फ्यूमेरिक अम्ल

भौतिक व रासायनिक गुणधर्म :  रासायनिक सूत्र C4H4O4 ; रेणुभार  ११६.०७२ ग्रॅ./मोल; वितळबिंदू २८७से. ५४९फॅ. (बंद नळीत); घनता १.६३५ ग्रॅ./सेंमी.; पाण्यातील विद्राव्यता : २०से.ला. ४.९ ग्रॅ./लि.

फ्यूमेरिक अम्ल हे रंगहीन, गंधहीन स्फटिकरूपात आढळणारे एक कार्बनी अम्ल आहे. पाण्यात, संहत सल्फ्युरिक आम्ल आणि अल्कोहॉलमध्ये विरघळणारे हे अम्ल अ‍ॅसिटोन आणि एथिल ईथरमध्ये अंशत: विरघळते तर बेंझिन आणि क्लोरोफॉर्ममध्ये विरघळत नाही. २०० से. तापमानाला फ्यूमेरिक अम्लाचे संप्लवन होते आणि स्फटिक रूपातील फ्यूमेरिक अम्ल द्रव अवस्थेत न जाता वायू अवस्थेत रूपांतरित होते. या अभिक्रियेत मॅलेइक ॲनहायड्राइड व पाणी तयार होते.

आढळ : नैसर्गिक रीत्या हे अम्ल अफूच्या कुळातील वनस्पती जसे पित्तपापडा (फ्यूमेरिया ऑफिसिनॅलिस ),  कवके (हरितद्रव्यविरहित बुरशीसारख्या वनस्पती), शैवाक(दगडफूल) आणि आइसलँड मॉस यासारख्या वनस्पतींमध्ये आढळते. सफरचंदापासून मिळणाऱ्या मॅलेइक अम्लापासून कृत्रिम पध्दतीने फ्यूमेरिक अम्ल तयार केले जाते. हे अम्ल मॅलेइक अम्लाचे समघटक असलेले (रेणूसूत्र सारखेच परंतु संरचना भिन्न) डायकार्बॉक्सिलिक अम्ल आहे. फ्यूमेरिक अम्ल हे द्विक्षारकीय अम्ल आहे, म्हणजेच अभिक्रियेदरम्यान द्रावणात दोन हायड्रोजनचे आयन मुक्त होतात.

उत्पादन : फ्यूमेरिक अम्ल सर्वप्रथम सक्सिनिक अम्लापासून तयार करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीनुसार फ्यूमेरिक अम्ल तयार करण्यासाठी व्हॅनेडिअम असलेला उत्प्रेरकाच्या साहाय्याने क्लोरेटचा वापर करून फुरफुरालचे (मक्यावर प्रक्रिया करुन मिळणाऱ्या सेंद्रिय संयुगाचे) ऑक्सिडीकरण केले जात असे.

 आता औद्योगिक उत्पादन प्रक्रियेत मॅलेइक अम्लापासून उत्प्रेरक समसूत्री रूपांतरण पद्धतीने फ्यूमेरिक अम्ल मिळविले जाते.

उपयोग : बऱ्याच प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये फ्यूमेरिक अम्लाचा वापर केला जातो. टार्टारिक अम्ल आणि सायट्रिक अम्लाला पर्याय म्हणून फ्यूमेरिक अम्ल वापरले जाते. पेय पदार्थांमध्ये तसेच खायच्या सोड्यामध्ये याचा वापर करतात. मेक्सिकोमध्ये ब्रेड तयार करण्याच्या गव्हाच्या पीठामध्ये फ्यूमेरिक अम्ल वापरतात.

संशोधनानुसार अर्बुद (tumour) अथवा त्याभोवती असलेल्या जैविक द्रवामध्ये या सेंद्रिय अम्लाचे जास्त प्रमाण आढळले आहे. त्यामुळे फ्यूमेरिक अम्लाचा कर्करोगकारक चयापचयी घटकामध्ये समावेश केला आहे. विसर्पिका (Psoriasis)या त्वचाविकारावर उपचारात फ्यूमेरिक अम्ल असलेली औषधे वापरली जातात. पॉलिएस्टर रेझिन, पॉलिहायड्रिक अल्कोहॉल तसेच छपाईची शाई आणि रंगांमध्ये फ्यूमेरिक अम्लाचा वापर करतात.

संदर्भ :

प्रतिक्रिया व्यक्त करा