विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल होय. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. तांबुलाचे त्रयोदशगुणवर्णन वराहमिहिराने बृहत्संहितेत केले असून इ. स. अठराव्या शतकातील योगरत्नाकार या वैद्यक ग्रंथात विड्याचे घटक म्हणून पान, सुपारी, कात, चुना, कापूर, कस्तुरी, लवंग, जायफळ इ. पदार्थांचा उल्लेख येतो. स्कंदपुराणात नागवेलीला अमृतोद्भव मानले आहे. भारतातील कामशास्त्रीय ग्रंथांत आणि काव्यनाटकांतील शृंगारवर्णनात तांबुलाच्या या प्रणयपोषक प्रभावाचा उल्लेख वारंवार आढळतो. तांबूल खाण्याची प्रथा भारतीय असून, ती वेदपूर्वकाळापासून रुढ असावी. तांत्रिक आणि तंत्रप्रभावित उपासनेत, तसेच अन्य धर्माचारांत विड्याचे विशेष महत्त्व आहे. मंगलकार्यात पानसुपारी देतात. पूजोपचारांत देवतेपुढे नागवेलीच्या दोन पानांवर अखंड सुपारी ठेवतात. विडा वातहारक, कृमिनाशक, कफहारक असून दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. तसेच तो मुखाची अशुद्धी नाहीशी करून मुखाला शोभा आणतो. तांबूल कामोद्दीपक आणि मुखसौंदर्यवर्धक असल्यामुळे प्रणयाराधनेत तांबूलाचे विशेष महत्त्व मानले गेले. प्रणयाराधनाशिवाय अन्य सामाजिक व्यवहारात आणि धर्माचारांतही विड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागवेलीच्या पानांचा विडा खाण्याची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे. विडा खाण्याची प्रथा भारताप्रमाणे इंडोचीन, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान इ. देशांतही बऱ्याच, प्राचीन काळापासून आढळते.

महाराष्ट्रातील माहूरगडावर देवीचा तांबूल विडा कुटून प्रसाद म्हणून दिला जातो. सप्तशृंग गडावरही देवीचा बहुगुणी विडा (तांबूल) प्रसाद म्हणून भाविक स्वीकारतात. इ. स. १८११ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुत्रप्राप्तीप्रीत्यर्थ सर्व देवदेवतांना विडादक्षिणा दिली. त्यात चतुःशृंगीसही विडादक्षिणा व एक रुपया ठेवल्याचा ऐतिहासिक उल्लेख सापडतो. शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या विविध आयुर्वेदिक घटकांपासून बनविलेल्या विड्यामध्ये नागवेली पान (मुखदुर्गन्धी पर गुणकारी), काथ (कफनाशक रक्तशुद्धी), चुना (कॅल्शियम), बडीशेप (मुखशुद्धी), जेष्ठमध (बलवर्धक- कफ, खोकल्यासाठी), गुंजपत्ती (कफनाशक, रक्तविषनाशक), जायपत्री (सुगंधी), जायफळ (सुंगधी, कफनाशक), अक्कलकारा (बुद्धीवर्धक), कंकोळ (कंठ विकार), कुलांजन (कंठ सुधारक, मूत्ररोग), लेंडी पिंपळी (सर्दी, कफनाशक), सुंठ (पित्त, कफनाशक), काजू (बलवर्धक), बदाम (बलवर्धक, बुद्धिवर्धक), केशर (त्वचाकांती, वायु-कफनाशक), पिस्ता (बलवर्धक), किसमीस (रक्तवर्धक, बलवर्धक), आवळा (शक्तिवर्धक, पित्तनाशक), खोबरे (बलवर्धक), लवंग (, सुपारी (पाचक, त्रिदोषनाशक), दालचिनी (सुगंधित, पाचक), अस्मनतारा (कफनाशक), खडीसाखर (मधुर), भिमसेनी कापूर (मुखदुर्गन्धी), खारिक (रक्तवर्धक, बलवर्धक), वेलदोडा (गर्मी के रोगोंपर गुणकारी), गुलाबपाकळी (सुगंधी) इ. पदार्थांचे बहुगुणी फायदे सांगितले जातात. माहूरगड तसेच वणी येथे असा तांबूल विडा विकला जातो.

गुरूच्या मुखातील विडा प्रसाद म्हणून भक्षण करण्याचे महत्त्व गुरुशिष्यसंबंधात आहे. महानुभावांच्या लीळाचरित्र या ग्रंथात श्रीचक्रधरांनी आपल्य शिष्यांना प्रसाद म्हणून उष्टा विडा दिल्याचे अनेक उल्लेख आहेत. माहूरगडावरही देवीच्या मुखातील पानाचा विडा कुटून भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. तांबूल हे भारतीय लोकांच्या उल्हसित वृत्तीचे एक रंगदार प्रतीक आहे. बहुजन समाजात पाहुणचारानंतर, दैनंदिन कष्टाची कामे करताना तसेच शौक म्हणूनही पान खाल्ले/दिले जाते. हा तांबूल विडा ग्रामीण तसेच नागर लोकसंस्कृतीत तसा नवीन नाही. गावगाड्यात माणसाला तो घटकाभर परस्परांशी हितगूज करायला भाग पाडतो. असा पवित्र तांबूल विडा शक्तिपीठांच्या तीर्थक्षेत्रस्थळी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. हाच नैवेद्य श्रद्धाळू भक्त देवीचा प्रसाद म्हणून आनंदाने घेतात. याचे प्रतिबिंब लोकसंस्कृतीच्या उपासकांच्या गीतरचनेत सातत्याने उमटल्याचे आढळते.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा