देशोदेशींच्या निवडक आणि दुर्मीळ चित्रपटांचे जतन आणि संवर्धन करणारी पुणे येथील प्रसिद्ध संस्था. जागतिक स्तरावर महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या चित्रपटांच्या प्रती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये संग्रहित करण्यात आल्या आहेत. चित्रपटांची जपणूक, संवर्धन करण्यासाठीच्या कामात आंतरराष्ट्रीय स्तरावर या संग्रहालयाने नावलौकिक मिळवला असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि चित्रपटांचा मोठा संग्रह ही या संग्रहालयाची वैशिष्ट्ये आहेत. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था कार्यरत आहे.

इतिहास :

चित्रपटांची केवळ निर्मिती होऊन भागणार नाही, तर पुढील पिढ्यांसाठी चित्रपटांचा हा वारसा जपला पाहिजे, या जाणिवेतून हे संग्रहालय सुरू करण्याची कल्पना पुढे आली. फेब्रुवारी १९६४ मध्ये या संग्रहालयाचे कार्य पुण्यात सुरू झाले. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) आवारात ‘फिल्म लायब्ररी’च्या रूपाने ही संस्था अस्तित्त्वात आली. एफटीआयआयचे तत्कालीन संचालक जगत मुरारी आणि प्रा. सतीश बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यल्प निधी व काही मोजक्या चित्रपटांच्या संग्रहाने हे ग्रंथालय सुरू झाले. चित्रपटांचे आकर्षण असलेल्या पी. के. नायर या तरुणाची सहायक म्हणून निवड करण्यात आली. नायर यांनी या कामी स्वत:ला झोकून दिले. देशविदेशांत फिरून त्यांनी नायट्रेट फिल्मपासून ते फिल्मवरील अनेक उत्तमोत्तम आणि दुर्मीळ चित्रपट त्यांनी संग्रहालयात आणले. त्यांत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ⇨ दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र  या मूकपटासह परदेशांतील चित्रपटांचाही समावेश होता. पी. के. नायर यांनी चित्रपटसंवर्धनासाठी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांच्यावर सेल्यूलॉईडमॅन  (२०१२) हा माहितीपट शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांनी दिग्दर्शित केला. या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोथरूड येथे उपकार्यालय आहे. तसेच कोलकाता, बंगळुरू आणि तिरुअनंतपुरम् येथे या संस्थेची विभागीय कार्यालये आहेत.

अभिजात चित्रपटांचा संग्रह :

विविध भाषांतील भारतीय चित्रपटांसह जागतिक स्तरावरील उत्तमोत्तम चित्रपट संग्रहालयामध्ये संग्रहित करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील ल्यूम्येअर ब्रदर्स यांच्यापासून ते अकिरा कुरोसोवा (जपान), ⇨ इंगमार बर्गमन (स्वीडन), व्हिक्टोरिया डिसीक्का (इटली), ⇨ सत्यजित रे अशा असंख्य मान्यवर दिग्दर्शकांचे अभिजात चित्रपट संग्रहालयामध्ये आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रेनिर्मित व दिग्दर्शित श्यामची आई हा चित्रपट १९५३ सालच्या सर्व भारतीय भाषिक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट ठरल्याने राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ मिळविणारा पहिला चित्रपट ठरला. तसेच आचार्य अत्रेनिर्मित व दिग्दर्शित महात्मा फुले (१९५४) हा राष्ट्रपतींचे रजतकमळ मिळविणारा पहिला चित्रपट ठरला. हे दोन्ही चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आहेत.

सोयीसुविधा :

चित्रपटांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठीची सर्व सुविधा या संस्थेमध्ये आहे. त्यात कोल्ड स्टोरेज व्हॉल्ट्स, चित्रपटांच्या रिळांची तपासणी यंत्रणा, ८ मिमी, १६ मिमी, ३५ मिमी आणि डिजिटल प्रक्षेपण यांची सुविधा उपलब्ध आहे. डिजिटलायझेशनची अत्याधुनिक यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे.  संस्थेची स्वत:ची तीन चित्रपटगृहे असून चित्रपटविषयक सुसज्ज ग्रंथालयही आहे. दोन हजारांहून अधिक डीव्हीडी, दृक्ध्वनिफिती (व्हिडिओ कॅसेट्स),  तीस हजारांहून अधिक पुस्तके, ३५००० पटकथा, २२००० भित्तिपत्रके (पोस्टर्स), १३००० गीत- पुस्तिका (साँग बुकलेट्स), ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड्स), दीड लाखांहून अधिक छायाचित्रे व दोन लाखांहून अधिक चित्रपटविषयक वृत्तपत्र-कात्रणे एवढा प्रचंड दस्तऐवज संग्रहालयामध्ये आहे. पन्नास हजारांहून अधिक चित्रपट-लघुपटांची माहिती, छायाचित्रे, भित्तिपत्रके एका सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. जयकर बंगल्याचे नूतनीकरण करून त्याचे डिजिटल ग्रंथालयात रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच जुन्या ध्वनिमुद्रिकांचे डिजिटलायझेशन करून संगीतगृह (म्युझिक बूथ) सुरू करण्याची ही योजना आहे.

इतिहासाशी संबंधित असलेल्या कोणत्याही प्रकारच्या दृक्श्राव्य किंवा छायाचित्रस्वरूपाचे साहित्य जतन येथे केले जाते.  महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचे अंशही संग्रहालयामध्ये आहेत.

संस्थेचे उपक्रम :

जुने चित्रपट शोधून ते मिळवणे आणि त्यांचे जतन व संवर्धन करणे हे संग्रहालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याबरोबरच ही संस्था विविध उपक्रमही राबवते. त्यांत चित्रपट महोत्सवांचे आयोजन, चित्रपट रसास्वाद कार्यशाळा आदींचा समावेश आहे. विविध महोत्सवांमध्ये दाखवण्यासाठी संग्रहालयाकडून चित्रपट उपलब्ध करून दिले जातात. तसेच संस्थेतर्फे चित्रपट या विषयाच्या अनुषंगाने संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप) दिली जाते. ही योजना अल्प प्रतिसादामुळे २००८ मध्ये बंद करण्यात आली होती; परंतु २०१५ मध्ये पुन्हा ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन :

देशातील चित्रपटांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलायझेशन करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. या योजनेसाठी ५९७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ऱाष्ट्रीय चित्रपट संग्रहालयावर सोपवण्यात आली आहे. त्या माध्यमातून १००० चित्रपटांचे डिजिटलायझेशन करण्याचे उद्दिष्ट आहे.

समीक्षक – अनिल झणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा