संशोधनासंबंधी आधार सामग्रीचे संकलन, मापन, व्यवस्थापन आणि अर्थनिर्वचन संख्यात्मक स्वरूपात करणे म्हणजे संख्यात्मक संशोधन. अनेक संशोधन प्रकारांपैकी संख्यात्मक संशोधन हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मापनाच्या विविध साधनांचा व तंत्रांचा वापर करून आणि विविध संख्याशास्त्रीय तंत्राद्वारे संशोधनपूर्वक माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष प्राप्त केले जातात व प्राप्त निष्कर्षांचे अर्थनिर्वचन केले जाते. कोहन यांच्या मते, ‘संख्यात्मक संशोधन म्हणजे सामाजिक संशोधनात प्रायोगिक पद्धती व प्रायोगिक विधाने यांचा वापर करणे होय’. क्रिसवेल यांच्या मते, ‘संख्यात्मक संशोधन हा संशोधनाचा एक प्रकार असून यामध्ये घटनांच्या स्पष्टीकरणाद्वारे सांख्यिकीय सामग्री संकलित करून त्याचे गणितीय पद्धतीच्या आधारे विश्लेषण केले जाते’.

संख्यात्मक संशोधनामध्ये घटनांचे स्पष्टीकरण, संख्याविषयक सामग्री, गणितीय आधारपद्धती सांख्यिकी या बाबी महत्त्वाच्या असतात. या संशोधनात सर्वेक्षण संशोधन, संबंधात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन, तुलनात्मक संशोधन या संशोधन प्रकारांचाही समावेश होतो. संख्यात्मक संशोधन करताना योग्य पायऱ्यानुसार संशोधन करावे लागते. संशोधनाची प्रक्रिया पुढील आकृतीतून स्पष्ट होते.

वैशिष्ट्ये : संख्यात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • चलांमधील परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठी किंवा नवप्रवाहांचे संशोधनसमस्येद्वारे वर्णन करण्यासाठी उपयुक्त संशोधन.
  • हेतू विधान, संशोधन प्रश्न व परिकल्पना हे विशिष्ट, संक्षिप्त, मापनक्षम आणि निरीक्षणक्षम असतात.
  • संशोधन साधनांच्या वापरातून व्यक्तींना विचारलेले प्रश्न व त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद यांमार्फत मोठ्या संख्येने सांख्यिकीय सामग्री जमा केली जाते.
  • नवप्रवाहांचे विश्लेषण, गटांमधील तुलना किंवा सांख्यिकीय विश्लेषणातून चलांमधील संबंध पाहणे आणि अर्थनिर्वचन केलेल्या निष्कर्षाचे मुख्य भाकीत व भूतकाळातील संशोधनाची तुलना करणे.
  • संशोधन अहवालाचे प्रमाणित, निश्चित आराखड्यात लेखन करणे.

संशोधन समस्येच्या स्वरूप आणि व्याप्तीनुसार संख्याशास्त्रीय मापनाची निवड केली जाते. या सर्व प्रकारच्या संख्याशास्त्राचा मुख्य आधार अंकात्मक स्वरूपात मांडलेली माहिती हाच असतो. संख्याशास्त्रात तिला आधार असे म्हणतात. सर्व संख्याशास्त्राचा प्रारंभ आधार सामग्रीतूनच होतो. ही सामग्री प्राप्त करण्यासाठी विविध साधनांचा, परीक्षणांचा वा चाचण्यांचा वापर केला जातो. या विविध साधनांद्वारे सामग्री वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. सामग्री संकलनाची साधने मापनश्रेणीच्या मदतीने ठरविलेले असतात. मापनश्रेणीचे प्रामुख्याने नामांकन श्रेणी, क्रमांकन श्रेणी, अंतर श्रेणी व गुणोत्तर श्रेणी हे चार प्रकार आहेत.

नामांकन श्रेणी : संख्या, चिन्ह किंवा नावे यांचा उपयोग करून नामांकन श्रेणी तयार होते. या प्रकारातील घटक समानतेच्या संबंधांचा वापर करून एकत्र केलेले असतात. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करता येत नाहीत. यामध्ये वापरलेली नावे, संख्या यांची अदलाबदल केली, तरी आधार सामग्रीत कोणताही फरक पडत नाही.

क्रमांकन श्रेणी : या श्रेणीमध्ये गटातील घटक सारख्याच दर्जाचे असले, तरी क्रमांक देताना त्यांच्यातील गुणवत्ता, क्षमता, संख्या, दर्जा, श्रेणी इत्यादींमध्ये असलेल्या थोड्याफार फरकाचा विचार करूनच त्याचे क्रमांकन केले जाते. म्हणजेच क्रमांकन करताना समानतेमधील असमानतेचा विशेषत्वाने विचार केला जातो. म्हणून तिला नामांकन श्रेणीची पुढची पायरी असेही म्हणतात.

अंतर श्रेणी : एखाद्या गटातील सर्व घटकांमधील परस्पर अंतराची निश्चित कल्पना येत असेल, तर त्या श्रेणीला अंतरश्रेणी असे म्हणतात. या श्रेणीमध्ये क्रमांकन श्रेणीचेही गुणधर्म दिसून येतात. या श्रेणीमध्ये लागोपाठ येणाऱ्या क्रमांकामधील अंतर निश्चित केलेले असते. या श्रेणीमध्ये गुणाकार, भागाकार करता येत नाही.

गुणोत्तर श्रेणी : या श्रेणीचा वास्तव प्रारंभ बिंदू शून्य असतो. तिच्यामध्ये समानता व असमानता हे दोनही गुणधर्म असतात; परंतु त्यासोबतच दोन अंतरांमधील गुणोत्तरसुद्धा या श्रेणीमध्ये असते. या श्रेणीपद्धतीने मिळणारी आधार सामग्रीही सर्वाधिक निर्दोष व अचूक असते. या श्रेणीमध्ये अंतर श्रेणीची सर्व वैशिष्ट्ये असतात.

फायदे : संख्यात्मक संशोधनाचे फायदे खालीलप्रमाणे :

  • संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे मोठ्या जनसंख्येबाबतचे अंदाज मांडता येतात.
  • व्यक्तींमध्ये असणारी अभिवृत्तीबाबतची व्यापकता संख्यात्मक संशोधनाद्वारे दर्शविता येते.
  • संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे सांख्यिकीचे लघुरूप असणारे निष्कर्ष मांडता येतात.
  • संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे विविध गटांमधील तुलना संख्याशास्त्राने दाखविण्याची संधी उपलब्ध होते.
  • संख्यात्मक संशोधन प्रक्रिया स्पष्ट व प्रमाणित असल्याने सुस्पष्टता येते.
  • संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे घटना, कृती व प्रवाह यांचे मापनस्तर निश्चित करता येतात.
  • संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे ‘किती आणि किती वेळा’ या प्रश्नांची संख्यात्मक उत्तरे देता येतात.

उपयोग : संख्यात्मक संशोधनाचे उपयोग खालीलप्रमाणे :

  • जेव्हा संशोधनातून संख्यात्मक उत्तरांची अपेक्षा असते, तेव्हा संख्यात्मक संशोधन प्रकारच्या संशोधनाचा उपयोग होतो.
  • संख्येविषयक बदल अचूकतेने अभ्यासण्यासाठी संख्यात्मक संशोधनाचा उपयोग होतो.
  • संख्यात्मक संशोधनाचा उपयोग मतांचे, अभिवृत्तीचे आणि वर्तनाचे मापन करण्यासाठी होतो.
  • एखादी घटना संख्यात्मक स्वरूपात स्पष्ट करण्याकरिता संख्यात्मक संशोधनाचा उपयोग होतो.
  • संख्यात्मक संशोधनाचा उपयोग परिकल्पनांचे परिक्षण करण्यासाठी केला जातो.

समीक्षक – के. एम. भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा