खाडिलकर, पांडुरंग : (जन्म : २८ डिसेंबर १९०३ – मृत्यू : मार्च १९८८) ख्यातनाम मराठी शाहीर व महाराष्ट्रातील शाहिरीकलेचा इतिहास लिहिणारे इतिहासकार. पूर्ण नाव पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर. स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या सांगली संस्थानातील उगार खुर्द नावाच्या गावी खाडिलकरांचा जन्म झाला. खाडिलकरांचे वडील सरकारी नोकर असल्यामुळे खाडिलकर कुटुंबाच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत बदल्या होत असत. त्यामुळे खाडिलकरांना बालपणापासून विविध ठिकाणचे वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळाले. खाडिलकर लहान असतानाच प्लेगादी आजारांच्या साथीमुळे त्यांच्या माता-पित्यांचे दुःखद निधन झाले.
विद्यार्थीदशेपासून खाडिलकरांना शिक्षणात रस होता, वाचनाची आवड होती. त्यामुळे त्यांनी सांगली येथील विलिंग्डन कॉलेज, वाई येथील प्राज्ञ पाठशाळा, कोल्हापूर येथील ताराराणी टिचर्स ट्रेनिंग कॉलेज ह्या शैक्षणिक संस्थांमधून विविध विषयांचे शिक्षण घेतले आणि बी. ए., एम. ए., बी. टी. ह्या पदव्या प्राप्त केल्या. केवलानंद स्वामी हे खाडिलकरांचे गुरु होते. वाई येथे शिकत असताना छत्रपतींच्या छत्री समारंभास उपस्थित राहण्यासाठी खाडिलकर वाईवरून रायगडला पायी चालत गेले. रायगडावर विविध शाहिरांचे वीरश्रीयुक्त पोवाडे त्यांनी ऐकले. ह्या पोवाड्यांतील वीररस भावल्याने खाडिलकरांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी वीररत्नश तानाजी मालुसरेंच्या शौर्यगाथेवर एक दीर्घ पोवाडा रचून गायला. ह्या पोवाड्यापासून उदयोन्मुख शाहीर म्हणून पांडुरंग खाडिलकर प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी अल्पकाळात अनेक पोवाडे रचले.
इ. स. १९३०-३१च्या सुमारास महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने खाडिलकरांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा दिली. शिक्षा पूर्ण झाल्यावर खाडिलकर अहमदाबाद, कोल्हापूर असा प्रवास करत नंदुरबारला गेले, नंदुरबारच्या हायस्कुलात त्यांनी एक वर्ष मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली आणि नंतर ते मुंबईला स्थायिक झाले. मुंबईतील कर्नाटक हायस्कुलात प्रिन्सिपॉलपदावर कार्यरत असताना खाडिलकरांनी महाराष्ट्रातील शाहिरीकलेच्या परंपरेचा बारकाईने अभ्यास केला आणि पोवाडे, लावणी, फटका, कटाव, गोंधळ, चुटका, आख्याने इत्यादी विविध साहित्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले. शाहिरी ही एक गेय लोककला आहे ह्याचे नेमके भान खाडिलकरांना होते. त्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांना सहजपणे गाता येतील अशा वैशिष्ट्यपूर्ण चालीत अनेक पोवाडे लिहिले. हे पोवाडे ग्रामोफोनच्या तबकड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचले. त्यानंतर खाडिलकरांच्या पोवाड्यांतील ‘खाडिलकर चाल’ अत्यंत लोकप्रिय झाली आणि त्यातून स्फूर्ती घेऊन नव्या दमाचे अनेक तरुण शाहीर ठिकठिकाणी निर्माण झाले.
शाहीर खाडिलकर यांचे पोवाडे आणि इतर शाहिरी कवन ह्या ग्रंथामध्ये खाडिलकरांचे पोवाडे आणि लावण्या संग्रहित करण्यात आल्या आहेत. राजमाता जिजाबाई, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, पु. अहिल्याबाई होळकर, गुरुगोविंद सिंग, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादी महापुरूषांवर आणि पानिपतचा रणसंग्राम, सुरतेवर छापा, शाहिस्तेखानाचा पराभव, शिवराज्याभिषेक, बार्डोलीचा लढा, हैद्राबादचा सत्याग्रह, स्वातंत्र्याची पहाट, भूदानयज्ञ इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींवर खाडिलकरांनी पोवाडे लिहिलेले दिसतात. खाडिलकरांच्या पोवाड्यांतून त्यांचे धर्म, राष्ट्र आणि समाजाविषयीचे प्रेम प्रत्ययास येते. ह्याशिवाय संस्कृत चंद्रिका, इतिहासमंजरी, श्री. गीतार्थसुधाकर, श्री. संगीत गीतासार, संगीत रत्नाकर, पोवाडे वाङ्मय दर्शन (मंत्र-तंत्र-यंत्र) हे ग्रंथ खाडिलकरांच्या नावावर जमा होतात. खाडिलकरांच्या समग्र वाङ्मयावरून त्यांचा अभ्यासूपणा, व्यासंग, कालभान, मूल्यभान आणि शाहिरीकलेविषयीची तळमळ लक्षात येते. शाहीर खाडिलकरांनी अनेक पिढ्यांना पुरून उरेल इतके शाहिरी लिखाण करून शाहिरी वाङ्मयात मोलाची कामगिरी केली आहे. एक अभ्यासू शाहीर म्हणून त्यांनी शाहिरी क्षेत्रात अत्युच्च मानाचे स्थान मिळवले. जीवनाच्या अंतापर्यंत हा शाहीर माना-सन्मानाने शाहिरी जिणे जगत राहिला.
इ. स. १९८८मध्ये वयाच्या ८५व्या वर्षी पांडुरंग खाडिलकर ह्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • खाडिलकर पांडुरंग, शाहीर खाडिलकर यांचे पोवाडे आणि इतर शाहिरी कवन, चंद्रभूषण प्रकाशन, मुंबई, १९६८.

प्रतिक्रिया व्यक्त करा