प्रातिशाख्य ग्रंथ : वेदमंत्रांच्या उच्चारणशास्त्राशी संबंधित एका प्राचीन ग्रंथ प्रकाराचे नाव. या ग्रंथांमध्ये वेदांच्या प्रत्येक शाखेशी संबंधित उच्चारणाबद्दलचे निरनिराळे नियम एकत्रित केलेले आहेत. वेदांच्या संहिता तयार झाल्यावर त्या काळात संहितेचा अर्थ जरी स्पष्ट असला तरीही कालांतराने भाषेत फरक पडला आणि ऐतिहासिक परंपरा खंडित होऊ लागली,म्हणून तिच्या अर्थबोधाकरिता पदच्छेद करावा लागला. प्रत्येक वेदाचा तयार असणारा पदपाठ घेऊन त्यावरून संहिता म्हणण्याच्या पूर्ण पद्धतीचे विवेचन या ग्रंथांमध्ये आहे.
प्रातिशाख्य ग्रंथांचा मुख्य विषय वैदिक मंत्रांचे शुद्ध उच्चारण, पदाध्ययन, संधीनियम व यथार्थ स्वररक्षण हा आहे. प्रातिशाख्य ग्रंथांवरून जरी असे कळते की वेदाच्या प्रत्येक शाखेसाठी हे ग्रंथ होते, तरीही त्या त्या शाखेच्या अनुयायांची संख्या कमी झाल्यावर प्रातिशाख्य ग्रंथही कमीकमी होत गेले. इतर शिल्लक असलेल्यांपैकीही त्याच वेदांच्या इतर शाखांमध्येही ते मिसळले. सध्या उपलब्ध असलेल्या पाच किंवा सहा प्रातिशाख्यग्रंथांच्या स्वरूपावरून कळते की ती प्राचीन प्रातिशाख्यांचा राहिलेला भाग असावीत.
उपलब्ध प्रातिशाख्य |
रचनाकार |
१.ऋकप्रातिशाख्य | शौनक |
२. तैत्तिरीय प्रातिशाख्य | आत्रेय |
३. वाजसनेयी प्रातिशाख्य | कात्यायन |
४. अथर्व प्रातिशाख्य | |
५. ऋक्तन्त्र ( सामवेद ) | शाकरायन |
प्रातिशाख्य ग्रंथांचे प्रतिपाद्य विषय – प्रातिशाख्य ग्रंथांमध्ये मंत्रांमधील पदे परंपरागत पद्धतीने जशीच्या तशी घेऊन, त्यांच्या शुद्ध उच्चारणाविषयी, स्वराविषयी विचार केला आहे.प्राचीन ग्रंथांनुसार प्रातिशाख्यांचे प्रतिपाद्य विषय पुढीलप्रमाणे आहेत-
- वर्णसमाम्नाय – स्वर, व्यंजने यांची गणना व त्यांचे उच्चारण इ. संबंधी नियम
- अच्, हल्, विसर्ग आदी संधी
- प्रगृह्यसंज्ञा,पद्यविभागांचे नियम व त्यांचे अपवाद
- उदात्त, अनुदात्त शब्दांची गणना, स्वरिताचे भेदवआख्यातस्वर
- संहितापाठ व पदपाठयातील भेद दाखवणारे नियम व सत्व, षत्व, दीर्घ इत्यादींचे विवरण
- अथर्वप्रतिशाख्यात संहितापाठ व क्रमपाठाचे नियम आहेत. तसेच तैत्तिरीय प्रातिशाख्यात जटापाठाचे नियम आहेत.
- सामप्रातिशाख्यात निरनिराळ्या गीतींमधील उच्चारणकृत भेदांचे वर्णन आहे.
- विविध वैदिक छंदांचे विवरण
या ग्रंथांमधील विषयांवरून स्पष्ट होईल की प्राचीन काळातील वैदिक संहितांचा प्रामुख्याने विचार प्रातिशाख्य ग्रंथांमध्ये आहे. व्याकरणशास्त्राच्या इतिहासातील अगदी सुरूवातीचे ग्रंथ म्हणजे प्रातिशाख्ये होत. केवळ वैदिक भाषेचाच विचार यात आहे. लोकांमध्ये प्रचलित असलेल्या भाषेचा विचार व्याकरणग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे काही विद्वान प्रातिशाख्ये व व्याकरणग्रंथ यांना वेगळे मानतात. तर काहीजण असे मानतात की प्रातिशाख्यात व्याकरणग्रंथांच्याच विषयांचे विवेचन असल्याने विशेष प्रकारचे व्याकरणग्रंथ म्हणजेच प्रातिशाख्य ग्रंथ होत.
प्रातिशाख्य ग्रंथांचा काळ -प्रातिशाख्य ग्रंथ पाणिनीपूर्व की पाणिनीनंतर यावरून बरेच मतभेद आहेत. बहुतांशी विद्वान असे मानतात की प्रातिशाख्य ग्रंथांची रचना पाणिनीपूर्व काळात झाली आहे. म्हणजेच इस.पू.सहाव्या शतकाच्या आधी प्रातिशाख्य ग्रंथ अस्तित्वात आलेले होते.
प्रातिशाख्य ग्रंथांनाच पार्षद किंवा पारिषद असेही म्हणतात.‘परिषदि भवं पार्षदम्’ याव्युत्पत्तीनुसार वैदिक विद्वानांच्या सभांमध्ये जे शास्त्रार्थ होत असत त्यांचा निर्णयस्वरूप भाग म्हणजे हे प्रातिशाख्य ग्रंथ आहेत असे दिसते.प्रातिशाख्य ग्रंथांवर टीकाग्रंथही निर्माण झालेले दिसतात. बाराव्या शतकात उव्वटाने ऋक् व वाजसनेयी प्रातिशाख्यावर टीका लिहिलेली आहे.तैत्तिरीय प्रातिशाख्यावर त्रिभाष्यरत्न ( सोमयार्य ) आणि वैदिकाभरण (गोपालयज्वन्) या दोन टीका आहेत. वाजसनेयी प्रातिशाख्यावर अन्नंभट्ट यांची टीका आहे. अशाप्रकारे प्रातिशाख्य ग्रंथ हे प्रत्यक्ष व्याकरणावरील ग्रंथ नसले तरीही व्याकरणासंबंधी विषयांचे यात विवेचन आले आहे. प्राचीन काळातील अनेक वैयाकरणांची नावे व मते यात उद्धृत केली आहेत. त्यामुळे व्याकरणाची प्राचीन परंपरा जाणून घेण्यासाठी हे ग्रंथ मोठी मदत करतात. तसेच वैदिक संहितांचे स्वरूप व पाठ जसेच्या तसे ठेवण्यातही त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
संदर्भ : १.अभ्यंकर, का. वा., श्रीमद्भगवत्पतञ्जलिकृत व्याकरणमहाभाष्य (मराठी अनुवादा सह . प्रस्तावना खण्ड.भाग ७), संस्कृत विद्या परिसंस्थान,पुणे,२००६. २. Abhyankar, K.V., A Dictionary of Sanskrit Grammar,Oriental Institute,Vadodara.
KEYWORDS : #Vedaśhākhā, #Padapāţha, #VaidikaVyākaraņa, #Pārşada