झाडीपट्टीतील लोकनाट्य. दंडार आणि खडी गंमत या दोन लोकनाट्यांनंतर लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरणारे हे लोकनाट्य होय. रात्रभर चालणारा हा लोकरंजनप्रकार राधा या एकाच पात्राभोवती फिरत असतो. खडी गंमत या झाडीपट्टीतील अन्य लोकरंजनप्रकाराला राधा हे लोकनाट्य जवळचे आहे. किंबहुना खडी गंमतमधील गौळण तशीच ठेवून तिचा केलेला विस्तार म्हणजे राधा होय अशी राधेची ढोबळमानाने व्याख्या करता येते. राधा ही झाडीपट्टीतील तमाशाचीच प्रतिकृती आहे असेही मत आहे. तिचे मूळ तमाशाप्रमाणेच खडी गंमत या विदर्भातील अतिप्राचीन लोकनाट्यात आहे असे म्हटले जाते. किंबहुना या परिसरात पुरातन काळापासून प्रचलित असलेल्या दंडारीचे त्यावर कलम करून राधा हा नवीन रंजनप्रकार उदयास आला आहे. दंडारीच्या अशाच हलक्या फुलक्या प्रकाराला ‘खडी दंडार’ असे नाव देऊन नामसाम्यासह आता खडी गंमत दाखवायला लागले आहेत. तर ‘राधा’ हे वेगळे नाव घेऊन तिने दलितांच्या कलाविष्काराला स्वतंत्र व्यासपीठ मिळवून दिले आहे.
गावातल्याच एखाद्या गोऱ्या गोमट्या मुलाला साडी नेसवायची आणि डफ घेऊन फिरायचे, हा बिदागी किंवा बोजारा मागण्याचा प्रकार सर्वत्र आढळतो. होळीच्या काळात तर हे दृश्य विशेषत्वाने पहायला मिळते. त्यासाठी ‘राधा नाचवणे’ असा शब्दप्रयोग प्रचलित आहे. ग्रामीण वातावरणात वाढलेली आणि पोसलेली राधा तशी अश्लिलतेला अधिक वाव देणारी असते. अश्लिलतेच्या अतिरेकामुळे दीर्घकालपर्यंत केवळ पुरुषांकरिता असे स्वरूप या रंजनप्रकारास आले होते. कोणत्याही रंगमंचाची अपेक्षा नसलेला हा रंजनप्रकार एखाद्या चौकात किंवा उंचवट्याचा आधार घेऊन सादर होतो. जाहिरातीची आवश्यकताच नसते. संध्याकाळी ठरले आणि पाचसात जण एकत्रित आले की राधा हे नाट्य उभे केले जाते. दोन तीन वाक्ये बोलून झाली की गाणे आणि त्यावर राधेचा नाच असे स्वरूप असलेला हा रंजनप्रकार लोकप्रिय आहे. राधा या लोकनाट्यातील कलाकार आणि प्रेक्षक दोघेही बहुधा निरक्षर असतात. लोकांच्या भाषेतील कामुक प्रश्न,अश्लील कोट्या आणि सवंग विनोद याचा वापर या लोकनाट्याच्या निवेदनात जास्त होतो. परंपरेनुसार हा लोकरंजनप्रकार केवळ दलितांच्यापुरताच मर्यादित होता. आपल्याला वंशपरंपरेने प्राप्त झालेली लोककला म्हणून दलित ही तिची अतिशय अत्मियतेने आणि सजगपणे जोपासना करीत होते. पण लोककलांना आधुनिक प्रसारमाध्यमांच्या जो सामना करावा लागला त्यात लोककला अस्तंगत होण्याच्या बेतात आल्या, त्यात राधा हे लोकनाट्य समाविष्ट आहे.
संदर्भ :
- लांजे, हिरामण, समग्र झाडीपट्टी, विवेक प्रकाशन, नागपूर, २००६.