महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीपैकी एक. कर्नाटकातील धारवाड आणि बिजापूर जिल्ह्यात मुख्यता त्यांची वस्ती आहे. महाराष्ट्रातील सोलापूर,कोल्हापूर तसेच सीमाभागात हे लोक आढळतात. तेलगु बोरा आणि तमिळ वेडन यांच्याशी या जमातीचा जवळचा संबंध आहे. कन्नया नावाच्या पुरुषापासून या जमातीची उत्पत्ती झाली असे एक लोकमत आहे. काही अभ्यासक त्यांचे नाते वनवासी कदंब लोकांशी जोडतात. महर्षी वाल्मिकी यांना ते आपला पूर्वज मानतात आणि रामाची भक्ती करतात. राष्ट्जात अशीही एक ओळख या जमातीची करून दिल्या जाते. रामोशी आणि बेरड या दोन जमातीत शरीराची ठेवण आणि राहणीमान याबाबतीत साम्य आहे.सुरुवातीस बेरड व रामोशी हे एकाच जातीचे असून भाषा आणि वास्तव्य यावरून दोन जाती झाली असल्याचे मांडले जाते. खास बेरड, दुर्गामुर्गी बेरड, हलगे बेरड, जास किंवा यास बेरड, नेकमकुल बेरड व रामोशी बेरड असे वर्गभेद बेरड जमातीत आहेत. पेशव्यांच्या काळात बेळगाव जवळच्या चिकोडी येथे बेरडांचे मुख्य ठाणे होते. कन्नड आणि मल्याळी मिश्रभाषा या जमातीत बोलली जाते. व्यवसायाच्या निमित्ताने ते सांकेतिक भाषेचा वापर करतात. रामोशी-बेरड समाज शूर, धाडशी, काटक व इमानी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची व गावाची राखण करतात. एखाद्याच्या चोरीचा तपास लावून देतात. त्याला माग काढणे असे म्हणतात. हा त्यांचा मुख्य व्यवसाय. इंग्रजांच्या काळात त्यांच्या वाट्याला उपेक्षित जीवन आले. ते गांव सोडून रानावनात राहू लागले. मानववस्तीचा संपर्क तुटला त्यामुळे त्यांचे हाल होऊ लागले. नाईलाजाने बेरड रामोशी गुन्हेगारी कडे वळले. अलीकडच्या काळात काही रामोशी-बेरड शेती व्यवसाय करतात. त्याबरोबर जोड धंदा म्हणून कुक्कुट्पालन व पशूपालन करणे त्यांनी करणे त्यांनी पसंत केले आहे. शिकलेले शासकीय नोकर्‍या करीत आहेत. डोक्याला टापर किंवा एखादे फडके गुंडाळतात. अंगात सदरा, ठासून गुढग्यापर्यंत धोतर नेसतात, दाढी-मिशा वाढलेल्या, पायात जाड वाहणा असा बेरडांचा पोशाख असतो. बेरड लोकांची दुर्गा, मल्लिकार्जुन, मारोती, यल्लमा व खंडोबा ही दैवते आहेत. महाराष्ट्रातील सोलापुरकडील बेरड समाज अंबाबाई,जोतीबा आणि खंडोबा तर पुण्याकडील लोक जनाई जोखाई यांना मानतात. देव अंगात येणे हा प्रकार त्यांच्यात आहे. ज्याच्या अंगात येते तो माणूस हुई हुई करत नाचतो. त्याला देवाचे झाड म्हणतात. भूत लावणे, भुताला देवाच्या भगताकडून पळवून लावणे हे काही प्रकार प्रचलित आहेत. वेदना शमाव्यात म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जातीच्या घराकडे पाहून दात कर कर वाजवतात. त्याने वेदना शमते असा त्यांचा समाज आहे. रामोशी-बेरड समाजात माणूस मेल्यानंतर आक्रोश करणे, ऊर बडवून घेणे, हंबरडा फोडून अश्रू ढाळने, दु:ख व्यक्त करणे, इतर समाजाप्रमाणेच आहे. ज्या घरचा माणूस वारला असेल त्या घरा समोर दहा-वीसजण हलग्या वाजवतात. जातपंचायतीचे वर्चस्व रामोशी-बेरड समाजातही आहे.समाजातील वयोवृध्द, मुरब्बी व अनुभवी व्यक्तीला पंचाचा मान दिला जातो. कट्टीमणी हा जातीप्रमुख लोकांचे तंटेबखेडे सोडवितो.

संदर्भ :

  • पाटील, पंढरीनाथ, भटके भाईबंद, सुरेश एजेन्शी, पुणे ,१९९१.

समीक्षक – अशोक इंगळे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा