शरीरातील शर्करेच्या आणि इतर पोषकद्रव्यांच्या वापरावर नियमन राखणारे एक संप्रेरक. हे संप्रेरक कमी पडल्यास मधुमेह हा विकार होतो. स्वादुपिंड ही ग्रंथी जठर आणि आद्यांत्र यांच्याजवळ असते. स्वादुपिंडामध्ये लांगरहान्स द्वीपके नावाचे पेशीसमूह असतात. त्यात आल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा अशा चार प्रकारच्या पेशी असून यांपैकी बीटा पेशी इन्शुलिनाची निर्मिती करतात. इन्शुलीन हे प्रथिनयुक्त संप्रेरक असून ते ५१ अॅमिनो आम्लांचे बनलेले असते. १९२२ मध्ये फ्रेडरिक ग्रांट बॅंटिंग आणि चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांना इन्शुलिन प्रथम वेगळे करण्यात यश आले. याच कार्यासाठी त्यांना १९२३ सालचे मानवी वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. इन्शुलिन हे असे प्रथिन आहे की ज्याचा अॅमिनो आम्लक्रम प्रथम शोधला गेला. १९५५ मधील या शोधाचे श्रेय फ्रेडरिक सँगर यांना जाते. १९६६ मध्ये काटसोयानिस व त्यांचे सहकारी यांना इन्शुलिन कृत्रिम पद्धतीने बनविण्यात यश मिळाले.
इन्शुलिन हे शरीरातील पेशींचे कार्य सुरळितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे संप्रेरक आहे. पेशींना लागणारी ऊर्जा ही प्रामुख्याने ग्लुकोजपासून मिळते. अन्नातील पिष्टमय पदार्थांचे पचन झाल्यानंतर त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. हे ग्लुकोज लहान आतड्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये शोषले जाते. गरजेपुरते ग्लुकोज रक्तातून पेशींमध्ये शोषले जाते. हे शोषणाचे कार्य इन्शुलिनाद्वारे घडते. यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी ८०-१२० मिग्रँ. प्रति १०० मिलि. राखली जाते. अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करण्याचे कार्यदेखील इन्शुलिन करते. हे ग्लायकोजेन यकृत तसेच स्नायूंमध्ये साठविले जाते. ग्लुकोजचे प्रमाण वाढताच इन्शुलीनाची निर्मिती वाढते व ग्लुकोजचे प्रमाण कमी होताच इन्शुलीनाची निर्मिती कमी होते.
शरीरात इन्शुलीन तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. याउलट, इन्शुलिनाची निर्मिती अधिक झाल्यास रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा, भोवळ येणे व बेशुद्ध पडणे अशी स्थिती उद्भवते. मधुमेह या विकारामध्ये शरीर इन्शुलिन पुरेशा प्रमाणात तयार करू वा वापरू शकत नाही. मधुमेह तीव्र असल्यास इन्शुलिनाची अंत:क्षपणे (इंजेक्शने) घ्यावी लागतात. इन्शुलिन हे आजही फक्त अंत:क्षपणाच्या रूपात उपलब्ध आहे. गाय, बैल व डुक्कर यांच्या स्वादुपिंडांतून इन्शुलिन मिळविले जाते. हल्ली, जैव अभियांत्रिकीद्वारे जीवाणूंपासून मानवी इन्शुलिनाची निर्मिती करण्यात येते.