(अठराव्या शतकाचा उत्तरार्ध–एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध). प्रसिद्ध शाहीर. संपूर्ण नाव होनाजी सयाजी शिलारखाने. जातीने नंदगवळी, पंथाने लिंगायत आणि धंद्याने गवळी. ह्याच्या घराण्यात किमान तीन पिढ्या शाहिरी पेशा चालत आलेला दिसतो. प्रसिद्ध शाहीर साताप्पा किंवा सातप्पा हे त्याचे आजोबा, तर बाळा बहिरू हे शाहीर त्याचे चुलते. ह्या दोघांच्या काही लावण्या उपलब्ध आहेत. होनाजी लावण्या रचित असे आणि त्याचा मित्र बाळा कारंजकर हा त्या सुरेल आवाजात गात असे. होनाजी आणि बाळा ह्या जोडीमुळे होनाजीच्या तमाशाला ‘होनाजी बाळाचा तमाशा’ असे नाव पडले. होनाजीच्या लावण्यांतही होनाजी बाळा असे जोडनाव गोवलेले आहे. लावण्या आणि पोवाडे मिळून त्याच्या सु. दोनशे रचना भरतात. होनाजी बहुश्रुत होता आणि संस्कृत प्रचुर मराठीशी त्याचा चांगला परिचय असावा. आपल्या पौराणिक लावण्यांत त्याने कवी श्रीधर आणि मुक्तेश्वर ह्यांचे अनुकरण केले आहे, ही बाब ह्या संदर्भात लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्या लावण्यांत शृंगारपर लावण्या अधिक आहेत. आपल्या लावण्यांतून त्याने प्रीतीच्या छटा – विशेषतः स्त्रियांच्या भावना – समरसतेने रंगविल्या आहेत. अश्लील लावण्याही त्याने लिहिल्या आहेत. दुसऱ्या बाजीरावाची त्याच्यावर विशेष मर्जी होती. दुसऱ्या बाजीरावाला खूष करण्यासाठी त्याने काही लावण्या रचल्या. दुसऱ्या बाजीरावाच्या प्रोत्साहनाने त्याने रागदारीत लावण्या रचावयास सुरुवात केली, असे म्हणतात. लावण्या रागदारीत रचल्यामुळे फडावरील लावणी बैठकीत प्रविष्ट झाली. प्रासादिकता हे त्याच्या रचनांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य. होनाजीने रचिलेल्या पोवाड्यांत खर्ड्याच्या लढाईवरचा त्याचा पोवाडा प्रसिद्ध आहे. होनाजीने रचिलेली ‘घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ ही भूपाळी विशेष लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध चित्रपटदिग्दर्शक  व्ही. शांताराम यांनी अमर भूपाळी ह्या नावाने होनाजीवर चित्रपट काढला आहे. चित्रशाळा, पुणे ह्या प्रकाशन संस्थेने होनाजी बाळा यांच्या लावण्या प्रसिद्ध केल्या (१९२४).

संदर्भ :

  • केळकर, य. न. संपा., अंधारातील लावण्या, १९५६.
  • धोंड, म. वा. मर्‍हाटी लावणी, मुंबई, आवृ. पहिली, १९५६ आवृ. दुसरी, १९८८.
  • मोरजे, गंगाधर, मराठी लावणी वाङ्मय, पुणे, १९७४.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

This Post Has One Comment

  1. SRweb

    होनाजी बाळा यांच्या बद्दलची माहिती आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा