वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या (क्लोरोफिल) साहाय्याने तयार करतात; परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि हे अन्न त्यांना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशी कीटकभक्षक वनस्पतींच्या सु. ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त ५-६ जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणार्या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. अशा ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो. या वनस्पतींची वाढ विशिष्ट प्रकारे होते. (उदा., पानांचे सापळ्यात रूपांतर झालेले असते). यामुळे त्या वनस्पती कीटकांना मधुर रस वा भडक रंग यांद्वारे आकर्षून घेऊन पकडणे, मारणे आणि शेवटी त्यांचे पचन करणे अशा क्रिया करू शकतात. यातील पचनाची क्रिया ही प्राण्यांतील पचनक्रियेसारखी असते. पाचक रसाप्रमाणे त्यात प्रोटिएज आणि किटिनेज ही विकरे असतात. त्यांच्यामुळे कीटकाचे अपघटन होऊन त्यापासून अखेरीस नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असलेली संयुगे किंवा क्षार बनतात. ती वनस्पतींकडून शोषली जातात. अशा तर्हेने वनस्पतीला प्राणिज प्रथिने मिळतात. ज्या वनस्पतीत असे पाचक रस स्रवत नाहीत, त्यांच्यात पकडलेले कीटक सहजीवी जीवाणूंच्या क्रियेने कुजतात व नंतर ते शोषले जातात. कठीण भाग टाकून दिले जातात किंवा कलशासारख्या सापळ्यात त्यांची रास साचते. नायट्रोजन विपुल असणार्या मृदेत वाढलेल्या वनस्पतींना मात्र कीटक पकडण्याची गरज पडत नाही.
महाराष्ट्रात सापडणार्या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन जाती उपलब्ध आहेत : ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानाय. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर इ. भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानाय ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते. या वनस्पतींच्या पानाच्या चमच्यासारख्या पात्यावर लाल व जाड टोकाचे केस असतात. या केसांवर चिकट द्रवाचे आवरण असते व केसाच्या टोकावर चिकट द्रवाचे बिंदू असतात. हे बिंदू उन्हात दवबिंदूप्रमाणे चकाकतात. म्हणून याला इंग्रजीत ‘सन ड्यू’ हे नाव पडले आहे. एखादा कीटक या वनस्पतीच्या पानावर बसला की, केस आतल्या बाजूस वळतात आणि कीटक पकडला जातो. वनस्पतीच्या ग्रंथीतील स्रावामुळे कीटकाचे अन्नद्रव्यात रूपांतर होऊन त्याचे वनस्पतींच्या पेशींकडून शोषण होते.
दुसर्या सर्वत्र आढळणार्या कीटकभक्षक वनस्पतीचे नाव युट्रिक्युलॅरिया व्हलगॅरिस आहे. या वनस्पती पावसाळ्यात झाडाच्या बुंध्यावर, भिंतीवर तसेत पाणथळ भागात वाढतात. त्यांच्या छोट्याशा पानांवर सापळे तयार होतात. सापळ्याच्या टोकास झडप असते. तोंडावर असलेल्या केसांमुळे झडपेची उघडण्याची किंवा बंद होण्याची क्रिया होत असते. उघड्या दारातून कीटक आत आला की, झडप बंद होते आणि कीटक पकडला जातो. या कीटकांचे नंतर पचन होऊन आवश्यक पदार्थ ग्रंथींकडून वनस्पतीसाठी शोषले जातात. युट्रिक्युलॅरियाच्या सापळ्यामध्ये डासांच्या अळ्याही सापडतात.
नेपेंथिस (कलशपर्णी) ही एक वनस्पतीची प्रजाती कीटकभक्षी आहे. तिच्या १२० जातींपैकी बहुतेक आग्नेय आशियातील बोर्निओ, सुमात्रा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळतात. तिची एक जात खासिअस ही ईशान्य भारतातील आसामच्या डोंगराळ प्रदेशातील जंगलात सापडते. ही वनस्पती लहान झुडूप किंवा वेलीच्या स्वरूपात असून तिच्या पानांचे रूपांतर घटासारख्या कलशात झालेले असते. छोट्याशा पानांचे पाते गोलाकार असून त्याच्या कडांवर दाते असतात. कीटकांच्या स्पर्शाने दाते मिटतात आणि कीटक पकडले जातात. पाचक रसाने या कीटकांचे पचन होते.
डायोनिया मसायपुला (व्हीनस फ्लाय ट्रॅप) ही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅरोलायना राज्याच्या काही भागांत सापडते. हिच्या पानाचे पाते टोकांस जाड मध्यशिरेने दोन भागांत दुभंगलेले असते. पानाच्या बाहेरच्या कडांस लांब दाते असतात. पानावर कीटक आला की, पात्याचे भाग शिंपल्याप्रमाणे मिटतात. कीटक पकडला गेला की, ग्रंथीमधून पाचक स्राव सुरू होतो. त्यामुळे कीटकाचे पचन होऊन उपयुक्त भाग पानांकडून वनस्पतीच्या वाढीसाठी शोषला जातो. कीटकांचे पचन झाल्यावर सापळा परत उघडतो; असे दोन-तीन वेळा झाल्यावर तो काळा पडून सुकून जातो.
याशिवाय ड्रॉसोफायलम, बिब्लिस, सेफॅलोटस, पिंग्विक्युला, बायोव्ह्युलॅरिया, सारासेनिया, डार्लिंग्टोनिया, हेलिअँफोरा, पॉलिपोंफोलिक्स, जेनेलिसिया इ. प्रजातींतील कीटकभक्षक वनस्पती जगाच्या निरनिराळ्या भागांत आढळून येतात. या वनस्पती विशिष्ट अवयवांच्या मदतीने कीटकांना पकडून त्यांचे भक्षण करतात.
काही कवकेही प्राणिभक्षक असतात. माती किंवा कुजट भागांत या कवकांचे प्रकार वाढतात. त्यांतील काही कवके आपल्या सूक्ष्म धाग्यांच्या विशिष्ट वाढीने किंवा ग्रंथीतील चिकट स्रावाने भक्ष्य (कीटक वा अन्य छोटे प्राणी) पकडतात. भक्ष्य मेल्यावर त्याच्यापासून मिळणार्या अन्नद्रव्याचे शोषण होते.