धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे.
आययूसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत या वृक्षाचा समावेश केला आहे.धूप हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०–६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात.
फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात. हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात.