासी कोरकू नाट्य. हे मूलतः विधिनाट्य आहे. महाराष्ट्रातील दंडार, खडी गंमत, आणि सोंगी भजन या प्रकाराशी साम्य असणारा हा नाट्य प्रकार आहे. संगीत, गायन, नृत्य, आणि अभिनय अशा नाटकातील सर्व बाजू यात असतात. खम विधिनाट्यात बालगणेशाचे अवतरण होत असल्याने प्रारंभापासून खम नाट्यशैलीवर माच या नाट्यशैलीचा प्रभाव जाणवतो. खम म्हणजे खांब. खम याचा लौकिकदृष्ट्या अर्थ जरी खांब किंवा स्तंभ असला तरी या खांबाचा अर्थ नृसिंहसारख्या देवता,रावणपुत्र मेघनाथाशी पोहोचतो. कोरकू ही आदिवासी जमात रावणपूजक जमात आहे. त्यांच्या श्रद्धास्थानात रावण आणि रावणपुत्र मेघनाथाला अढळ स्थान आहे. ज्या ठिकाणी खमनाट्य सादर होते ती जागा स्वच्छ करून तेथे रावण पुत्र मेघनाथाची पूजा करून मेघानाथाचे प्रतिक असलेला खम्म (खांब) गाडला जातो. खांबावर बैलगाडीचे चाक लावले जाते. चाकाच्या आर्‍यांना शुभत्वसूचक आंब्याच्या डहाळ्या बांधतात.संपूर्ण चाक लाल मंदर्‍याने आच्छादिले जाते. या स्टेजसारख्या मांडणीला रासमंडल संबोधले जाते. या चक्राकार मांडणीखाली खम नाट्याचा प्रयोग होतो. प्रयोगाच्या प्रारंभी स्तंभाचे विधिवत पूजन केले जाते. खममध्ये पूर्वरंग व उत्तररंग असे भाग असतात. त्याला लिखित संहिता नसते. दिवाळीनंतर गावोगावी खम नाट्याला सुरुवात होते. खममध्ये सोंगी खम आणि खम्म भजन असे दोन प्रकार असतात. सोंगी खममध्ये नाट्याला अधिक महत्त्व असते तर खम्म भजनात गायन नृत्याला अग्रक्रमाने महत्त्व असते. या नाट्य प्रकारात विदुषक हे सोंग असते, त्याला मसखऱ्या म्हणतात. मेघनाथ, रावण आणि शंकर पार्वती ह्या आराध्य देवतांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून खम नाट्य केले जाते.

संदर्भ :

  • राणे, सदानंद, लोकगंगा – महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकनृत्ये,डिंपल पब्लिकेशन,पुणे,२०१२.

प्रतिक्रिया व्यक्त करा