महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात.

संदर्भ :

  • व्हटकर, अर्जुन (संपा.), लोकसंस्कृतीच्या बळदातील धन, औरंगाबाद, २०११.

This Post Has One Comment

  1. Sahadev

    I want to know abt yedeswari Aai means kontya rupat ti yermalyat aali. Tiche 7 bahinichi nave. Tila pardi ka aahe? Karan bolanaryanche bharpur Katha aahet yedu Aai baddal tuamule Aai che khare rup nahi samjat ti kon aahe. Aani tichi vidhya konti

Comments are closed.