जमिनीवर पसरून वाढणारी एक वर्षायू वेल. या वेलीच्या फळाला कलिंगड किंवा टरबूज असेही म्हणतात. कुकर्बिटेसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रूलस व्हल्गॅरिस असे आहे. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच ईजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.
कलिंगडाच्या वेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. खोडे वार्षिक आणि प्रतानरोही असतात. प्रताने साधी असतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. पानांच्या काठाला पु्ष्कळ खाचा असतात. पानांची लांबी १२-१५ सेंमी., तर रुंदी ५-७ सेंमी. असते. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी (क्वचित लांबट वाटोळी) आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. निरनिराळ्या फळांतील मगज कमीअधिक गोड पण थंड व तहान भागविणारा असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० % असते. याशिवाय कलिंगडात अ आणि क जीवनसत्त्वे तसेच अल्प प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदके असतात. बिया आकाराने लहान व चपट्या असून त्यांचा रंग पांढरा, काळा किंवा करडा असतो, बियांपासून फिकट तेल मिळते. ते खाद्य व दिव्यांसाठीही उपयुक्त असते. कलिंगडाच्या सालीचा रंग, मगजाची चव व रंग आणि फळांचा आकार यांनुसार पांढरे, काळे, साहेबी, कबरा, सुरई, कलमी व चित्रा अशा नावांचे प्रकार पडलेले आहेत, कलिंगडाची फळे थंडावा देणारी व लघवी साफ करणारी तर बिया पौष्टिक असतात. बिया पियुष व थंडाईसारख्या पेयात वापरतात.
कलिंगडाच्या लागवडीकरिता नदीपात्रातील वाळूयुक्त गाळाची, कसदार व उत्तम निचर्याची जमीन लागते. काही भागांत शेतातही कलिंगडाची लागवड करतात. चार-पाच महिन्यांत फळे पिकतात. कलिंगडावर मर, खोडावरील डिंक्या आणि करपा हे रोग पडतात. रोग निवारण्यासाठी कवकनाशके फवारतात. काही देशांत बिया नसलेल्या कलिंगडाच्या जाती विकसित केल्या आहेत. जपानमधील झेंत्सुजी भागातील शेतकर्यांनी घनाकृती आकाराची कलिंगडे तयार केली आहेत. फळ लहान असताना ते काचेच्या पेटीत वाढून देतात. फळ मोठे झाले की त्याला आपोआप चौरसाकृती घनाकार प्राप्त होतो.
Nice information
Thanks