पोलंडच्या चित्रपटसृष्टीचे जागतिक योगदान लक्षणीय आहे. चित्रपटविषयक अनेक पायाभूत गोष्टी पोलंडमध्ये घडल्या. आज जगभरातील अनेक महोत्सवांत पोलंडचे चित्रपट दाखविले जातात आणि त्यांना पुरस्कारही मिळतात.

काझीम्येश प्रोझेंस्की, पीटर लेबिजिन्स्की आणि बोलेश्वाव मातुशेव्स्की यांसारख्यांनी पोलंडमध्ये सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली. १८९४ मध्ये प्रोझेंस्कीने प्लेओग्राफ या यंत्राचा शोध लावला. या एकाच यंत्राद्वारे चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण (projection) दोन्ही करता येई. १८९५ मध्ये लेबिजिन्स्कीने सिनेमॅटोग्राफ यंत्राचा शोध लावला आणि त्याद्वारे दोन लघुपट चित्रित केले. मातुशेव्स्कीने १८९६ पासून विविध माहितीपट चित्रित केले. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी शस्त्रक्रियांचे चित्रण, मानववंशशास्त्रज्ञांसाठी पोलिश लोककला आणि लोकरीतींचे चित्रण असे त्यांचे विषय होते. रशियन झारचे आणि इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचे अधिकृत चित्रण करण्याची जबाबदारीही त्याने पेलली. १८ जुलै १८९६ रोजी पोलंडमध्ये चित्रपटाचा पहिला सार्वजनिक खेळ एडिसनच्या कायनेटोग्राफ या यंत्राच्या साहाय्याने झाला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पोलंडमध्ये काही चित्रपटनिर्मितिगृहे स्थापन होऊन चित्रपटनिर्मिती सुरू झाली. १९१८ पर्यंत पोलंड रशिया आणि जर्मनी यांच्या आधिपत्याखाली विभागलेला होता. १९१८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर चित्रपटनिर्मिती जोमाने चालू झाली.  १९१० मध्ये पहिला पोलिश अॅ‌निमेशनपट (सचेतनीकरणपट) निर्माण झाला. ‘स्टॉप मोशन’ तंत्र वापरणारा हा जगातील पहिला अॅ‌निमेशनपट होता. १९३० मध्ये पहिला पोलिश बोलपट आणि १९३७ मध्ये पहिला रंगीत पोलिश चित्रपट निर्मिला गेला. या काळात निर्माण झालेले चित्रपट हे प्रामुख्याने साहित्यकृती, सामाजिक आशय आणि विनोद यांवर आधारित होते. यिद्दिश भाषेतील चित्रपटांची निर्मिती हे या काळातील पोलिश चित्रपटसृष्टीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा एकदा पोलिश चित्रपटनिर्मिती मंदावली.

१९४५ नंतरच्या कम्युनिस्ट राजवटीने आपल्या धोरणांचा आणि विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी चित्रपट हे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापरण्याचे ठरवले. १९४४ साली अभ्यवेक्षण (censorship) मंडळ स्थापन झाले. चित्रपटसृष्टी पूर्णतः सरकारी अमलाखाली आली. १९४५ साली ‘फिल्मपोल्स्की’ या सरकारी चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना झाली. समाजवादी वास्तववादी (सोशलिस्ट रिअलिझम) शैलीतील चित्रपटांची निर्मिती तेथे सुरू झाली. १९४८ साली लॉज या शहरात स्थापन झालेल्या राष्ट्रीय चित्रपट विद्यापीठाचा (लॉज फिल्म स्कूल) पोलंडच्या चित्रपटावर मोठा प्रभाव पडला. अलेक्झांडर फोर्ड या प्रख्यात दिग्दर्शकाकडे ‘फिल्मपोल्स्की’ची धुरा देण्यात आली. ‘लॉज फिल्म स्कूल’ मध्ये चित्रपटाचा प्राध्यापक म्हणूनही त्याची नियुक्ती झाली. स्टालिनच्या मृत्यूनंतर (१९५३) सरकारची पकड काहीशी सैलावली आणि दिग्दर्शकांना मर्यादित स्वातंत्र्य मिळू लागले. आंद्रे मुंक, आंद्रे वायदा आणि वॉयसिएक हास यांसारखे दिग्दर्शक या काळात उदयाला आले. वायदाने दिग्दर्शित केलेला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट अ जनरेशन १९५५ साली प्रदर्शित झाला आणि पोलिश चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू झाला. पोलंडच्या इतिहासातील अनेक महत्त्वाची वळणे वायदाने आपल्या चित्रपटांतून जगासमोर आणली.  रोमान पोलान्स्कीने (नाईफ इन द वॉटर, १९६२) पूर्णतः वेगळ्या धाटणीची चित्रपटशैली अनुसरून पोलिश चित्रपटाला या काळात नवा चेहरा दिला. मुंक, वायदा आणि पोलान्स्की हे तिघेही ‘लॉज फिल्म स्कूल’मध्ये फोर्डचे विद्यार्थी होते.  या वातावरणात निर्माण झालेल्या चित्रपटांचा प्रवाह ‘पोलिश फिल्म स्कूल’ म्हणून ओळखला जातो.

१९६० च्या दशकात अभिव्यक्तीवर पुन्हा काही प्रमाणात निर्बंध आले. सरकारने अनेक चित्रपटांवर बंदी घातली. १९६८ मधील विद्यार्थ्यांची चळवळ सरकारने मोडून काढली. कम्युनिस्ट पक्षात ज्यू-वंशीयांना विरोध होऊ लागला. रोमान पोलान्स्की आणि अलेक्झांडर फोर्ड (दोघेही ज्यू-वंशीय) यांनी देशत्याग केला. आंद्रे वायदा आणि वॉयसिएक हास हे पोलंडमधून कार्यरत राहिले. १९६८ नंतरच्या काळात क्रिस्तोफझानुसी, क्रिस्तोफ  किएस्लोव्हस्की आणि अन्येष्का हॉलंड यांसारखे नवे दिग्दर्शक उदयाला आले. सरकारवर टीका करणारे आणि कम्युनिस्ट धोरणांमुळे जनतेचे झालेले हाल दर्शविणारे चित्रपट १९७० च्या दशकात पुन्हा काही प्रमाणात निर्माण झाले. त्यांच्यावर सरसकट बंदी घालण्यापेक्षा त्यांचे मर्यादित प्रदर्शन करण्याचे धोरण कम्युनिस्ट सरकारने अवलंबिले. मॅन ऑफ मार्बल (वायदा, १९७६), कामूफ्लाज (झानुसी, १९७६), कॅमेराबफ  (किएस्लोव्हस्की, १९७९)  ही यांतील काही ठळक नावे होत. मॅन ऑफ आयर्न  (वायदा, १९८१)  या चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात (cannes film festival) प्रतिष्ठेचा ‘गोल्डन पाम’  पुरस्कार मिळाला.

१९८१ मध्ये कम्युनिस्ट पक्षाने ‘मार्शल लॉ’ प्रस्थापित केला. त्याद्वारे आलेल्या कडक निर्बंधांचा चित्रपटनिर्मितीवर परिणाम झाला. सरकारविरोधी विचार मांडणाऱ्या चित्रपटांवर बंदी आली. वायदा आणि हॉलंड यांनी देशत्याग केला. १९८०च्या दशकाच्या अखेरीस पूर्व यूरोपातील कम्युनिस्ट राजवटी कोसळू लागल्या. त्या काळात पोलंडमध्ये चित्रपटांवरचे निर्बंध सैल झाले. चित्रपटनिर्मिती ही सरकारी मक्तेदारी राहिली नाही. अभ्यवेक्षणही बंद झाले. १९९० मध्ये वायदा पोलंडला परतला आणि तेथे कार्यरत झाला. किएस्लोव्हस्कीची ब्लू, व्हाइट आणि रेड  ही त्रिधारा जगभर गाजली (१९९३-१९९४). वायदाला सन्माननीय‍ ऑस्कर पारितोषिक मिळाले (२०००). पावेल पावलिकोव्हस्की दिग्दर्शित इडा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीचे ऑस्कर पारितोषिक मिळाले (२०१५). २०१५च्या आकडेवारीनुसार पोलंडमध्ये दर वर्षी ४०-५० चित्रपट निर्माण होतात. पोलंडमध्ये सुमारे १२५० चित्रपटगृहे आहेत. पोलिश फिल्म इन्स्टिट्यूट, दूरचित्रवाणी आणि खाजगी निर्मात्यांकडून चित्रपटांना पाठबळ मिळते.

समीक्षक – निखिलेश चित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा