महाराष्ट्रातील गोंधळ हा विधिनाट्यप्रकार करणारे लोक किंवा जमात. त्यांना गोंधळी म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्याने महाराष्ट्रात गोंधळी समाजात कदमराई आणि रेणुराई या दोन जाती व त्यांच्या खिवार, भोपे, जोगते या उपजाती पहायला मिळतात. खिवार, भोपे व जोगते यांची उपजीविका भिक्षुकीवरच असते. कदमराई गोंधळी व रेणुराई गोंधळी हेही भिक्षुकी करतात. रेणुराई मध्ये भिक्षुकी (खिव) जास्त प्रमाणात केली जाते. दिवाळी-दसरा सणाला हे गोंधळी कलावंत संबळ-तुणतुणे घेऊन भिक्षुकी करतात. भोपे, खिवार, जोगते हे  गल्ली-बोळातून भिक्षा मागत फिरतात. खिवार गोंधळ्यांचा संबळ आकाराने लहान व पितळी धातूपासून बनवलेला असतो. मुख्य कलावंत घोळ अंगरखा, गळ्यात कवड्याची माळा, देवीचा टाक घालून भिक्षुकी करतात. त्यांच्या एका हातात संबळ आणि डाव्या हातात तुणतुणे असते. दान देणाऱ्या दात्याची नावे ते करपल्लवीने (करपावली) ओळखतात. जोगती किंवा जोगते हातात परडी-पोत घेऊन जोगवा मागतात. कदमराई गोंधळी समाजात वडिलोपार्जित शेती करतात. काही मजुरी व भिक्षुकी करतात.रेणुराईचा संबळ लहान आकाराचा असून कदमराई चा संबळ मोठ्या आकाराचा, लोखंडी जाडगोल-घुमट आकाराचा,कळीदार असतो. प्रत्येक कळीवर खिळा (रिबीट) मारलेला असतो. संबळाचा गजमुख (गाशा) पिंपळपानाच्या आकाराचा तर रेणुराईचा चौकोनी आकाराचा असतो. गोंधळ सादरीकरणात ४० ते ५० मीटर पांढऱ्या कापडाचा झगा (झब्बा), डोक्यावर बांधणीचे पागोटं (पगडी),अंगावर लालरंगाचा पंचा (शाल) तर साथीदार (झिलकरी) सादरीकरणात साथसंगत करतात.

गोंधळात संबळ, तुणतुणे, मंजिरा,खंजिरी (दीमटी) अशी वाद्ये असतात. संचात (चमू) १० ते १२ कलावंत असतात. दहा कलावंतांचा संच ‘जांभुळआख्यान’ सादर करतो. यात पाच पांडव, द्रौपदी, श्रीकृष्ण, कुंती, कर्ण इत्यादी पात्र असतात. प्रेक्षकास नाट्यभास व्हायला नको, खरं विधिनाट्य वाटावं म्हणून जास्त कलावंत असतात. रात्रभर गोंधळासाठी अनेक तर एक-दोन तासासाठी दोन-तीनही गोंधळी कलावंत गोंधळ करतात. गोंधळात प्रथम घटस्थापना होते. चौक भरण्यासाठी चौरंग-पाटावर (पिढं) तांदळाची रास घालून चौकार भरला जातो. चौकावर खारीक-खोबरे, तांबडी सुपारी, लेकुरवाळे हळद (हळकुंड), ५ ते ११ कोनावर पानविड्यासह मांडणी करतात. अग्र भागावर तांब्याचा कलश, त्यावर विड्याची पाने किंवा आंब्याची पाने खोवतात. समोर पानावर श्रीफळ (नारळ) ठेवतात. पाच ज्वारीचे ताटवे किंवा उसाची वाढे बांधून उभी करतात. त्यास फुलवरा (पापड्या) बांधून फलहार किंवा नागिन पानाची माळही घातली जाते. पूजेसाठी फुलहार, फुले, फळे, हळद, कुंकू, गंध,नैवेद्य- पुरणपोळी, भाजी, तांबुल (कुटलेले) इत्यादी पूजासाहित्य असते. गोंधळाची सुरुवात ही तेहतीस कोटीदेव-देवतांना आवतन, देवी-देवतांना देव-आळवण म्हणून करतात. गणपती नमन (गण) होते. देव-दैवतांची स्तुतीपर कवणे, पदं गायिली जातात. गोंधळाचा मुख्य गाभा (कणा) म्हणजे कथा, आख्यान असतो. याशिवाय गोंधळ पूर्णत्वास जात नाही. कथा-रामायण,महाभारत, राजाविक्रम, जयाराणी, राजा हरिश्चंद्र या पौराणिक पात्रांवर आधारित असते. सत्यवान-सावित्रीआख्यान, जांभुळआख्यान, नामदेवाचं लग्न, निळावंती, पोवाडे इत्यादी बाबी सादर केली जातात. धुप-दीप, दिवटी (दिपीका) पेटवून पूर्वरंगात गोंधळाची सुरुवात होते तर उत्तररंगात धूप-आरतीने मनोभावे महाआरती होऊन गोंधळाची सांगता होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा