श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात,म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात.भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन नागासह वर आला.तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते.नाग हे द्रविड लोकांचे दैवत होते; पण आर्य व द्रविड यांच्या मिश्रणानंतर नागपूजा सर्वत्र सुरू झाली, असे म्हणतात. मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा एक भयंकर प्राणी आहे. म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली,तर त्यापासून भय राहणार नाही, या कल्पनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी.
हा सण मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. या दिवशी प्रत्यक्ष नागाची पूजा करतात किंवा नागाची मातीची प्रतिमा करून अथवा रक्तचंदनाने वा हळदीने पाटावर नवनागांच्या आकृती काढून त्यांची पूजा करतात.गारुडी लोक खरे नाग घेऊन घरोघरी हिंडतात.लोक नागाला दूध, लाह्या इ. पदार्थ वाहून त्याची पूजा करतात.स्त्रिया व मुली या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची वा मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात.जमीन खणणे, नांगरणे, भाज्या चिरणे वगैरे गोष्टी या दिवशी वर्ज्य मानलेल्या आहेत.गाणी गाणे,फेर धरणे,झोपाळे बांधून झोके घेणे, विविध खेळ खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात.
भारतात सर्व प्रांतांत हा सण साजरा करतात. काशीमध्ये ‘नागकूप’ नावाचे तीर्थ आहे. विद्वान पंडित या दिवशी शास्त्रचर्चा करतात आणि नागकूपावर जाऊन नागाची पूजा करतात. प्रसिद्ध वैयाकरण पतंजली हा शेषाचा अवतार असून त्याचे वास्तव्य नागकूपात आहे,अशी समजूत त्यामागे आहे. बंगालमध्ये सर्पदेवता मनसादेवीची,तर राजस्थानमध्ये पीपा, तेजा इ. नागदेवांची पूजा करतात. प्रांतपरत्वे या दिवशीच्या नागपूजनात थोडाफार फरक आढळतो.
‘नागपंचमी व्रत’ नावाचे स्त्रियांनी आचरावयाचे एक व्रतही आहे. त्यात अनंत, वासुकी इ. अष्टनागांची पूजा करून उपवास करतात. संध्याकाळी नागाची पूजा करून उपवास सोडतात.या व्रताच्या अनेक कथा प्रचलित आहेत. इतर सणांप्रमाणेच या सणाशी निगडित अशी सुंदर लोकगीते व इतर लोकसाहित्य मराठीत आढळते.