चारोळी हा वृक्ष ॲनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बूखनॅनिया लँझान आहे. आंबा व काजू या वनस्पतीदेखील या कुलातील आहेत. भारत, म्यानमार, कंबोडिया, चीन व थायलंड या देशांमध्ये चारोळी वृक्षाचा आढळ असून उष्ण व कोरड्या हवामानांत तो चांगला वाढतो. भारतात या मध्यम पानझडी वृक्षाचा प्रसार सर्वत्र रुक्ष व विरळ वनांमध्ये झालेला दिसून येतो. पाणथळ जागी तो वाढत नाही.
चारोळी हा वृक्ष १२—१५ मी. उंच वाढत असून त्याचा घेर सु.१.२ मी. असतो. खोडाची साल जाड, करडी, भेगाळलेली व खरबरीत असून मगरीच्या पाठीप्रमाणे दिसते. पाने साधी, जाड, एकाआड एक व लंबगोल असून टोक गोलसर असते. पानांमध्ये १०—२० शिरांचा समांतर शिराविन्यास असतो. जानेवारी ते मार्च महिन्यांत फुले येतात. फुले हिरवट-पांढरी व लहान असून शंकूच्या आकारासारख्या फुलोऱ्यात अग्रस्थ किंवा कक्षस्थ असतात. फुलांना असलेली लहान छदे लवकर गळतात. दले केसाळ आणि पाच पाकळ्या बाहेरच्या बाजूस वळलेल्या असतात. फुलामध्ये दहा पुंकेसर असून ते दलांपेक्षा आकाराने लहान असतात. स्त्रीकेसर पाच, मात्र त्यातील एकच कार्यक्षम असते. फळ ०.८—१.२ सेंमी., आठळीयुक्त, गुळगुळीत व काळ्या रंगाचे असून आठळी व्दिदल असते. फळे एप्रिल-मे महिन्यांत येतात. बियांना ‘चारोळ्या’ म्हणतात.
चारोळी (बिया) मेंदू व शरीरास पौष्टिक असतात. वेगवेगळ्या मेवामिठाईंत चारोळ्या मिसळतात. त्यामुळे मिठाईची चव वाढते. फळे त्वचारोगावर उपयुक्त आहेत. काही आदिवासी भागांत गरांच्या भुकटीचा लेप चेहऱ्याला लावतात. बियांमध्ये सु. ६१% तेल, १२% स्टार्च, ३१% प्रथिने, ५% शर्करा इत्यादी द्रव्ये असतात. सालीतून पाझरणारा डिंक बद्धकोष्ठता निर्माण करणारा असल्यामुळे अतिसारावर वापरतात. उजाड टेकड्यांवर लावण्यास हा वृक्ष उपयुक्त आहे.