लोकसाहित्याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करणारे अ‍ॅलेक्झँडर हगेत्री क्राप या लेखकाचे १९३० साली प्रकाशित झालेले पुस्तक. मॅक्स म्युलर, हार्टलंड यांनी दैवतकथा व परीकथा यांच्या शास्त्रीय स्वरूपाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर लोकसाहित्याच्या अनेक अंगोपांगांची चर्चा वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्रसंगविशेषी केली. त्या सर्व चर्चांच्या अनुरोधाने क्रापने लोकसाहित्याच्या सर्व अंगोपांगांचे सारपूर्ण विवेचन या ग्रंथांत केलेले आहे. फ्रेंचमध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासास मार्गदर्शक अशी पुस्तके निघाली होती. जर्मनमध्ये टाइम्सची Handbuecher der Volkskunde (लोकसाहित्याच्या मार्गदर्शिका) ही प्रकाशने पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच प्रसिद्ध झाली होती. इंग्रजीत अशा तर्‍हेचे सुटसुटीत व स्वतंत्र ग्रंथरूपी वाङ्मय नव्हते. अ‍ॅलेक्झँडर क्राप या अमेरिकन प्राध्यापकाला ही उणीव ब्रिटिश फोकलोअर सोसायटीच्या समारंभाच्या परिषदेच्या वेळी तीव्रतेने जाणवली आणि तो हे पुस्तक लिहिण्यास उद्युक्त झाला. स्वतःच्या अभ्यासातून ज्या कथांचे व प्रथांचे व्यवस्थित ज्ञान झाले, त्यांचाच केवळ उपयोग क्रापने या पुस्तकात उदाहरणादाखल केलेला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकाला त्याचा उपयोग होतो तो याच कारणाने. क्रापच्या ग्रंथाची विभागणी अठरा प्रकरणांत झालेली असून, शेवटले सोडल्यास, प्रत्येक प्रकरणात लोकसाहित्याच्या एकेका अंगाचा विचार केलेला आहे. ती प्रकरणे अशी (१) परीकथा किंवा अद्भुतकथा (२) नर्मकथा (३) प्राणिकथा (४) स्थानिक कथा (५) भटकी कथा (६) गद्य सागा (७) म्हणी (८) लोकगीत (९) पोवाडा (१०) मंत्र, तोडगे व कोडी (११) लोकभ्रम (१२) वनस्पतिविद्या (१३) प्राणिविद्या (१४) खनिजविद्या, नक्षत्रविद्या, उत्पत्तिकथा (१५) प्रथा आणि विधि (१६) जादुटोणा (१७) लोकनृत्य व लोकनाट्य. ‘बारा पुस्तकांतले संदर्भ एकत्र करून तेरावे पुस्तक स्वतःचे म्हणून काढायचे’ ही कल्पना त्याला रुचली नाही. या दृष्टीने व्यापक आणि तौलनिक धोरण व स्वतंत्र बाणा कायम ठेवून लिहिलेल्या या ग्रंथाचे मोल असाधारण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा