हटीअन मूळ असणारी एक हिटाइट देवता. ही देवता नेहमी इस्तुस्तया या देवतेसोबत कायम गणली जाते. ह्या दोन्ही देवता हिटाइट मिथकांमध्ये ‘नियतीच्या देवता’ मानल्या जातात. मर्त्यांच्या‒माणसांच्या‒आयुष्याची दोरी सदैव फिरत ठेवण्याचे काम या देवतांचे असते. विशेषतः राजांच्या नियतीवर ह्यांचे बारीक लक्ष असते. त्यांचे वास्तव्य हे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असते. त्यांनी केवळ तेलिपिनूच्या परतीनंतर देवांच्या परिषदेमध्ये सहभाग घेण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील आपला मुक्काम सोडला होता, असे हिटाइट मिथकांनुसार सांगितले जाते. हिटाइट लोक दोन्ही देवतांना एकत्रितपणे ‘ग्युल्स’ म्हणतात, तर हरिकेन्स लोक ‘ह्युटेना’ या नावाने संबोधतात. प्राचीन ग्रीकांनी या जोड गोळीमध्ये आणखी एकाची भर घातली आणि त्यांना एकत्रितपणे ‘मोरे’ असे म्हणू लागले.
संदर्भ :
- https://www.ling.upenn.edu/~rnoyer/courses/51/BryceHittiteSociety.pdf
समीक्षण : शकुंतला गावडे