वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश, पटकी, विषमज्वर, संग्रहणी व कृमींची बाधा अशा अनेक रोगांत अतिसार होऊ शकतो. रासायनिक पदार्थ आणि उघडे व शिळेपाके अन्न यांच्या सेवनामुळे अतिसार होतो. अन्नातील स्निग्ध पदार्थ पचवून त्यांचे शरीरात शोषण होण्याची क्रिया बिघडल्यास वारंवार चिकट व दुर्गंधीयुक्त जुलाब होतात. अनेकदा अधिहर्षता, भावनिक किंवा मानसिक क्षोभ यांमुळेही वारंवार शौचाला होते.अतिसाराचे तीव्र आणि दीर्घकालिक हे दोन मुख्य प्रकार आहेत. तीव्र प्रकारात एकाएकी पोटात कळ येते व बेंबीभोवती गुरगुर होऊन अस्वस्थता वाटते. तसेच, अतिसाराच्या तीव्रतेनुसार व कारणानुसार ताप येणे, अन्नाविषयी तिटकारा वाटणे, उलटी होणे, मळमळणे, अंग दुखणे, हातापायांत गोळे म्हणजे पेटके येणे इ. लक्षणेही आढळतात. अतितीव्र अतिसारात रक्तातील द्रव जाऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे जीव कासावीस होतो, जीभ कोरडी पडते, शक्तिपात होऊन थकल्यासारखे होते. तीव्र अतिसार बहुधा अन्नविषबाधेने अथवा सूक्ष्मजीव संसर्गाने होतो.
दीर्घकालिक अतिसारात अधूनमधून अतिसार आणि इतर वेळी नेहमीप्रमाणे शौचाला होते. ही लक्षणे अनेक महिने टिकून राहतात. हा अतिसार विशेषकरून आतड्यांचा क्षय, एड्स, गाठींची वाढ, आमांश यांसारख्या आतड्यांच्या दीर्घकालिक रोगांचे एक लक्षण असते.
उपचार करण्यापूर्वी अतिसाराचे मूळ कारण शोधतात. खाण्यातील अनियमितपणामुळे होणारा अतिसार दोन-तीन दिवसांत आपोआप बरा होतो. तीव्र अतिसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास नीलेतून ग्लुकोज व लवणविद्राव (सलाइन) देतात. आतड्यांना शामक अशी प्रतिजैविके देतात.
लहान मुलांना वारंवार पातळ, हिरवट, चोथापाणी असलेले व दुर्गंधीयुक्त शौचाला होणे म्हणजे बालकांचा अतिसार होय. आहारातील अनियमितपणा, पचायला कठिण असलेले पदार्थ (उदा., गव्हातील ग्लुटेन, दुग्धशर्करा) खाणे, एका वेळेस जादा खाणे, दूषित अन्न खाणे ही याची कारणे आहेत. परंतु दूषित अन्नामुळे अतिसाराची साथ येऊ शकते. अशक्तपणा, ग्लानी इ. लक्षणे आढळतात. फार तीव्र प्रकारात रक्त आम्लधर्मी होते व शरीरातील पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. मुलाची टाळू व डोळे खोल जातात तसेच मूत्राचे प्रमाण घटते. अशा परिस्थितीत वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा जीविताला धोका उत्पन्न होतो. उपचार करताना नीलेतून लवणविद्राव व ग्लुकोज देऊन शरीरातील क्षार व पाणी यांचा समतोल परत स्थापन करतात. वाजवीपेक्षा जास्त व पचायला कठिण अन्न खाल्ल्याने होणारा अतिसार आपोआप बरा होतो.
अन्नाबरोबर विशिष्ट सूक्ष्मजीवांचा (उदा., एश्चेरिकिया कोलाय)संपर्क होऊन अगदी लहान मुलांमध्ये अतिसाराची साथ उद्भवू शकते. अशा वेळी अतिसार झालेल्या मुलाला स्वतंत्र खोलीत वेगळे ठेवतात आणि त्याची काळजी घेणार्या व्यक्तींसुद्धा इतर मुलांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेतात. आजारी मुलाची भांडी, कपडे वगैरे स्वतंत्र ठेवतात. सूक्ष्मजीव अतिसारासाठी प्रतिजैविके देतात. अतिसारावर सोपा, घरगुती बहुगुणी उपाय म्हणजे ‘ जल संजीवनी’ देणे. १ लि. स्वच्छ पाण्यात १ चमचा मीठ आणि ८ चमचे साखर टाकून हे जल वारंवार द्यावे. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते. रुग्ण बरा होतो.
अतिसारात पाणी, सरबते, फळांचे रस, शहाळ्यातील पाणी इ. द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. पचायला हलके व पोषक पदार्थ ( उदा., भाताची पेज, वरणाचे पाणी, बटाटा, मऊ भात, दही, ताक, फळे इ.) घ्यावेत. स्वच्छता ठेवणे, शक्यतो उकळून गार केलेले पाणी पिणे, ताजे व गरम अन्न खाणे, उघड्यावरचे तसेच बाहेरील तयार खाद्यपदार्थ टाळणे आणि शिळे अन्न न खाणे यांसारखे प्रतिबंधक उपाय उपयोगात आणावेत.