काताबद्दल प्रसिद्ध असलेला काटेरी वृक्ष. खैर-बाभूळ, खदिर वगैरे नावांनी ओळखली जाणारी वनस्पती असून फॅबेसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅकेशिया कॅटेच्यू आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतापासून भारतातील आसामापर्यंत आणि म्यानमारमधील रुक्ष मैदानांत हा वृक्ष आढळून येतो. भारतातील पश्चिम घाट, आंध्र प्रदेश, पंजाब इ. प्रदेश आणि हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंत हा आढळतो.
खैर हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्ष ९-१२ मी. उंच वाढतो. फांद्या कोवळेपणी हिरव्या, तर जुन झाल्यावर करड्या व खरबरीत होतात. काटे लहान पण टोकाला वाकडे असतात. पाने संयुक्त व पिसांसारखी असून दलांच्या १०-१२ जोड्या असतात. लहान दले असंख्य व बिनदेठांची असतात. फुले पिंगट पिवळी व पानांच्या बगलेत कणिशावर येतात. शेंगा पातळ, पिंगट, सरळ, ५-८ सेंमी. लांब व टोकास चोचीसारख्या असतात. त्यात ३-१० बिया असतात.
खैराचे लाकूड अतिशय कठिण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. तासून व रंधून ते गुळगुळीत होते. शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे, मुसळ, घाण्याच्या लाटा, होड्या, खांब, तलवारीच्या मुठी इ. कामांस ते उपयुक्त असते. जळणासाठी तसेच कोळशाकरिता ते वापरतात. खोडाच्या लालसर मध्यकाष्ठापासून पाण्यात उकळून काढलेल्या पदार्थास कात (कॅटेच्यू) म्हणतात. काताचा उपयोग कपड्याला खाकी रंग देण्यासाठी होतो. कात औषधी आहे. मुखवासासाठी कात पानाच्या विड्यात वापरतात. कातडे कमाविण्यासाठी खोडाच्या सालीतील द्रव्य वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांना चारतात. कातामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅनिन द्रव्ये असतात.
खैर वृक्षाचे लाल खैर व सोन खैर असे दोन प्रकार आहेत. लाल खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अॅकेशिया चुंद्रा आहे. महाराष्ट्रात विशेषकरून हेच आढळत असल्यामुळे सामान्यपणे हेच खैर किंवा काताचे झाड असे मानतात.
सोन खैर या वृक्षाचे शास्त्रीय नाव अॅकेशिया पॉलिकँथा (अॅकेशिया सुमा) आहे. कातासाठी हेही झाड प्रसिद्ध असून ते उ. कर्नाटक व द. महाराष्ट्र येथे आढळते. याखेरीज प. बंगाल, बिहार, व श्रीलंका येथेही आढळते.
very informative sir