डाळिंब हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्रात साधारणतः ८७,५५० हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीत आहे. वर्षातून कोणताही  – मृग, हस्त आणि आंबे –  बहार घेता येतो व संपूर्ण वर्षभर बाजरापेठेत फळे पाठविणे सहज शक्य होते. त्यामुळे राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंब पिकाची लागवड केली जाते.

डाळिंबाचा रस थंड, श्रमपरिहारक व उत्साहवर्धक असून त्याचे विविध औषधी उपयोगही आहेत. डाळिंबाच्या रसात १२ ते १६ सहज पचणारी साखर व ब जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. या फळाची साल आमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. फळांपासून डाळिंब सरबत आणि जॅम यांसारखे अनेक टिकावू पदार्थ बनवितात.

हवामान : उष्ण,‍ दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा या पिकास चांगला मानवतो. फळधारणेपासून फळे तयार होईपर्यंत कडक ऊन व कोरडी हवा आणि पक्वतेच्या काळात साधारणपणे उष्ण व दमट हवा असल्यास चांगल्या दर्जाची फळे मिळतात.फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो. परंतु फळांची वाढ होताना आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास रोग व किडीचे प्रमाण वाढते व फळांचा दर्जा खालावतो.

जमीन : उत्तम निचऱ्याची हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन डाळिंब पिकास योग्य आहे.जमिनीचा सामू ६.५० ते ७.५० इतका असावा. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यास झाडांची वाढ चांगली होते. परंतु चुनखडीचे प्रमाण ५ ते ६ टक्क्यांवर गेल्यास झाडाची वाढ खुंटते. फार भारी जमिनीत वाढ जोमाने होते, परंतु पुढे झाडाला विश्रांती देणे कठीण होते आणि बहाराची अनिश्चितता वाढते.

जमिनीची मशागत : डाळिंब लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून व कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हलक्या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे ४.५ X ३.० मी. अंतरावर ६० सेंमी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणावेत.पावसाळ्यापूर्वी तळाशी पालापाचोळ्याचा थर व १ किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि २ टोपल्या कुजलेले खेणखत टाकून मातीने भरून घ्यावेत. वाळवीच्या नियंत्रणासाठी प्रत्येक खड्ड्यात १०० ग्रॅ. १० मिथिल पॅराथिऑनची भुकटी खत आणि मातीच्या मिश्रणात मिसळावी.मध्यम जमिनीत जेथे पाण्याचा निचरा कमी होतो अशा ठिकाणी खड्डा भरून झाल्यावर १ मी. रुंद व १ फूट उंच वरंबे तयार करून त्यावर लागवड करावी, जेणेकरून झाडांची वाढ जोमदार होईल.

लागवड : डाळिंबाची लागवड बियांपासून केल्यास झाडे एकसारख्या गुणधर्माची व चांगल्या प्रतीची फळे देत नाहीत, त्याचप्रमाणे फलधारणेसही उशीर लागतो. त्यामुळे डाळिंबाची लागवड कलमांपासूनच करावी. तांबड्या रंगाची मुळे असलेल्या गुटी कलमांमध्ये यशाचे प्रमाण जास्त असते आणि हे कलम कडक उन्हाळा सोडता इतर कोणत्याही हंगामात करता येते. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच जून-जुलैमध्ये लागवड केल्यास रोपाची मर कमी प्रमाणात होते. कलमांची लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. लागवडीनंतर आंबवणी-चिंबवणी झाल्यानंतर ७ ते ८ दिवसाच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

जाती : गणेश, जी १३७, मृदला, फुले आरक्ता, भगवा,फुले भगवा सुपर या डाळिंबाच्या वाणाच्या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रात सध्या फुले भगवा सुपर ही जाती लागवडीत आहे.सदर वाण गर्द केशरी रंगाचे आहे. फळांची साल जाड व चकचकीत असून दाणे मऊ आहेत. फळांमध्ये रसाचे प्रमाण भरपूर आहे. फळांचे सरासरी उत्पादन २४ किग्रॅ.प्रति झाड आहे. देशांतर्गत तसेच निर्यातीसाठी ही जात उत्तम आहे.

झाडास वळण : डाळिंबाच्या झाडास अनेक फुटवे येतात. यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा संपूर्ण झाड जाण्याचा धोका असतो. यासाठी सुरुवातीस ४ ते ५ खोडे विकसित होऊ द्यावीत. जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंतचे फुटवे येऊ देऊ नयेत.आवश्यकतेनुसार झाडास आधार दिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते.

बहार नियोजन : बहार धरणे म्हणजे झाडाला पुरेशी विश्रांती देऊन नंतर एकाच वेळी फळधारणा करून घेणे. ही प्रक्रिया नैसर्गिक अथवा कृत्रिम या दोन्ही प्रकारांनी होऊ शकते. शिशिरातील पानगळीनंतर आंबा,लिंब झाडांमध्ये वसंताचा जो नवबहार दिसतो तो नैसर्गिक बहाराचा प्रकार आहे. यात शिशिरातील थंडी कारणीभूत असते. त्यामध्ये पानझडी वृक्षाची पानगळ होते व झाड विश्रांतीमध्ये जाते. डाळिंब हे पूर्णत: सदाहरित अथवा पूर्णत: पानझडीमध्ये मोडत नाही. डाळिंबास फुले येण्याच्या कालावधीनुसार आंबे बहार (जानेवारी-फेब्रुवारी), मृग बहार (जून-जुलै), हस्त बहार (सप्टेंबर-ऑक्टोबर) असे तीन प्रकार आहेत.त्यापैकी महाराष्ट्रासाठी आंबे बहार फायदेशीर असल्याची शिफारस महात्मा फुले कृषि विद्यापीठाने दिली आहे. या बहारातील फळांची काढणी आंब्याचा हंगाम संपल्यानंतर सुरू होते. ही फळे निर्यातीसाठी सर्वोत्तम असून बाजारात या फळांना चांगली मागणी आहे.

खते : पिकाची चांगली वाढ आणि उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रीय खतांचा नियमित पुरवठा करणे आवश्यक ठरते,त्यासाठी प्रत्येक झाडास तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे खतांच्या मात्रा देणे जरूरीचे आहे.

झाडाचे वय (वर्षे) शेणखत (किग्रॅ.) नत्र (ग्रॅ.) स्फुरद (ग्रॅ.) पालाश (ग्रॅ.)
१० २५० १२५ १२५
२० २५० १२५ १२५
३० ५०० १२५ १२५
४० ५०० १२५ २५०
५ व त्यानंतर ५० ६२५ २५० २५०

पाणी व्यवस्थापन :१) जमिनीमध्ये वापसा आल्यावरच पाणी नियोजन करावे; २) पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात ठेऊन करावे; ३) जमिनीच्या मगदुरप्रमाणे नियमित पाणीपुरवठा करणे; ४) ठिबक सिंचन करताना प्रत्येक झाडास १ ते ५ वयापर्यंत ८ लिटरचे २ ठिबक बसवावेत. ठिबक हा झाडाच्या पसाऱ्याच्या ६ इंच बाहेर बसवणे आवश्यक आहे. ५ वर्ष वयाच्या पुढे २ ऐवजी ४ किंवा ६ ठिबक बसविणे फायदेशीर ठरते; ५) ड्रिपरमधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडत आहे किंवा नाही याची खात्री करावी; ६) ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास पूर्ण वाढ झालेल्या डाळिंबास उन्हाळ्यात ८-१०, पावसाळ्यात १३-१४ (पाऊस नसताना) व हिवाळ्यात १७-१८ दिवसांनी पाणी द्यावे; ७) पाण्यात बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा; ८) झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार म्हणजे प्रति झाड सरासरी २०-२२ लि. पाणी द्यावे.

प्रमुख किडी व रोग :  डाळिंब पिकाच्या सर्वच भागांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रामुख्याने मावा, फुलकिडे किंवा खरड्या, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, कोळी, भुंगेरे, अळी व मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमी यांसारख्या किडी; बुरशीजन्य,जीवाणूजन्य (बॅक्टेरिया) रोग आणि तेलकट डाग किंवा तेल्या रोग, मर रोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.रोगांमुळे फळांचा तजेला व रंग बिघडतो. अशा फळांना बाजारभाव मिळत नाही.

डाळिंबावरील कीड व रोग नियंत्रण : १) बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरु + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा द्यावा, खोडाजवळ कीटकनाशकाचे द्रावण ओतावे; २) मावा, कोळी व खवले किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाची व निबॉळी अर्क (४%) यांची आलटून पालटून फवारणी करावी;३) पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी व परोपजीवी बुरशीचा वापर करावा, तसेच क्रिप्टोलेमस मॉन्टोझायरी हे परभक्षी कीटक बागेत सोडावे; ४) मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन्डॅझिमचे ०.१ % द्रावण ५ लि. प्रती झाडास द्यावे. १ महिन्यानंतर प्रती झाडास २५ ग्रॅ. ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिर्स + ५ किग्रॅ. शेणखत यांचे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे; ५) ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला २ किग्रॅ.चांगले कुजलेले शेणखत प्रती झाड या प्रमाणात द्यावे; ६) सूत्रकृमी असलेल्या बागांमध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निबॉळी पेंड आणि एक ते दीड महिन्यानंतर १० किग्रॅ. १०% दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे; ७) खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुगेऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी गेरू ४०० लिंडेन ग्रॅ.+ लिंडेन २०% प्रवाही २.५ ग्रॅ. प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यांचा खोडास मुलामा द्यावा. तसेच लिंडेन / क्लोरोपायरीफॉस अ ब्लायटॉक्स वरील प्रमाणात घेऊन प्रती झाड ५ लि. द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे; ८) खोड़किडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिलि. किंवा डायक्लोराव्हॉस १० मिलि. या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या साहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

डाळिंबावरील किडी व रोग व्यवस्थापन : १) प्रत्येक बुरशीनाशकाची तसेच कीटकनाशकाची योग्य त्या मात्रेतच फवारणी करावी. कमी किंवा जास्त तीव्रतेच्या आणि अवाजवी फवारण्यामुळे रोग व किडींचा नाश न होता प्रतिकारक्षमता वाढून त्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. तसेच झाडांमध्ये अंतर्गत विकृती निर्माण होतात; २) फवारणी करण्याआधी फवारणीस वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ७ च्या खाली आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर करावा; ३) किडीमध्ये विषप्रतिकारक क्षमता निर्माण होऊ नये म्हणून विविध कीडनाशकांचा आलटून पालटून वापर करावा; ४) फळांमधील कीडनाशकांचे प्रमाण अंश निर्धारित प्रमाणापेक्षा कमी राखण्यासाठी फळ तोडणीपूर्वीचा कालावधी लक्षात ठेवावा; ५) पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे; ६) झाडांची छाटणी करताना पावसाळ्यात किंवा उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदर करू नये. कारण हाच किडीचाही सक्षम कालावधी असतो. किडी या काळात छाटलेल्या भागांमधून निघणाऱ्या वनस्पती पेशीरसाकडे आकर्षिली जातात आणि बुरशीच्या प्रसारास कारणीभूत ठरतात; ७) छाटलेल्या भागाना १०% बोर्डो पेस्ट (१ किग्रॅ.मोरचुद + १ किग्रॅ.कळीचा चुना + १० लि. पाणी) लगेच लावावी; ८) बागेची स्वच्छता आणि निगा चांगल्याप्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने करावी.

फळांची काढणी आणि उत्पादन : फुले आल्यापासून साधारणतः १४०-१९० दिवसांमध्ये फळे तयार होतात. फळे पक्व झाल्यानंतर त्याचा गोलसरपणा कमी होऊन फळांच्या बाजूवर चपटेपणा येतो, फळ दाबल्यास सालीचा विशिष्ट करकर आवाज येतो. फळांचा आकार, रंग व प्रत टिकून राहण्यासाठी झाडांवर फळांची संख्या मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. पाच ते सहा वर्षे वयाच्या झाडावर १०० फळांच्या आसपास फळे उत्तम प्रकारे पोसू शकतात. जादा आलेली फळे लहान असतानाच तोडून टाकावीत. फळांची विरळणी करताना घोसामध्ये आलेली जादा फळे प्रथम काढावीत.

संदर्भ :

  • I.C.A.R.Fruit Culture in India,New Delhi,1963.
  • C.S.I.R.The Wealth of India,Raw Materials,Vol.viii,New Delhi,1969.

समीक्षक – भीमराव उल्मेक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा