केवडा ही पँडॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पँडॅनस ओडोरॅटिसिमस असे आहे. या वनस्पतीच्या सुवासिक कणसाला सामान्यपणे केवडा म्हणतात. हे कणीस नरफुलांचा फुलोरा असतो. या वनस्पतीचा प्रसार निसर्गत: भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनार्यांवर, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल तसेच म्यानमार, अंदमान बेटे इ. प्रदेशांत झाला आहे. ती शोभिवंत फुलोर्यांसाठी आणि सुगंधासाठी बागेतही लावतात.
केवड्याचे नागमोडी झुडूप सु. ३ मी. उंच वाढते. अनेक वायवी (हवेतील) व जाड आधार मुळांनी याचे खोड उभे सावरून धरलेले असते. फांद्या जाडजूड व पाने टोकाकडे गर्दीने येतात. पाने साधी, समुद्रवर्णी हिरव्या रंगाची, ९०-१५० सेंमी. लांब, खड्गाकृती, एकांतरित, टोकदार, वरून गुळगुळीत व खालून फिकट असतात. या चिवट पानांच्या कडा व मध्यशिरा काटेरी असतात. फुले एकलिंगी असतात. नरफुलांची छदकणिशे २५-५० सेंमी. लांब असून त्यात अनेक बिनदेठाची, दंडाकार, ५-१० सेंमी. लांब व लहान लहान कणिशे असतात. त्या प्रत्येकावर एक लांब व शेपटीसारखा सुवासिक पांढरा किंवा पिवळा महाछद असतो. मादीफुलाचे छदकणिश एकटे व सु. ५ सेंमी. व्यासाचे असते व त्यापासून पिवळट किंवा लालसर लहान फणसासारखे, बोथट काट्यांचे संयुक्त आणि काष्ठमय फळ बनते.
केवड्याची नवीन लागवड खोडाच्या (जमिनीवरच्या व खालच्या) आडव्या फांद्यांनी करतात. तीन-चार वर्षांनी केवडे येतात. पिकलेल्या कणसाच्या फुलांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने (वाफ थंड करून) तेल मिळवितात. या तेलातील मुख्य सुगंधी घटक बीटा-फिनिल एथिल अल्कोहॉलाचा मिथिल ईथर असतो. हे सुगंधी तेल चंदनतेलात किंवा द्रव पॅराफिनात मिसळून केवडा अत्तर बनवितात.
केवड्याच्या पानांचा उपयोग झोपड्यांची छपरे, चटया, दोर, मॅनिला हॅट, टोपल्या व पिशव्यांसाठी करतात. पाने स्तंभक (आंकुचन करणारी), उग्र व सुवासिक असून अर्बुद, कुष्ठरोग, देवी, उपदंश, खरूज, कोड इत्यादींवर गुणकारी असतात. तेल स्तंभक, उत्तेजक व जंतुनाशक असून डोकेदुखीवर व संधिवातावर उपयुक्त असते.
सामान्यत: नद्या, कालवे, तळी व शेती यांच्या कडेने केवड्याची वने वाढवितात. ती जमिनीतील माती एकत्र धरून ठेवत असल्याने मातीची धूप थांबवून पर्यावरण संधारणास उपकारक ठरतात.