सूफी तत्त्वप्रणालीतील एक अवस्था. अध्यात्मसाधना करताना भक्ताचा जीव सात टप्प्यांतून जातो. त्याला ‘मकामात’ (मुक्काम) म्हणतात. यातही मनाच्या अनेक अवस्था असतातच. ‘अनल्हक’ (मी सत्य आहे) ही या संप्रदायाची मूलभूत धारणा. जीव आणि शिव हे एकरूप असतात. प्रपंचाच्या उपाधीमुळे ते विभक्त वाटतात. परंतु आत्यंतिक भक्तीच्या बळावर जीवाला परामात्मतत्त्वाशी एकरूपता साधता येते. या साधनेसाठी भक्त स्वतःकडे प्रेयसीची भूमिका घेतो व परमेश्वररूपी प्रियकरास आळवतो. हाच प्रवास सात अवस्थांतून घडत असतो. १) मुमुक्षुला पश्चात्ताप होतो व तो सेवामार्ग स्वीकारतो. २) ‘इष्क’ यात परमेश्वरी कृपेने आत्म्याला परमात्म्यासंबंधी ओढ लागते. ३) निवृत्ती तथा त्याग. ४) ‘ज्ञान’ भक्त परमात्म्याच्या रूपगुणाचे ध्यान करू लागतो. ५) ‘वजद’ मनाची उन्मनी अवस्था. यासाठी ध्यानधारणा आवश्यक. या अवस्थेत आत्म्याची जाणीव नष्ट होते व परमेश्वराशी संबंध येऊ लागतो. ६) हकीकत मुमुक्षुच्या हृदयात परमात्मप्रीतीचा पूर्ण प्रकाश पडतो. त्या वेळी मुमुक्षुत परमेश्वराला पूर्ण शरणागत झाल्याची भावना निर्माण होते. ७) ‘वसल’ म्हणजे मिलन. या टप्प्यात मुमुक्षुला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. या अवस्थेत जीवाचे अस्तित्व संपून तो परमेश्वरात विलीन झालेला असतो. त्यालाच फना असे म्हणतात. फना म्हणजेच स्वत्वाचा विलय. त्यालाच अल्लाहवरील प्रेमाने माणसाची स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नष्ट होणे. ही अंतिम अवस्था. या सर्व अवस्था प्राप्त होण्यासाठी साधनमार्गाचा अवलंब करावा लागतो.
सूफींनी सोप्या मार्गाचा अवलंब केला आहे. १. वासना व इच्छा यांचे दमन करणे व त्यातून आत्म्याचे नैतिक रूपांतर करणे. २. ईश्वराच्या नामस्मरणाने सर्व चिंता, कर्म तसेच वासना इत्यादींचा नाश करणे. ३. समग्र चैतन्यशक्तीस निष्क्रिय करणे. त्यातून निर्वाण या शेवटच्या अवस्थेला पोहोचणे. यालाच सूफींनी फना-अलफना असे म्हटले आहे.
परमात्मा साधकामध्ये काही परिवर्तन घडवतो किंवा परमात्मा आणि साधक यांच्यामध्ये सादृश्य निर्माण होते, असे सूफी मानत नाहीत. ज्याप्रमाणे पावसाचे पाणी समुद्रात पडले असता नष्ट होत नाही परंतु त्यांचे वेगळे अस्तित्व नसते, त्याप्रमाणे परमात्मा व साधक यांचे वेगळे अस्तित्व नसते, असे सूफी मानतात.
आधुनिक काळातील प्रसिद्ध भारतीय सूफी मौलाना अशरफ अली थानवी (१८६३‒१९४३) यांनी फनाचे दोन टप्पे सांगितले आहेत. १. फना-ए-वाकई (वास्तविक फना)–व्यक्ती कुकर्मापासून स्वतःला मुक्त करतो. तसेच काम, क्रोध, मोह इ. षड्रिपूंपासून दूर जातो, तेव्हा त्याला फना-ए-वाकई असे म्हणतात. २. फना-ए-इल्मी (ज्ञानस्तरीय फना)–व्यक्तीला अल्लाहशिवाय कोणत्याही वस्तूंचा मोह नसतो. त्याच्या हृदयात फक्त खुदा व त्याचे प्रेम असते. त्याला फना-ए-इल्मी असे म्हटले आहे.
थोडक्यात फना म्हणजे साधक स्वतःचे अस्तित्व पूर्णतः विसरून जातो . प्राणीजगताशी त्याचे नाते संपून जाते. त्याच्या आत्म्याला परमात्म्याच्या अनन्य सौंदर्याचे प्रत्यक्ष दर्शन होते. परमात्म्यात एकजीव होऊन जातो.
संदर्भ :
- Shushtery A. M. A., Early Sufis and Their Sufism, Delhi, 1999.
- कौसर, याजदानी, सूफी दर्शन एवं साधना, दिल्ली, १९९७.
- वकील, अलीम, सूफी संप्रदायाचे अंतरंग, पुणे, २०००.
- http://hindi.speakingtree.in/article/content-247031
समीक्षक – गुलाम समदानी