पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील एक लोकप्रिय लोकनाट्य. या लोकनाट्याने इंग्रजीतील ड्रामा हा शब्द जसाचा तसा उचलला. आद्यस्थानीचे जोडाक्षर उच्चारणे झाडीबोलीत प्रचलित नाही. त्यामुळे हा इंग्रजांचा ड्रामा उच्चारसुलभ होऊन डरामा बनला आहे. डरामा या नवीन संकरित लोककला प्रकाराने हे भाषेचे अंतरदेखील ओलांडलेले दिसून येते. तिकडे मध्यप्रदेशात डरामा हिंदीत सादर केला जातो, तर इकडे झाडीपट्टीत तो मराठीत पहायला मिळतो. शब्दशः सांगायचे तर आपल्या प्रदेशातील प्रचलित बोलीचा वापर दोन्ही ठिकाणी करण्यात येतो. तथापि नाव मात्र तेच असते डरामात ते बदलत नाही. दोन्हीकडे डरामा हेच नाव या लोकनाट्याकरिता वापरले जाते. यात अगदी नाटकासारखाच रंगमंच तयार केला असतो. पाच-सात पडदे व्यवस्थित लागलेले असतात. पुढे नाटकासारखाच झगझगीत दर्शनी पडदा नजरेत भरता. इतकेच नाही तर झाडीपट्टीतील नाटकात जशी वादकमंडळी रंगमंचाच्या समोर बसतात तशीच या डरामामधील संगीत मंडळी रंगमंचाच्या पुढे स्थानापन्न झालेली असतात. थेट नाटकासारखेच हार्मोनियम तबला व्हायोलिन व टाळ वाजविणारे झिलकरी समोर उपस्थित असतात.
नाटकासारखाच पात्रपरिचय करून देण्यात येतो. पडदा उघडला नसतानाच आतून नाटकासारखी नांदी गायली गेली. श्रेयनामावलीचा उद्घोष झाल्यानंतर पुन्हा निवेदकाकडून नावाची घोषणा करण्यात येते. आणि गजकुंडीच्या कर्णकर्कष आवाजात दर्शनी पडदा वर जातो. पात्रांचा प्रवेश सुरू होतो आणि प्रेक्षकांची कुजबुज थांबते.सारे कथानक ऐतिहासिक थाटाचे असले तरी काल्पनिक असते. सर्वांची वेशभूषा भडक व भरजरी असते. संवाद अगदी खटकेबाज असतात. मात्र संवाद संपताच त्याच अर्थाचे गाणे साग्रसंगीत गायले जाते. बटबटीत अभिनय असतो. पण समोर बसलेल्या प्रेक्षकांना ते सारे आवडत असते. कारण सारेच प्रेक्षक प्रत्येक प्रसंगाला दाद देत असतात. अगदी डोळ्यांत तेल घालून पाणी आणून आणि प्राण ओतून समरप्रसंग पहात असतात. मनापासून आस्वाद घेत असतात. दंडारीत वादकमंडळी रंगमंचावरच, पण पात्रांच्या मागे उभी असतात. पण डरामा मध्ये ही मंडळी नाटकासारखी समोर बसली असतात. म्हणजे या परिसरातील दंडार या लोकनाट्यावर नाटकाचे कलम करून हा नवीन कलाप्रकार डरामा उदयास आला असे म्हणता येईल. डरामा या अभिनव लोकनाट्य प्रकारात रामायण व महाभारत या महाकाव्यांतील कथानकांचा विपुलतेने वापर केलेला दिसून येतो. पण केवळ त्यांच्यावरच आपले हे स्थानिक प्रतिभावंत तृप्त राहिलेले नाहीत. त्याशिवाय अनेक रोमाचंक व रोमॅटिंक काल्पनिक कथानकांवरही अनेकदा नाट्यप्रसंग तयार केलेले आढळून येतात. दंडारीप्रमाणेच डरामा या लोकनाट्यातही अद्यापि स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करतात. म्हणजेच नाटकावर कलम करूनही या लोकनाट्यप्रकाराने स्त्रियांना मज्जाव हे आपले आदिम ब्रिद कायम ठेवलेले आहे. शिवाय दंडारीप्रमाणेच हे लोकनाट्यदेखील आजही निःशुल्क दाखविले जाते.
अर्थात गावातला कोणी तरी प्रमुख डरामा करण्याचे आमंत्रण मंडळास देतो. त्यामुळे ठरलेली बिदागी देण्याची जबाबदारी त्याचीच असते. दंडारीप्रमाणेच डरामा हादेखील तसा मौखिक लोकनाट्य प्रकार आहे. तथापि ढोबळ अशी लिखित संहिता तयार असते. यातून ग्रामीण क्षेत्रातील अनेक प्रतिभावंतांना प्रकाशात यायला उत्तम संधी लाभली आहे. काही खेड्यांचा अपवाद वगळता अनेक खेड्यांमध्ये डरामा सादर करणारी मंडळे आढळतात. आपल्याला आवश्यक त्या साधनसामुग्रीने सुसज्ज असलेली ही मंडळे अत्यल्प मोबदल्यात निमंत्रण स्वीकारून आपली कला सादर करीत असतात.