भारतीय अस्वल

अस्वल हा प्राणी अर्सिडी कुलातील असून या कुलात सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत. बहुतांशी वन्य अस्वले युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात वन्य अस्वले आढळत नाहीत. भारतात अस्वल सर्वत्र आढळते.

भारतीय अस्वलाचे नाव मेलर्सस आर्सिनस असे आहे. डोक्यापासून शरीराची लांबी १.४- १.८ मी.; शेपूट १०-१२ सेंमी.; खांद्यापाशी उंची ६०-९० सेंमी.; वजन सामान्यत: ९०-११५ किग्रॅ. एवढे असते. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो. मुस्कट लांब, मोठे डोके आणि खुंटीसारखी शेपटी असते. मागचे पाय आखूड, जाड असतात; तर पाऊल मोठे व पाच बोटांचे असते. प्रत्येक बोटांवर नख्या असून त्या पुढच्या पावलांवर लांब असतात. अन्नाचे चर्वण करण्यासाठी अस्वलाचा जबडा पसरट व दात सपाट असतात. त्याशिवाय चार लांब सुळे असतात. त्वचा सैल असून अंगावर लांब व दाट काळे केस असतात. या रंगात पुष्कळदा तपकिरी छटा असते. अस्वलाची घ्राणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात; तर दृष्टी क्षीण असते आणि त्याला ऐकायला कमी येते.

वनातील कोणतीही निवार्‍याची जागा अस्वलाला राहायला आवडते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी ते संध्याकाळी बाहेर पडते. पहाटे निवासस्थानी परतते. फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य होय. त्यांना मध आवडतो. झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडते आणि मध खाते. वाळवीची वारुळे फोडून त्यातील वाळवी ते खाते. अस्वल झोपेत मोठ्याने घोरते.

अस्वले कळपाने न राहता एकेकटी राहतात. त्यांच्या समागमाचा काळ उन्हाळा असतो. सात ते नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १ किंवा २ पिल्ले होतात. ती दोन-तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात. तीन वर्षांपर्यंत ती आईबरोबरच असतात. आईच या पिलांचे संरक्षण करते. या जातीत नर-मादी एकनिष्ठ आढळतात. त्यांचे आयुष्य २५ ते ४० वर्षांचे असते. सर्व अस्वले चटकन चिडतात आणि धोकादायक असतात. पंजाच्या एका फटक्यानिशी ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकते.

उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल देखणे असते. त्याचे शास्त्रीय नाव थॅलॅर्क्टास मेंरिटायमस असे आहे. सर्व जातींतील अस्वलांच्या तुलनेत हे आकाराने मोठे असून त्याचा रंग पांढरा स्वच्छ असतो. त्याच्या अंगावर दाट केस असतात. पावलांच्या तळव्यावरदेखील दाट केस असल्यामुळे बर्फावर चालताना त्याला फार त्रास होत नाही. उत्तर ध्रुवाच्या बर्फाळ प्रदेशात वनस्पतिजन्य पदार्थ खायला मिळत नसल्यामुळे ते मांसाहारी बनले आहे. सील आणि वॉलरस यांची पिल्ले त्याचे मुख्य भक्ष्य होय; परंतु कॅरिबू, खोकड, पक्षी आणि इतर प्राणीही ते खातात. ते पोहू शकते.

दक्षिण अमेरिकेतील चष्मेवाले अस्वल (याच्या डोळ्यांभोवती पांढरे वलय असते), हिमालयीन काळे अस्वल, अलास्कातील तपकिरी अस्वल, उत्तर अमेरिकेतील काळे अस्वल, उत्तर ध्रुवीय पांढरे अस्वल आणि मलेशियातील छोटे अस्वल या अस्वलांच्या काही प्रसिद्ध जाती आहेत.

इतिहासपूर्व काळापासून माणसाने अस्वलांची मांस, हाडे, चामडी आणि चरबी मिळविण्यासाठी हत्या केलेली आहे; तर प्राचीन काळात त्यांची नखे आणि सुळे यांपासून दागिने तयार केले जात. त्यांच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत. हा प्राणी जागतिक वन्य जीव निधी या जगन्मान्य संस्थेचे बोधचिन्ह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा