(लायकेन). कवके आणि शैवाल किंवा कवके आणि सायनोबॅक्टेरिया संघातील जीवाणू यांच्या सहजीवनातून निर्माण झालेल्या जीवांना शैवाक म्हणतात. शैवाके जरी शैवालासारखी दिसत असली, तरी ती शैवाल नसतात. शैवाकांना मुळे नसतात, परंतु ती वनस्पतींप्रमाणे प्रकाशसंश्लेषण क्रियेने अन्न तयार करतात. शैवाके वेगवेगळ्या परिस्थितीत समुद्रसपाटीपासून ते उंच आल्पीय पर्वतांच्या प्रदेशांत आढळतात. तसेच ती कोठेही जसे खडकांवर, भिंतींवर, छपरांवर, मोकळ्या मातीत वाढतात. काही शैवाकांमध्ये खडतर वातावरणात टिकून राहण्यासाठी अनुकूलन घडून आलेले असते; जसे आर्क्टिक टंड्रा प्रदेश, उष्ण व शुष्क वाळवंटे, खडकाळ समुद्रकिनारे येथे वाढणारी शैवाके. शैवाके वनस्पतींवर वाढतात तेव्हा परजीवींसारखे न जगता वनस्पतींचा वापर आधारासाठी करतात. अशी शैवाके झाडांच्या फांद्या, पाने आणि इतर शैवाकांवर वाढतात; वर्षावनांमध्ये ती फांद्यांना लटकून वाढतात. शैवाके खडकांच्या पृष्ठभागाचे क्षरण करतात आणि मृदानिर्मितीला प्रारंभ करतात. शैवाके शहरात अजिबात दिसून येत नाहीत, कारण कमी ओलसरपणा आणि वातावरणीय प्रदूषण यांमुळे त्यांची वाढ खुंटली जाते.

शैवाकांच्या सु. २०,००० जाती असून त्यांचे स्वरूप त्यांच्यातील कवकानुसार ठरते. शैवाकाचा बिगरकवकी भाग एकतर पूर्णपणे प्रकायभर सारखाच विखुरलेला असतो किंवा शैवाकाच्या वरचा वल्कुटीस्तर आणि आतला मज्जास्तर यांच्या मधल्या भागापुरता मर्यादित असतो. शैवाकाचा विशिष्ट आकार आणि स्वरूप विकसित होण्यासाठी दोन्ही जोडीदारांची गरज असते. शैवालयुक्त शैवाक किंवा जीवाणूयुक्त शैवाक, दोन्ही स्वरूपांची शैवाके कृत्रिमरित्या तयार करता येतात. काही शैवाकांमध्ये दुसरा वेगळा बिगरकवकी भाग असू शकतो आणि अशा दोन्ही भागांमध्ये कसलाही संबंध नसतो. काही शैवाकांमध्ये दुसरे कवक असते, परंतु ते परजीवी असते. शैवाके दुष्काळासारख्या परिस्थितीत दीर्घकाळ टिकून राहू शकतात आणि पाणी उपलब्ध झाल्यावर ते कवकतंतूंद्वारे शोषून घेतात. पर्यावरणातून पोषक घटक मिळविणे हे मुख्यत: शैवाकातील कवकाचे कार्य असते. त्यांना कर्बोदके आणि अन्य कार्बनी पदार्थ बिगरकवकी जोडीदारापासून उपलब्ध होतात; बिगरकवकी भाग हा कवकतंतूंनी वेढलेला असतो किंवा त्यात कवकांची शोषकांगे अन्न मिळवण्यासाठी घुसलेली असतात.

शैवाकाची अनेक रूपे आहेत. खपली (क्रस्टोज) शैवाके हळूहळू वाढत असून ती खडक, जमीन, झाडांच्या फांद्या यांना घट्ट धरून किंवा त्यात घुसून आधारावर (आधात्रीवर) खपलीप्रमाणे वाढतात. क्षुपिल (फ्रुटीकोज) शैवाकांना एखाद्या क्षुपांप्रमाणे शाखा असतात आणि निमुळत्या आधारांनी आधारावर वाढतात. पर्णिल (फोलिओज) शैवाके सामान्यपणे चपटी व पानांसारखी असतात आणि मुळांसारखी संरचना असलेल्या मूलाभांनी आधाराला जोडलेली असतात. क्षुपिल तसेच पर्णिल या शैवाकांचे स्वरूप उच्च वनस्पतींसारखे असते. जिलेटिनी व तंतुमय स्वरूपांच्या शैवाकांच्या वसाहतींमध्ये बिगरकवकी जोडीदाराचे वर्चस्व आढळते.

शैवाकांच्या चयापचय प्रक्रियांतून रंगद्रव्ये आणि आम्ले तयार होतात. ही संयुगे शैवाकातील दोन्ही सहजीवी एकत्र असतील तरच तयार होतात; शैवाकातील कोणताही एक सहजीवी ती तयार करू शकत नाही. शैवाकांची रंगद्रव्ये स्फटिकांच्या रूपात कवकांच्या पृष्ठभागावर असतात आणि या स्फटिकांमुळे शैवाकांना विशिष्ट रंग प्राप्त होतात.

शैवाकातील बिगरकवकी भागाचे पुनरुत्पादन शाकीय पद्धतीने होते, तर कवकाचा भाग फलकायेच्या
(पाहा : फंजाय सृष्टी) स्वरूपात वाढत असून प्रजननस्तर (हायमेनिअम) बिगरकवकी भागापासून मुक्त असतो. म्हणूनच कवकाच्या बीजाणूंचे अंकुरण योग्य अशा बिगरकवकी जोडीदाराजवळ झाले तरच नवीन शैवाक बनते. काही वेळा, कवकांचे बीजाणू (स्पोर) विखुरतात, तेव्हा आपल्याबरोबर बिगरकवकी पेशीदेखील वाहून नेतात. यामुळेही नवीन शैवाक तयार होते. बऱ्याचदा पर्णिल व क्षुपिल ही शैवाके यांच्यात फक्त शाकीय प्रजनन घडून येते. वाऱ्याने उडून जाणाऱ्या कवकतंतूंत गुंडाळल्या गेलेल्या शैवालांच्या पेशींचे गोळ्यांमुळे म्हणजे सोरेडियमांद्वारे हे शक्य होते. काही जातींमध्ये प्रकायांद्वारे लंबगोलाकार किंवा प्रवाळासारखी दिसणारी इसिडियम ही पिंडे तयार होतात. याखेरीज, कोणत्याही शैवाकाच्या खंडाची वाढ मोठ्या प्रकायात होऊ शकते.

शैवाकांचे वर्गीकरण निश्चित नाही. त्यांच्यातील कवकांनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. शैवाकातील कवक सामान्यपणे ॲस्कोमायकोटा आणि क्वचितप्रसंगी बॅसिडिओमायकोटा संघातील असतात.

शैवाक : (१) लोबॅरिया पल्मोनॅरिया, (२) परमोट्रेमा पर्लेटम (दगडफूल), (३) अगॅरिकेसी.

(१) वर्ग ॲस्कोलायकेन : (धानीशैवाक). यातील कवके ॲस्कोमायकोटा संघातील असतात आणि बहुतांशी शैवाके याच वर्गातील आहेत. रॉसेला प्रजातीतील वेगवेगळ्या जाती भूमध्य समुद्राच्या समुद्रकिनारी आढळतात आणि त्यांपासून लिटमस आणि ऑर्सेल (जांभळा) ही रंगद्रव्ये मिळतात. लोबॅरिया पल्मोनॅरिया ही जाती फुप्फुसाच्या तक्रारींवर औषध म्हणून वापरली जाते. भारतात रक्तस्राव थांबण्यासाठी आणि इसब यांवर ही जाती वापरतात. ऱ्हायझोकार्पोन जिऑग्राफिकम या जातीमुळे आर्क्टिक पर्वतरांगांतील खडकांवर पिवळसर-हिरव्या रंगाचा थर जमा झाला असून तो तेथे सु. ८,६०० वर्षांपूर्वीपासून असावा असा अंदाज आहे. म्हणजे हा थर जगातील सर्वांत जास्त जुना जिवंत जीव आहे. क्लॅडोनिया प्रजातीच्या अनेक जाती उदा., क्लॅडोनिया रँजिफेरिना (रेनडियर मॉस) हे शैवाक आर्क्टिक आणि उप-आर्क्टिक टंड्रा प्रदेशांत वाढतात. तेथे राहणाऱ्या रेनडियर या प्राण्याचे ते शैवाक मुख्य अन्न आहे. लेकॅनोरा एस्कुलेंटा (मॅना लायकेन) ही जाती मूळची उत्तर आफ्रिका आणि ओरिएंटल स्टेप (यूरेशिया) येथील असून ती तेथील लोकांच्या आहाराचा एक भाग आहे. सेट्रॅरिया आयलँडिका हे शैवाक आइसलँड आणि इंग्लंडच्या उत्तरेकडील भागांत आढळते आणि अनेक वर्षांपासून याचा वापर घशाच्या व तोंडाच्या दाहावर केला जातो. उस्निया प्रजातीत जगात सु. ५०० जाती असून, त्यांपासून उस्निक आम्ल हे प्रतिजैविक मिळते. भारतात मसाल्यामध्ये वापरले जाणारे दगडफूल हे ॲस्कोलायकेन आहे. याचे शास्त्रीय नाव परमोट्रेमा पर्लेटम असून ते खडकावर वाढते. एका वर्षात ते फक्त एक चौसेंमी. एवढे वाढते.

(२) वर्ग बॅसिडिओलायकेन : (गदाशैवाक). यातील कवके बॅसिडिओमायकोटा संघातील आहेत. या वर्गात काही मोजक्या प्रजाती व जाती असून बहुसंख्येने त्या उष्ण प्रदेशांत वाढतात. त्यांपैकी सायनोफायसी, क्लोरोफायसी आणि अगॅरिकेसी या जाती मोठ्या प्रमाणात आढळतात.

उपयुक्तता : मानवाने शैवाकांचा अन्न, औषध आणि रंगद्रव्य म्हणून उपयोग केला आहे. आइसलँड मॉस (सेट्रॅरिया आइसलँडिका) या शैवाकाचा उपयोग भूक वाढविण्यासाठी तसेच त्याला ब्रेडसोबत मिसळून मधुमेह या आजारात अन्न म्हणून करतात. ऑक्रोलेशिया, रॉसेल्ला  आणि अंबिलिकॅरिया  या शैवाकाच्या जाती ऑर्किल या जांभळ्या किंवा लालसर जांभळ्या रंगाच्या रंगद्रव्याचे संश्लेषण करतात.