महाराष्ट्रातील एक देवता. ग्रामदेवता वा लोकदेवता म्हणूनही म्हसोबाचा उल्लेख केला जातो. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा, या स्वरूपात तो गावोगावी आढळतो. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते. रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा इ. प्रसंगी त्याला बकरी, कोंबडी, नारळ इ. अर्पण करतात.
‘महिषासुर’ या सामासिक शब्दातील ‘महिष’ या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक ‘बा’ हा प्रत्यय जोडून ‘महिषोबा’ असा शब्द बनला असावा आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘म्हसोबा’ हे रूप तयार झाले असावे. म्हसोबा ही मूळची अनार्य देवता असावी इ. मते अभ्यासकांनी मांडली आहेत. म्हसोबा हा भुतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ वेताळाइतके असते इ. प्रकारच्या श्रद्धा आढळतात. विदर्भ वगैरे भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करतात. तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते, अशी श्रद्धा आढळते. इतर घाणेवाल्यांना म्हसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख आढळतो. म्हसोबाच्या यात्रा अनेक ठिकाणी भरत असून ठाणे जिल्ह्यातील म्हसे (ता. मुरबाड) गावी पौष पौर्णिमेला भरणारी यात्रा ही त्याची एक प्रमुख यात्रा आहे.
Nice