कोतवाल

कोतवाल हा पक्षी डायक्रूरिडी या पक्षी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायक्रूरस मॅक्रोसेर्कस आहे. आपल्या तकतकीत काळ्या रंगामुळे कोतवाल पक्ष्याला ‘कोळसा’ असेही नाव पडले आहे. आफ्रिकेपासून आशिया, ऑस्ट्रेलियापर्यंत हा पक्षी आढळतो.

कोतवाल हा आकाराने बुलबुलपेक्षा मोठा असतो. त्याच्या शेपटीसह शरीराची लांबी १८ ते ३० सेंमी. असते. शेपटी लांब असून एका खोल भेगेने दुभागलेली असते. तसेच हे दोन भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात. चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका दिसतो. डोळ्यांचा रंग तांबडा असतो. नराच्या तुलनेत मादीचा रंग कमी तकतकीत असतो.

कीटक व त्यांचे सुरवंट हे कोतवालाचे भक्ष्य आहे. एखाद्या झाडाची वरची फांदी किंवा दूरध्वनीच्या तारा अशा सोईस्कर जागी बसून तो भक्ष्यावर पाळत ठेवतो. हवेतील किंवा जमिनीवरचा कीटक दिसला की, त्याला पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो व कीटकांचे तुकडे तोडून खाऊन टाकतो. गायबगळ्याप्रमाणे चरणार्‍या गुरांच्या पाठीवर बसूनही तो कीटक टिपतो.

कोतवाल पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः एप्रिलपासून ऑगस्टपर्य़ंत असतो. एखाद्या उघड्या जागेवरील एकटे दुकटे उंच झाड निवडून त्याच्या खूप उंचीवरील फांदीच्या टोकाकडील दुबेळक्यात तो घरटे बांधतो. कोळिष्टकाने चिकटविलेल्या बारीक काटक्या व धाग्याचे ते बनविलेले असून वाटीसारखे असते. मादी एका वेळेला पांढर्‍या रंगाची बहुधा चार अंडी घालते. घरटे बांधणे, अंडी उबविणे आणि पिलांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी मिळून करतात. कोकिळेप्रमाणेच कोतवाल भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी आहे.

कोतवाल हा पक्षी अतिशय चपळ असतो गोंगाट्या व भांडखोर असला तरी तो गरीब पक्ष्यांना त्रास देत नाही. हिंस्र पक्ष्यांपासून आपल्या बरोबर तर पक्ष्यांच्या घरट्यांचे किंवा पिलांचे रक्षण करताना त्याचे वरील सगळे गुण प्रकर्षाने प्रकट होतात. हा पक्षी कावळ्याचा पाठलाग व करताना त्याला टोचा मारून हैराण करताना पुष्कळदा दिसतो. कावळ्यासारख्या लुटारू, लबाड आणि मोठ्या पक्ष्याचा देखील याच्यासमोर टिकाव लागत नाही. प्रसंग आला तर गरुड व ससाणा यांच्यावरही हल्ला चढवायला तो मागे-पुढे पहात नाही. होला, हळदी वगैरे सौम्य वृत्तीच्या पक्ष्यांना याचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे कोतवाल ज्या झाडावर घरटे बांधतो त्याच झाडावर ते आपली घरटी बांधतात. त्यामुळे त्यांना अनायासे संरक्षण मिळते.