अंकिया नाट : अंकिया नाट आसाम राज्यातील पारंपरिक लोकनाट्य आहे. या लोकनाट्यात भाओना या नाट्य अंगाचे सादरीकरण केले जाते. भाओनाचा मुख्य अर्थ आहे भाओलोआ, म्हणजे अभिनयाद्वारे भाव-भावना प्रकट करणे. आसाम मधील सत्रामध्ये (मठ) आंकिया नाट सादरीकरणाची परंपरा आहे. या नाट्याचे प्रणेते प्रसिद्ध वैष्णव संत शंकरदेव हे होत. या नाट्यशैलीच्या सादरीकरणामध्ये आसाम सोबतच बंगाल,ओडिशा व वृंदावन – मथुरा या ठिकाणच्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. या नाटकांमध्ये प्रामुख्याने ब्रज भाषेचा वापर केला जातो. याबरोबरच बंगाली, बिहारी व ओडिसी या भाषांचाही प्रयोग केला जातो. वैष्णव धर्मावर आधारित असल्यामुळे अंकिया नाट यामधील कथा या कृष्णलीला आणि रामायण यातील प्रसंगावर आधारित आहेत. जन्माष्टमी, नंदोत्सव, ढोलयात्रा, रासपौर्णिमा अशा समयी याचे सादरीकरण केले जाते. मात्र सद्यस्थितीत अधिक लोकप्रिय झाल्यामुळे अन्य काळातही याचे सादरीकरण केले जाते. शेतातील कामातून मोकळीक मिळाल्यानंतरच्या काळात या नाटकांचे सादरीकरण केले जाते. अंकिया नाट या नाट्यामध्ये संस्कृत कथा व आसामी नाट्यपरंपरेचे एक अद्भुत मिश्रण पहायला मिळते. सूत्रधार दोन वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजेच संस्कृत आणि ब्रज भाषा किंवा असामी या भाषेमध्ये आपले भाव व्यक्त करतो.

भाओना ज्या ठिकाणी सादर केले जाते त्या ठिकाणास भाओना घर असे म्हणतात. भाओना घरमंडप साधारणपणे ९० मीटर लांब व १५ मीटर रुंद असतो. मंडपाच्या चारही बाजूंना धार किंवा पडदा नसतो, त्यामुळे दर्शक बसून किंवा उभे राहूनही याचे सादरीकरण पाहू शकतात. मंडपाच्या दुसऱ्या बाजूस संगीत मंडळाचे स्थान असते, त्यांना गायन बायन असे म्हणतात. यामध्ये मृदंग, रेहरी गोमुख, करताल, झांज आणि  टाळ या वाद्यांचा समावेश होतो. मंडपापासून थोड्या अंतरावर छतर तयार केली जाते, ज्याला छद्म गृह किंवा सज्जा गृह असे म्हणतात. अन्य लोकनाट्यशैलीप्रमाणे भाओनाचे हे सादरीकरण पूर्वरंग द्वारा सुरू केले जाते ज्याला धेमाल म्हणतात. त्यानंतर सूत्रधाराचा प्रवेश होतो जो नाट्याच्या कथेचा व नाटकातील पात्रांचा दर्शकांना परिचय करून देतो. मुख्य नायकाच्या प्रवेशासोबतच प्रवेश गीत गाण्याचे सुद्धा प्रचलन आहे. त्यानंतर एक पांढरा पडदा टाकून पूर्वरंग समाप्त झाल्याची सूचना दिली जाते व पुढे विविध पात्रांचा प्रवेश व त्यांचा परिचय या नाट्यशैलीनुसार सादर केला जातो.

भाओनामध्ये शुद्ध नृत्य आणि स्वांग या दोन्हीचे मिश्रण पाहायला मिळते. मोठ्या नाटकांना ‘नाट’ तर छोट्या नाटकांना ‘झुमुरा’ असे म्हणतात. झुमरामध्ये अधिकतर माधवदेव यांच्या रचना असतात. झुमुराचे प्रदर्शन दुपारपासून पूर्ण रात्रभर चालू असते आणि पहाटे मुक्ती मंगल याच्या अनुष्ठानच्या समाप्तीनंतर संपते. कधीकधी अनेक गाव एकत्र येऊन अनेक दिवस भाओना प्रदर्शन करतात. या प्रदर्शनांना “बडा केलीआ भाओना” असे म्हणतात. भाओना ही लोकनाट्य प्रामुख्याने ब्रज या जुन्या मध्ययुगीन काळातील काव्य आसामी मिश्र भाषेत लिहिली गेली आणि मुख्यत: कृष्णावर केंद्रित आहेत. भाओनामध्ये सहसा थेट वाद्ये आणि गायक, नृत्य आणि उत्कृष्ट पोशाख यांचे मिश्रण केले जातात.

भाओनामध्येही स्त्री पात्र पुरुषाद्वारेच सादर केले जातात. साडी किंवा मेखला यांच्यासोबतच कृत्रिम केस यांचा प्रयोग केला जातो. विविध पात्रानुसार टेराकोटा किंवा बांबू याचे मुखवटे तयार करून त्यांना लाल, पिवळा, निळा वा काळा या रंगांनी सजविले जाते. अंकिया नाट यामधील नाटकांना आसामी साहित्याची मान्यता प्राप्त आहे. इतर आसामी साहित्याप्रमाणेच या नाटकांना या साहित्यामध्ये विशेष स्थान देण्यात आलेले आहे. नाटकातील अंक, दृश्यप्रसंग यांना वेगवेगळे न करता कथेनुसार सर्व प्रसंग एकत्रितपणे सादर केले जातात. नृत्य, गीत, अभिनय यासोबतच गद्य भागांचाही प्रयोग उत्कृष्टपणे केला जातो. श्रीकृष्णाची पूजा करणे हा अंकिया नाटचा मुख्य विषय आहे. अंकिया नाटातील गाणीही वर्णनात्मक आहेत.

संदर्भ :