अपुष्ठवंशी प्राणीसंघातील काही उदाहरणे

पाठीचा कणा नसणार्‍या प्राण्यांना ‘अपृष्ठवंशी’ म्हणतात. वर्गीकरणाच्या दृष्टीने अपृष्ठवंशी प्राणी हा प्राणिसृष्टीचा वेगळा असा नैसर्गिक विभाग नाही. पृष्ठवंशी संघाच्या निदान-लक्षणांचा अभाव हे अपृष्ठवंशीचे मुख्य लक्षण मानले जाते. साम्य-भेद लक्षणांनुसार सर्व अपृष्ठवंशीय प्राण्यांची मांडणी संघामध्ये केली जाते. यामध्ये दहा प्रमुख संघ आहेत. कित्येक प्राणी या दहा संघांच्या व्यवस्थेत बसविता येत नाहीत. त्यासाठी त्या प्राण्यांचे आठ गौणसंघ बनविले गेले आहेत. प्रमुख संघ पुढीलप्रमाणे आहेत :

(१) आदिजीव (प्रोटोझोआ), (२) छिद्री(पोरिफेरा), (३) आंतरदेहगुही (सीलेंटेरेटा),
(४) चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथस), (५) गोलकृमी (नेमॅटोडा), (६) वलयांकित (अ‍ॅनालिडा),
(७) संधिपाद (आर्थ्रोपोडा), (८) मृदुकाय (मॉलस्का), (९) कंटकचर्मी (एकायनोडर्माटा), (१०) अर्धमेरुक (हेमिकॉर्डेटा).

आदिजीव संघ 

अमीबा, पॅरामीशियम, यूग्लिना, प्लास्मोडियम इत्यादींचा या संघात समावेश होतो. या संघातील प्राणी एकपेशीय आणि आकाराने सूक्ष्म असतात. ते दमट जागी, गोड्या व खार्‍या पाण्यात आढळतात. ते प्राणी कशाभिका (चाबकाच्या दोरीसारखा पेशीपासून बाहेर आलेला भाग), पक्ष्माभिका (पेशीतून बाहेर आलेले केसासारखे भाग) किंवा छद्मपादांच्या साहाय्याने हालचाल करतात. या प्राण्यांचे प्रजनन द्विभाजन किंवा लैंगिक पद्धतीने होते. आदिजीव हा प्राणिसृष्टीतील पहिला संघ मानला जातो. आधुनिक जीवशास्त्रीय वर्गीकरणानुसार हा संघ प्रोटिस्टा या प्राणीजीवसृष्टीमध्ये गणला जातो.

छिद्री संघ 

या संघात सर्व स्पंजांचा समावेश केला आहे. सायकॉन, बाथस्पाँज, व्हिनस फ्लॉवर बास्केट इत्यादींचा या संघात समावेश होतो. स्पंज बहुपेशी असून त्यांमध्ये ऊतींचा अभाव असतो. एका जागी स्थिर राहून ते वनस्पतींसारखे जीवन जगतात. बहुतेक सर्व स्पंज खार्‍या पाण्यात राहतात; मात्र काही गोड्या पाण्यातही राहतात. शरीरावरील अनेक छिद्रांमधून पाणी आत घेऊन ते पाणी एका मोठ्या छिद्रावाटे बाहेर टाकले जाते. पाण्याबरोबर येणारे अन्नकण खाल्ले जातात. स्पंज वसाहतीने राहतात. बहुतेकांमध्ये कंटिकांचा किंवा धाग्यांचा सांगाडा असतो. स्पंजांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने व मुकुलनाने होते.

आंतरदेहगुही संघ 

हायड्रा, जेलीफिश, समुद्रपुष्प, प्रवाळ इत्यादींचा या संघात समावेश होतो. हे प्राणी बहुपेशी असतात. ते सर्व जलचर असून खार्‍या पाण्यात आढळतात. फक्त काही जाती गोड्या पाण्यात आढळतात. या प्राण्यांची दोन रूपे आढळतात. एक, नळीसारखे शरीर असणारे बहुशुंडक (पॉलिप) व दुसरे, पालथ्या बशीसारखे अथवा छत्रीच्या आकाराचे छत्रिक (मेड्युसा). शरीराच्या पोकळीला किंवा आंतरदेहगुहेला एकच तोंड असते. बाह्यस्तरामध्ये दंशपेशी असतात. भक्ष्य पकडण्यासाठी आणि हालचाल करण्यासाठी स्पर्शके असतात. या प्राण्यांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने व मुकुलनाने होते.

चपटकृमी संघ 

या प्राण्यांचे शरीर बहुपेशी असून ते बाह्य, मध्य आणि अंतःस्तर अशा तीन स्तरांचे असते. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक, टेपवर्म इत्यादींचा या संघात समावेश होतो. हे प्राणी खारे पाणी, गोडे पाणी, जमीन, इतर प्राण्यांचे शरीर यांत वास्तव्य करतात. अन्न घेण्यासाठी आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्यासाठी त्यांच्या शरीरात एकच द्वार असते. हे प्राणी उभयलिंगी आहेत.

गोलकृमी संघ 

या संघातील प्राणी लांबट नळीच्या आकाराचे किंवा दोर्‍यासारख्या आकाराचे असून त्यांच्या शरीरावर चिवट आवरण असते. अंकुशकृमी, जंत, नारूचा कृमी इत्यादींचा या संघात समावेश होतो. खारे पाणी, गोडे पाणी, जमीन, इतर प्राण्यांची शरीरे व वनस्पतींमध्ये यांचे सर्वत्र वास्तव्य असते. हालचाल करण्यासाठी शरीराला एकही अवयव नसतो. वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरात राहून ते अनेक रोग उत्पन्न करतात. या प्राण्यांमुळे मानवात हत्तीरोग, नारू, जंतविकार, इ. रोग होतात.

वलयांकित संघ

या संघातील प्राण्यांचे शरीर अनेक खंडांनी बनलेले असते. नेरीस, गांडूळ, जळू इत्यादींचा या संघात समावेश होतो. शरीर लांबट दोरासारखे असून त्यांच्या शरीरावरील वळीभाग वा खंड बाहेरून सहजपणे दिसतात. आतूनही प्रत्येक खंड एका पातळ पापुद्र्याने अलग केलेला असतो. हे प्राणी त्रिस्तरी असून त्यांची देहभित्ती आणि अन्ननलिका यांमध्ये पोकळी असते. तिला देहगुहा म्हणतात. हे प्राणी खारे पाणी, गोडे पाणी आणि ओलसर जमिनीत राहतात. या प्राण्यांत पचनसंस्था, चेतासंस्था, उत्सर्जनसंस्था आणि रक्ताभिसरणसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या असतात. श्वसनासाठी स्वतंत्र निराळी संस्था नसून त्यासाठी तो त्वचेचा किंवा लांबट धाग्यांसारख्या कल्ल्यांचा वापर करतो.

संधिपाद संघ 

प्राणिसृष्टीतील हा सर्वांत मोठा संघ असून जगातील एकूण प्राण्यांपैकी ७५% प्राणी संधिपाद संघातील आहेत. पाण्यातील वास्तव्य सोडून जमिनीवर येणारे आणि हवेतही संचार करणारे हे पहिले प्राणी होत. हे गोड्या पाण्यात, खार्‍या पाण्यात, गरम पाण्याच्या झर्‍यात, बर्फाळ प्रदेशात, दुर्गम अंधार्‍या गुहेत, वाळवंटात, दलदलीत, वनात, माणसाच्या घरात, माणसाच्या शरीरावर, पुस्तकात, लाकडात सर्वत्र आढळतात. हे प्राणी त्रिस्तरीय असून त्यांचे शरीर खंडांनी बनलेले असते. शरीरावर कायटिन या कठिण द्रव्याचे आवरण असते. त्याला बाह्य सांगाडा अथवा बाह्य कंकाल असे म्हणतात. कंकालामुळे शरीराचे संरक्षण होते. हा ठराविक काळाने गळून पडून त्या जागी नवीन कंकाल उत्पन्न होतो. या क्रियेला निर्मोचन किंवा कात टाकणे असे म्हणतात. संधिपाद प्राण्यांना पायांच्या अनेक जोड्या असून प्रत्येक पाय अनेक सांध्यांनी युक्त असतो.

या प्राण्यांच्या शरीरातील देहगुहा आकाराने लहान असून त्यात रक्त भरलेले असते. म्हणून तिला रुधिरगुहा असे म्हणतात. हृदय अन्ननलिकेच्या वरच्या बाजूस असते. या प्राण्यांच्या जीवनचक्रात रूपांतरण आढळते. शरीराचे साधारणपणे डोके, छाती आणि उदर असे भाग आढळतात. वेगवेगळ्या कामासाठी पायांचे वेगवेगळ्या अवयवांत रूपांतर झालेले असते. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, चेतासंस्था, उत्सर्जनसंस्था व प्रजननसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या असतात. प्राणी विभक्त लिंगी असून अनेक बाह्य गुणधर्मांनी नर आणि मादी वेगवेगळे ओळखता येतात.

संधिपाद संघात ऑनिकोफोरा (पेरिपॅटस), क्रस्टेशिया (कवचधारी : खेकडा, शेवंडा, झिंगा इ.), मिरिअ‍ॅपोडा (अयुतपाद : गोम, पैसा इ.), इन्सेक्टा (कीटक : डास, घरमाशी, गांधील माशी, फुलपाखरे, पतंग, झुरळ, नाकतोडा, रातकिडा, मधमाशी, रेशीमाचा किडा, टोळ, चतुर, मुंग्या, वाळवी, खोडकिडा, बोंडकीटक, यष्टी कीटक) आणि अ‍ॅरॅक्निडा (अष्टपाद : विंचू, कोळी, गोचिड, खरजेची कीड) असे पाच वर्ग आहेत.

मृदुकाय संघ 

हे प्राणी गोड्या आणि खार्‍या पाण्यात तसेच जमिनीवर आढळतात. कायटॉन, पायला, गोगलगाय, शंख, शिंपले, माखली इत्यादींचा या संघात समावेश होतो. त्यांचे शरीर त्रिस्तरीय असून शरीरात देहगुहा असते. शरीर मऊ लुसलुशीत असते. शरीर खंडविरहित असते. शरीराच्या खालच्या बाजूला हालचालीसाठी एक स्नायुयुक्त पाय असतो. अनेक जातींत शरीरांमध्ये तयार केलेले शंख अथवा कवच असते. गोगलगायींना एक शंख असतो, तर कालवांच्या (शिंपले) शंखाचे दोन भाग असतात. माखलीमध्ये कवच शरीराच्या आतील बाजूस असते. शरीर अवयवांवर एक प्रावार असते. सर्व संस्था विकसित झालेल्या असतात. बहुतेक प्राण्यांना एक दंतपट्टिका असते. त्यावर तीक्ष्ण दातांच्या रांगा असतात. अन्न खरवडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. या प्राण्यांच्या आणि अष्टपाद (ऑक्टोपस) या प्राण्यांच्या तोंडाभोवती अनुक्रमे १० किंवा ८ निमुळत्या, चूषकयुक्त लवचिक भुजा असतात.

कंटकचर्मी संघ 

या संघातील प्राणी फक्त समुद्रातच राहतात. समुद्र लिली, समुद्रतारा, समुद्र करंडा, खजणी काकड्या, बत्ताशा इत्यादींचा या संघात समावेश होतो. ते त्रिस्तरीय व देहगुहायुक्त आहेत. शरीरावरील आवरण चुन्याचे असून त्यावर लहान काटे म्हणजेच कंटिका असतात. हालचालींसाठी त्यांच्या शरीराच्या खालच्या बाजूस चूषकयुक्त नालपाद असतात. जठर आणि आतड्यांची लांबी अगदी कमी असते. मात्र जठराला आडवे फाटे फुटून हे फाटे पाचही पायात जवळजवळ टोकापर्यंत पसरलेले असतात. त्यांच्या शरीरात अभिसरणाकरिता एक विशेष प्रकारचे जलवाहिका तंत्र असते. यात समुद्राचे पाणी खेळविण्यासाठी नलिकांचे जाळे असते. हालचाल होताना, नालपादांना पकड घेण्यास व सोडण्यास आणि शरीर पुढे ढकलत चालण्यास हा पाण्याचा प्रवाह मदत करतो. या प्राण्यात पुनरुद्‍भवनाची क्षमता अधिक असते.

अर्धमेरुक संघ 

पूर्वी या संघाचा पृष्ठवंशी संघातील एक उपसंघ म्हणून उल्लेख करण्यात येत असे. परंतु या प्राण्यांना पृष्ठवंश म्हणजे पाठीचा कणा नसल्याने आधुनिक वर्गीकरणानुसार या प्राण्यांचा समावेश अपृष्ठवंशी प्राण्यात करण्यात आला आहे. बॅलॅनोग्लॉसस, सॅक्कोग्लॉसस इत्यादींचा या संघात समावेश होतो. त्यांना अर्धकणावान असे म्हणतात.

या संघातील प्राणी समुद्रातील वाळू, गाळ अगर चिखल यात एकेकटे अगर समूहाने राहतात. हे प्राणी दिसण्यास गांडुळासारखे वाटतात. शरीर सोंड, गळपट्टी व धड या तीन भागांचे बनलेले असते. हे प्राणी एकलिंगी असतात. या प्राण्यांत पुनरुद्‍भवनाची क्षमता असते.