शाहीर जंगमस्वामी : (जन्म : १२ फेब्रुवारी १९०७ – मृत्यू : २००९) विख्यात मराठी शाहीर. मूळ नाव शिवलिंगआप्पा विभूते. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील भोंगवली नावाच्या खेडेगावात लिंगायत समाजातील जंगम कुटुंबात जंगमस्वामींचा जन्म झाला. त्यांचे वडील वारकरी परंपरेचे पालन करणारे कीर्तनकार व प्रवचनकार होते. त्यांच्या प्रभावामुळे जंगमस्वामी शाळा शिकता शिकता प्रवचन करू लागले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जंगमस्वामी पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयात प्रथम वर्गामध्ये बी. ए. पदवी मिळविली. जंगमस्वामींचे शिक्षण चालू असताना पुण्यामध्ये स्वातंत्र्यचळवळीचे वातावरण होते. ह्या वातावरणाचा जंगमस्वामींवर प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी गांधीजींप्रमाणे साधी राहणी स्वीकारली आणि ‘उठू दे देश, पेटू दे देश’ अशी ललकारी देऊन ते बुलंद आवाजात भारतीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कीर्तन करू लागले. जंगमस्वामींमधील जनजागृतीची क्षमता लक्षात आल्यावर महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांनी स्वामींना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. तेव्हा नाना पाटलांना गुरु मानून जंगमस्वामींनी स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. गावोगावी जाऊन जनजागृतीपर कीर्तने केल्यानंतर राष्ट्रीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जहाल कीर्तनकार अशी ओळख जंगमस्वामीना प्राप्त झाली. इ. स. १९४२मध्ये चले जाव चळवळीच्या काळात गोऱ्यांनो हिंद देश सोडा हा जंगमस्वामींचा पोवाडा गाजला होता.

कलावंत जंगमस्वामी स्वातंत्र्यसैनिकही होते. नाना पाटलांच्या पत्री सरकारच्या माध्यमातून अनेक खुल्या आणि भूमिगत लढ्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. गावोगावी भ्रमंती केल्यावर खेड्यापाड्यातून  वसलेला भारत देश व भारतीयांमधील अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य ह्या समस्या जंगमस्वामींच्या लक्षात आल्या. ह्या समस्यांच्या निराकरणासाठी त्यांनी गावगाडा हे लोकनाट्य लिहिले आणि त्या माध्यमातून भारतीयांना आत्मविकासाचे अनेक उपाय सुचविले. जंगमस्वामींना कलेविषयी अत्यंत आदर व ममत्व वाटत असे. जनजागृतीच्या कार्यातील लोककलेचे सामर्थ्य त्यांनी अचूक ओळखले होते. ‘कला ही आपली आई आहे.’ अशी भूमिका अंगी बाणवून जंगमस्वामींनी जीवनभर लोकप्रबोधनाचे कार्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंगमस्वामी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाले होते. जंगमस्वामींचे प्रबोधनकार्यातील योगदान लक्षात घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते असलेल्या आचार्य अत्रेंनी स्वामींना ‘लोकशाहीर’ ही उपाधी बहाल केली होती. मराठीप्रमाणेच कानडी भाषेतही जंगमस्वामींनी पोवाडा रचला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर इ. स. १९५७मध्ये जंगमस्वामींनीही समतावादी बौद्ध धम्म अंगीकारला आणि नागसेन विभूते असे नवे नाव धारण केले. जंगमस्वामी मोठ्या रकमेचे पुरस्कार स्वीकारीत नसत. पण शाहिरीवरील प्रेमापोटी त्यांनी शाहीर पठ्ठे बापूराव आणि शाहीर अमरशेख ह्यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार स्वीकारले होते.

वयाच्या १०२ व्या वर्षी जंगमस्वामींचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • जगताप, विजय (संपा), महाराष्ट्रातील राष्ट्रीय शाहीर, विजयश्री प्रकाशन, कोल्हापूर, २००५.

समीक्षक – अशोक इंगळे

प्रतिक्रिया व्यक्त करा