लागवड केलेल्या पिकात वाढलेल्या इतर वनस्पती म्हणजे तण. तण ही संज्ञा लागवड केलेल्या वनस्पतींच्या वाढीचे ठिकाण आणि हंगाम विचारात घेऊनच वापरावी लागते. जसे, पहिल्या हंगामातील ज्वारीच्या बिया रुजून काही रोपे दुसऱ्या हंगामातील गव्हाच्या पिकात वाढली तर अशा ज्वारीच्या रोपांनाही तण असे समजतात.
तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकांना अन्न, पाणी, सूर्यप्रकाश इ. वाढीसाठी आवश्यक असलेल्या घटकांची कमतरता भासते. त्यामुळे त्यांची वाढ मंदावते. उपलब्ध अन्नघटकांचा वापर तणे स्वत:च्या वाढीसाठी करतात. त्यामुळे पिकांचे पोषण अपुरे होते आणि त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
महाराष्ट्राच्या विविध भागांत आंबुटी, आघाडा, उन्हाळी, ओसाडी, काटे माठ, काटे रिंगणी, काळा माका, कुंदा, कुरडू, गाजर गवत, महानंदा (बेशरमी), हरळी, इचका, नीलपुष्पी, पांढरा माका, पिवळा धोतरा, रिंगणी, रुई, लव्हाळा, एरंड इत्यादी तणे वाढलेली दिसून येतात. वनस्पतींच्या प्रकारानुसार तणांचे वर्गीकरण केले जाते.
एकदलिकित तणांना जमिनीखाली कंद असतो व ती शाखीय पद्धतीने वाढतात. त्यांचा प्रसार वेगाने होतो. उदा., नागरमोथा, कुंदा, हरळी, इचका, तांबट, शिंपी इत्यादी. द्विदलिकित तणांचा प्रसार प्रामुख्याने बियांमार्फत होतो. तणांचे वर्गीकरण स्वयंपोषी आणि परजीवी असेही करतात. इचका, गवत इ. स्वयंपोषी तणे आहेत. अमरवेल, बंबाखू, टाळप ही परजीवी तणे आहेत. जमिनीवर वाढणाऱ्या तणांचे काळ्या गाळाच्या आणि पाणथळ जमिनींत वाढणारी तणे असेही वर्गीकरण करतात. पाण्यात वाढणाऱ्या तणांचे वर्गीकरण पाण्यावर तरंगणारी तणे आणि पाण्याच्या तळाशी वाढणारी तणे असे करतात. जलपर्णी व पिस्टिया ही तरंगणारी तणे आहेत आणि शेवाळे हे पाण्याच्या तळाशी वाढणारे तण आहे. तणांचे वर्षायू, द्विवर्षायू आणि बहुवर्षायू असेही वर्गीकरण करतात. रगवीड हे वर्षायू; जंगली कोबी व विषारी हेमलॉक हे द्विवर्षायू; दुधळ, कासे गवत व हरळी ही बहुवर्षायू तणे आहेत.
तणांचा प्रसार बिया, मुळे, कंद, मूलक्षोड यांपासून होतो. बियांचा प्रसार वारा, पाणी, गुरांमार्फत, पक्षी आणि गुरांच्या विष्ठेमार्फत होतो. तणाचे नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक उपाय, यांत्रिक पद्धत, जैव पद्धत आणि रासायनिक उपाय अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. प्रतिबंधक उपायात बियांची पेरणी करण्यापूर्वी त्यात मिसळलेल्या तणबिया काढून टाकतात. वर्षभरात जमिनीत विविध पिके फेरपालट पद्धतीने घेतल्यामुळे तण वाढायला अवसर मिळत नाही. रोपाभोवती टरफले, प्लॅस्टिक, पॉलिएथिलीन वगैरेंच्या तुकड्यांचे आच्छादन करून तणवाढीस प्रतिबंध करता येतो. यांत्रिक पद्धतीने मजुरांमार्फत किंवा आंतर-मशागत खुरपणी व कोळपणी करून तणांचे समूळ उच्चाटन करतात. याला पारंपरिक पद्धत असेही म्हणतात. जैवनियंत्रण पद्धतीत कीटक व रोगकारकांचा (जीवाणू, विषाणू) वापर करून तण नष्ट करतात किंवा त्यांचा प्रसार थांबवितात. रासायनिक पद्धतीत मोरचूद, सोडियम आर्सेनाइट, (२, ४-डी) (डायक्लोराफेनॉक्सिअॅसेटिक आम्ल) यांसारखी रासायनिक व सेंद्रिय तणनाशके वापरून तणांचा नायनाट केला जातो. काही तणे जीवाणू, विषाणू, कीटकांचे पर्यायी पोषदे आहेत. त्यांच्यामार्फत रोगांचा प्रादुर्भाव होतो. गाजर गवत व धोतऱ्यासारखी तणे अधिहर्षताकारक आहेत. काही तणे पाळीव प्राण्यांसाठी विषारी असून ती खाल्ल्यास जनावरे दगावतात.