पिस्ता हा पानझडी वृक्ष अॅनाकार्डिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव पिस्टाशिया वेरा आहे. आंबा, काजू व बिब्बा या वनस्पतीही ॲनाकार्डिएसी कुलातील आहेत. पिस्ता मूळचा मध्य आशिया आणि मध्य-पूर्व प्रदेश या भागांतील असावा, असे मानतात. तो इराण, इराक, सिरिया, लेबानन, टर्की, ग्रीस, ट्युनिशिया, भारत, पाकिस्तान, चीन, ईजिप्त, इटली, अफगाणिस्तान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत आढळतो. भारतात काश्मीरमध्ये त्याची लागवड केली जाते. पिस्ता या इराणी नावावरून पिस्टाशिया हे प्रजातीचे नाव दिले गेले आहे.
पिस्ता वृक्ष सु. १० मी. उंच वाढतो. त्याच्या फांद्यांचा पसारा मोठा असतो. पाने संयुक्त व विषमदली असून पर्णिकांच्या १–५ जोड्या असतात. पर्णिका ५–१० सेंमी. लांब व ३–६ सेंमी. रुंद असतात. पर्णिका भालाकार असून टोक बोथट असल्यामुळे अंडाकृती दिसतात. पाने प्रथम लवदार असून नंतर ती गुळगुळीत होतात. फुले लहान असून परिमंजरीत येतात. हा वृक्ष एकलिंगाश्रयी असल्यामुळे नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या वृक्षांवर येतात. मादी-फुलांमध्ये परिदलाचे मंडल एकच असून जायांग संयुक्त, ऊर्ध्व, ४-५ अंडपींचे असते. बीजक एकच असते. नर-फुलांमध्ये परिदलाचे मंडल एकच असते. पुंकेसर ४-५ असतात. परागण वाऱ्यामुळे होते. लागवडीखाली असलेल्या बागांमध्ये परागण हाताने केले जाते. फळे आठळीयुक्त, लंबगोल, थोडी चपटी, सुरकुतलेली व पिवळसर ते लालसर रंगांची असतात. आठळीचा रंग फिकट पिवळा असून त्याचे कवच कठीण असते. वाळल्यावर कवच तडकते आणि आतील तांबूस बीजावरण दिसते. यालाच पिस्ता म्हणतात. बियांतील मगज हिरवा किंवा पिवळसर असतो. पूर्ण वाढलेल्या वृक्षापासून एका मोसमात सु. २२ किग्रॅ. पिस्ते मिळतात.
पिस्ता हा सुक्या मेव्यातील एक घटक आहे. तो मिठाई, आइसक्रीम व पक्वान्ने यांमध्ये वापरतात. तो मुखशुद्धीसाठी भाजून व खारवून खातात. बियांतील स्निग्ध, सुगंधी व मधुर तेलामुळे फळांचा दर्जा ठरतो. हे तेल स्तंभक, पाचक आणि शामक असून पोटातील विकारांवर गुणकारी आहे. बियांमध्ये २१% प्रथिने, २७% कर्बोदके, ४५% मेद, खनिजे, क जीवनसत्त्व आणि ब–समूह जीवनसत्त्वे असतात. त्याच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे (एलडीएल) प्रमाण कमी होते, असे आढळले आहे. मात्र खवट पिस्ते खाल्ल्यास अफ्लाटॉक्सीन नावाचे विष पोटात जाऊन त्रास होण्याची शक्यता असते. या वृक्षाच्या पानांचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी करतात. लाकडापासून शोभेच्या वस्तू बनवितात. इराण, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, टर्की, सिरिया व चीन हे देश पिस्त्याचे प्रमुख उत्पादक आहेत.
https://www.youtube.com/watch?v=H5KAbyi3n14