स्त्रीप्रधान गंमत प्रकारातील महाराष्ट्रातील नाट्याविष्कार. हा नाट्यप्रकार दलित कलावंतांनी जोपासलेला आणि विकसित केलेला कलाप्रकार असून स्त्रीवर्गात हा नाट्यप्रकार प्रसिद्ध होता. लप्पक या संज्ञेला ‘लापणिक’ किंवा ‘लापिका’ हे शब्द जवळचे आहेत. लापणिक शब्दाचा कोशगत अर्थ स्पष्टीकरण, कंटाळवाणे कथानक,चर्‍हाट असा होतो. महानुभावीय वाङ्मयामुळे ‘लापिका’ ही संज्ञा अधिक रूढ झालेली आहे. म. चक्रधरांच्या सूत्र-दृष्टांतातील गर्भितार्थ स्पष्ट करणारी ती ‘लापिका’. लप्पक’ मध्ये गण, नमन आणि मौखिक पौराणिक कथानकांवरील नाट्यप्रवेश एवढेच घटक असतात. पूर्वरंगात गण, नमन असते तर उत्तररंगात नाट्यप्रवेशांची मालिका असते. या कलाप्रकारातील आख्याने-नाट्यप्रसंग मौखिक परंपरा आणि पुराण परंपरेवर आधारित असत. १९५६ पर्यंत दलित कलावंत हिंदूधर्मातील घटक होते म्हणून त्यांना पौराणिक-धार्मिक आख्यानांचे वावडे नव्हते. पण १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्धधम्माची दीक्षा दिली आणि या कलावंतांचा हिंदूधर्माशी असलेला संबंध तुटल्याने ही कलावंत मंडळी आंबेडकरी प्रबोधनाकडे वळली आणि हा कलाप्रकार विलयास गेला. १९६० पर्यंत ‘लप्पक’ कलाप्रकाराचे कसेबसे अस्तित्व टिकून होते.

संदर्भ :

  • मांडवकर, भाऊ, वैदर्भीय लोकसाहित्य, सेवा प्रकाशन, अमरावती,१९८६.

प्रतिक्रिया व्यक्त करा