शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांतील उष्ण प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनांमध्ये आढळतो.
पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सु. १५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १.५–१.८ मी. असतो. साल राखाडी, निळसर वा फिकट तपकिरी असून तिच्या लहान-मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांमधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल कीनो म्हणतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिच्छाकृती असून मोठी व त्रिदली असतात. जानेवारी ते मार्च महिन्यांत या वृक्षाला केशरी-लाल रंगाची फुले येतात. फुले मोठी, द्विलिंगी व बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजरीवर येतात. ती अनेक व सु. २.५ सेंमी. लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडे असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यांमुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. शिंबावंत फळे १५–२० सेंमी. लांब व सु. ४.५ सेंमी. रुंद असतात. त्यात एकच बी असते.
पळसाचे लाकूड काळपट पांढरे असते. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, म्हणून मोटेसाठी व विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पाने राठ व कडक असतात. त्यांपासून पत्रावळ्या तयार करतात. फुलांपासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग व कपडे रंगविण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत. त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनाचा कातडी कमाविण्यासाठी वापर करतात.