निर्गुडी ही वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव व्हायटेक्स निगुंडो आहे. ती एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. तुळस, सब्जा या वनस्पतीही लॅमिएसी कुलातील आहेत. निर्गुडी मूळची पूर्व व दक्षिण आफ्रिका आणि आशियाच्या उष्ण प्रदेशातील असून पाकिस्तान, भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, फिलिपीन्स या देशांत आढळते. जलाशयाच्या काठी तसेच गवताळ जागी ती बऱ्याचदा वाढलेली दिसून येते.

न‍िर्गुडी (व्हायटेक्स निगुंडो): फांदीसह‍ित फुलोरा

निर्गुडीचे झुडूप किंवा लहान वृक्ष सरळ उभे, २–८ मी. उंच वाढते. याचे खोड फिकट तपकिरी असते. पाने संयुक्त व अंगुल्याकार (हाताच्या बोटांसारखी) असून पर्णिका ३–५ व भाल्यासारख्या असतात. प्रत्येक पर्णिका २.५–४ सेंमी. लांब असून मधली पर्णिका सर्वांत मोठी असते आणि ती देठाशी जुळलेली असते. मुख्य देठ २–५ सेंमी. लांब असतो. पानांच्या कडा दंतूर असून पानांच्या खालच्या बाजूला लव असते. दले वरून गर्द हिरवी व खालून पांढरट असतात. फुले स्तबकात येतात. ती लहान व निळसर पांढरी असून फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात. फळे रसाळ, लोंबती, ४ मिमी. आणि आकाराने गोल (वाटाण्याएवढी) असतात. पिकल्यावर ती काळी किंवा जांभळी होतात.

दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये निर्गुडीचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. या वनस्पतीत कॅस्टिसीन, आयसोओरिएंटीन, क्रायसोफिनॉल, फुक्टोज, ल्युटिओलिन इत्यादि प्रमुख घटक असतात. प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून असे आढळून आले आहे की, या वनस्पतीमध्ये दाहरोधी, जीवाणूरोधी व वेदनाशामक गुणधर्म आहेत. तिच्या पानांचा वापर डासांना पळवून लावण्यासाठी केला जातो. पाने व फळे कृमिनाशक असून पानांचा रस व्रणशुद्धीवर गुणकारी असतो. मुळे कफोत्सारक, ज्वरनाशक व पौष्टिक असतात. फिलिपीन्समध्ये साठविलेल्या लसणाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी तिचा वापर करतात. लाकूड जळणासाठी तसेच काही जातींच्या खोडापासून मिळणारे लवचिक लाकूड टोपल्या विणण्यासाठी वापरतात. तिचा उपयोग शोभेसाठी व कुंपणासाठी करतात.