हिंदू पुराणकथांतील एक वृक्ष. स्वर्गातील मंदार, पारिजात, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन या पंचदेवतरूंत त्याची गणना असून तो इच्छित वस्तू देतो, अशी कल्पना आहे. भारतीय पुराणे व साहित्यातही त्याचे वर्णन आहे. विवेकसिंधूत (१·७७–७८) मुकुंदराजाने कल्पवृक्ष वर्णिला आहे. सुवर्णाच्या कल्पवृक्षदानाची गणना महादानात केली असून त्यामुळे महापातकनाश व विष्णुलोकप्राप्ती होते. हा वृक्ष कुरुप्रदेशात वाढतो व त्याच्यापासून मध, वस्त्रे व रत्ने निघतात असे वायुपुराणात म्हटले आहे. मानसार या ग्रंथात त्याचे तपशीलवार वर्णन आहे : त्याच्या खोडावर वेटोळे घातलेला सर्प असतो. वृक्षावर विविध वेली, विविधाकार पाने व विविधरंगी फुले असून देवता, विद्याधर व वानर यांचा वास असतो. सांची व भारहूत येथील शिल्पांतही कल्पवृक्ष आढळतो. बौद्ध, जैन तसेच ख्रिस्ती व इस्लाम ह्या धर्मांतही कल्पवृक्षाची कल्पना वेगळ्या स्वरूपांत आढळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा