पेशी (कोशिका) हे सजीवांचे एक मूलभूत व संरचनात्मक एकक आहे. रॉबर्ट हूक या इंग्रज शास्त्रज्ञाने १६६५ मध्ये बुचाच्या झाडाचा एक पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. त्या वेळी त्यांना कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील कप्प्याप्रमाणे रचना दिसून आली. यातील प्रत्येक कप्प्याला त्यांनी पेशी हे नाव दिले. एम. जे. श्लायडेन व श्वान या दोन शास्त्रज्ञांनी १८३८ साली पेशीच्या रचनेविषयी असा सिद्धांत मांडला की, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे.
प्रकार : १) आदिकेंद्रकी पेशी : या पेशीत महत्त्वाची अंगके आढळत नाहीत. फक्त प्रद्रव्य पटल, पेशीद्रव्य व केंद्रकद्रव्य एवढेच घटक आढळतात. उदा., बुरशी, शैवल. २) दृश्यकेंद्रकी पेशी : या पेशी वनस्पती आणि प्राणी यांमध्ये असून त्या विविध आकाराच्या असतात. यांमध्ये पेशीभित्तिका (Cell Wall) व पेशीद्रव्य (Cytoplasm) असते. मुख्यत: तंतुकणिका (Mitochondria), गॉल्जी पिंड (Golgi Complex), हरितलवके (Chlorophyll), अंतःप्राकल जालक (Endoplasmic Reticulum), केंद्रक (Nucleus) इत्यादी अंगके (Organelles) असतात.
रचना व कार्य : अ)पेशीभित्तिका आणि पेशीपटल (Cell Membrane) : पेशीभित्तिका फक्त वनस्पतिपेशीतच असतात. पेशीच्या बाहेरचे आवरण म्हणजे पेशीभित्तिका. ही सेल्यूलोजची बनलेली असते. पेशींना आकार आणि पेशींच्या आतील भागाचे संरक्षण पेशीपटलामुळे होते. पेशीभित्तिकेच्या खाली पेशीपटल हे पातळ आवरण असून ते नाजूक व लवचिक असते. पेशीपटल हे प्राणिपेशीचे सर्वांत बाहेरचे आवरण असते. ब) पेशीद्रव्य : पेशीद्रव्य हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते. पेशीद्रव्यात नत्र, पोटॅशियम, प्रथिन, विकरे इत्यादी असतात. पेशींची विविध अंगके यांमध्ये विखुरलेली असतात आणि त्यांद्वारे पेशींतील विविध क्रिया घडून येतात. क) केंद्रक : केंद्रकाचे १) केंद्रकपटल (Nuclear Membrane), २) केंद्रकद्रव्य (Nucleoplasm), व ३) केंद्रकी (Nucleolus) असे तीन भाग आहेत.
पेशीद्रव्य आणि त्यांमध्ये असलेली अंगके : अंगके ही पेशीद्रव्याचा महत्त्वाचा भाग आहेत. सर्व महत्त्वाची कार्ये अंगकांकडूनच केली जातात. उदा., आधार, साठवणूक, प्रजनन, श्वसन, अन्न तयार करणे इत्यादी. तंतुकणिका, गॉल्जी पिंड, रिक्तिका (Vacuole),अंतःप्राकल जालक,लवके (Plastids),रायबोझोम (Rhibosome) इत्यादी पेशीद्रव्यातील महत्त्वाची अंगके आहेत.
१) तंतुकणिका : पेशीद्रव्यामध्ये लहान गोलाकार कणिका असतात, त्यांना दुहेरी आवरण असते. पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम तंतुकणिका करतात. पेशीला गरज असेल तेव्हा ऊर्जा पुरवतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
२) गॉल्जी पिंड : गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी तयार झालेले असते. प्रथिनाचे योग्य वितरण करण्याचे काम गॉल्जी पिंडामार्फत होते. यामध्ये विविध प्रकारचे विकर साचले जातात.
३) रिक्तिका : रिक्तिका म्हणजे पोकळी. वनस्पतीमधील रिक्तिका आकाराने मोठ्या असतात. उत्सर्जित पदार्थ तसेच विविध स्राव तात्पुरते साठविण्याचे काम रिक्तिका करते.
४) अंतःप्राकल जालक : अंतःप्राकल जालक हे एक विस्तृत जाळीदार अंगक आहे. यामुळे सबंध पेशीला आधार मिळतो. पेशींमधील द्रव दुसरीकडे वाहून नेण्याचे काम अंतःप्राकल जालक करते. अंतःप्राकल जालिकेवर जेव्हा रायबोझोम असतात, तेव्हा त्याला खडबडीत अंतःप्राकल जालक म्हणतात आणि जेव्हा रायबोझोम नसतात, तेव्हा त्याला गुळगुळीत अंतःप्राकल जालक म्हणतात. वेगवेगळी कर्बोदके, प्रथिने, विकरे तयार करण्यासाठी अंतःप्राकल जालकाची मदत होते.
५) लवके : लवके मुख्यत: वनस्पती पेशीमध्ये आढळतात. रंग नसलेली आणि रंग असलेली अशी दोन प्रकारची लवके असतात. रंग नसलेली लवके अन्नाची साठवणूक करतात. रंग असलेल्या लवकांमध्ये हिरवा रंग असतो. त्यांना हरितलवके म्हणतात. पानांचा रंग हिरवा या लवकामुळे असतो. वनस्पतींमधील हरितलवके प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात.
६) रायबोझोम : ही लहान गोल अंगके पेशीद्रव्यात असून अंतःप्राकल जालकेवर असतात. प्रथिने आणि विकरे तयार करण्यासाठी रायबोझोम मदत करतात.
मायक्रोट्युब्युल्स : हे लहान नळीसारख्या आकाराचे असून पेशीद्रव्यामध्ये आढळतात. ते पाणी व ग्लुकोज यांचे वहन करतात, तसेच पेशीविभाजनामध्ये महत्त्वाचे काम करतात.
केंद्रक : केंद्रक हे पेशीचे सर्वांत महत्त्वाचे अंगक आहे. पेशीची सर्व कार्ये केंद्रकच नियंत्रित करते. गुणसूत्रे, डीएनए हे मुख्यत: केंद्रकामध्ये असतात. केंद्रकाचे केंद्रकपटल,केंद्रकद्रव्य, केंद्रकी हे तीन भाग असतात.
१) केंद्रकपटल : केंद्रकपटल सच्छिद्र असते. त्याच्या छिद्रातून पाणी, प्रथिने याचे पेशीद्रव्य आणि केंद्रकद्रव्य यात वहन होते.
२) केंद्रकद्रव्य : केंद्रकपटल आणि केंद्रकी यामधील जागा केंद्रकद्रव्याने भरलेली असते. केंद्रकद्रव्यात लहान दोऱ्यासारखे तुकडे म्हणजे गुणसूत्रे असतात. केंद्रकद्रव्यात पाणी, प्रथिने, आरएनए व डीएनए असतात.
३) केंद्रकी : केंद्रक द्रव्यात लहान गोल असतो त्याला केंद्रकी म्हणतात. त्यात आरएनए व डीएनए असतात. केंद्रकीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रथिन तयार करणे आणि पेशी विभाजनात मदत करणे. केंद्रकीत गुणसूत्रावरून जनुकानुसार आनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होत असतात.
समीक्षक – बाळ फोंडके