राम जोशी : (१७६२? – १८१३?). सुप्रसिद्ध मराठी शाहीर. पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. जन्म सोलापूर मध्ये एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडीलबंधू मुद्गल जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक; त्यामुळे त्यांच्या घरात संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे वातावरण होते. लहाणपणापासूनच राम जोशींवर आध्यात्मिक संस्कार होते तरी त्यांना तमाशाचा छंद जडला होता.आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी भजन कीर्तनामध्ये नावलौकिक मिळवला. कीर्तनशैली आणि तमाशाशैली या दोन्हीही प्रकारात त्यांचा हातखंडा होता.लौकिक पातळीवरील रचना करण्यात ते पारंगत होते. सामाजिक भान झुगारून त्यांनी अनेक अध्यात्मिक, कुट, ऐतिहासिक पोवाडे, श्रृंगारिक रचना, भेदीक कवणे रचलेली आढळतात.वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांचे पालन-पोषण थोरले बंधू मुद्गल जोशी याने केले. थोरल्या भावाची मनोमन इच्छा होती की, राम जोशी यांनी किर्तनातून समाज जागृतीचे कार्य करावे आणि अध्यात्मातून समाजाला प्रबोधनाचे बोध दयावे; परंतु भावाच्या मनासारखे राम जोशी यांना वागता आले नाही. त्यांनी दलित, अस्पृश्य समाजातील अनेक कलावंतांना एकत्र करून तमाशा उभा केला. त्यांनी तमाशाशी केलेली जवळिक थोरल्या भावास पटली नाही. रामजोशी यांना त्याने घराबाहेर काढले. धोंडी शाहीर हा तमाशा कलावंत स्वतःच रचना करायचा, चाली लावायचा आणि आपल्या तमाशाच्या फडातून सादर करायचा. तो अतिशय प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत होता, त्याला गोड गळयाची साथ लाभलेली होती. धोंडी शाहीर यांचा तमाशा पाहून रामजोशी प्रभावित झाले. त्यांनी धोंडी शाहीर यांचे शिष्यत्व पत्करून तमाशात प्रवेश केला. राम जोशी यांनी जी पहिली लावणी रचली ती धोंडी शाहीर यांनीच सोलापूर येथे गायिली. धोंडी शाहीर यांनी आपल्या तमाशासाठी कवणे रचण्याची जबाबदारी सोपवली म्हणून तमाशा परंपरेतील धोंडी शाहीर हाच आपला गुरू आहे असे राम जोशी मानतात. नंतरच्या काळात राम जोशी यांनी पंढरपूर येथील बाबा पाध्ये यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्याकडून पुराणाचे, शास्त्राचे सखोल ज्ञान प्राप्त केले. त्यातील पौराणिक कथांमधून स्वतःची कीर्तनशैली विकसित केली.राम जोशी यांचे घराणे शास्त्री पंडीताचे; परंतु कीर्तनात त्यांना पाहीजे तसा नावलौकिक मिळवता आला नाही, तमाशात प्रवेश करून त्यांना नावलौकिक मिळला.
राम जोशी यांच्या विविध विषयांवर सुमारे १०० ते १२५ लावण्या उपलब्ध आहेत. शृंगारिक लावण्या,कृष्णलीलांवरील लावण्या,देवतावर्णनपर लावण्या, नित्यउपदेशपर,वैराग्यपर कवने,लौकिक विषयाच्या लावण्या, उद्देशपर लावण्या इ. प्रकारात राम जोशी यांनी लेखन केले.मदालसा चंपू हा संस्कृत ग्रंथ आणि रामाष्टक हे स्त्रोतही त्यांनी रचले आहे. त्यांच्या रचनांमधील अविष्कार आणि शैली प्रभावशाली आणि रसिकांना आकृष्ट करणारी आहे. त्यांचा संस्कृतचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या कवणात आपणाला विरह,उत्कटता आणि अध्यात्म आढळते. सामाजिक संकेत झुगारून काही कवने अश्लीलतेकडे झुकलेल्याही दिसतात. गोपीका आणि कृष्ण यांच्यावरील रचनांमधून त्यांनी विप्रलंभ श्रृंगार खुलवला. विप्रलंभ श्रृंगार म्हणजेच विरहाने व्याकुळ झालेल्या स्त्रीने केलेला श्रृंगार होय. रामजोशीने श्रृंगाराबरोबरच ऐतिहासिक पोवाडयाच्याही रचना केलेल्या दिसतात. त्यांच्या छक्कडरूपी पोवाडयात स्थळा काळाचा महिमा सांगणारे त्या काळचे पुण्याचे असलेले वैभव रेखाटले आहे. ध्यात्म, श्रृंगार आणि विद्वतेच्या जोरावर रामजोशी यांना पेशव्यांच्या दरबारात राजाश्रय मिळाला होता. पेशवाई थाटातील अतिशय प्रतिभासंपन्न शाहीरांमध्ये त्यांची गणना केली जाते.
संदर्भ :
- बोल्ली, लक्ष्मीनारायण, कविराय राम जोशी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०११.
समीक्षक – अशोक इंगळे