हस्तलिखित नोंदणी : हस्तलिखित संग्रहात असणाऱ्या प्रत्येक हस्तलिखित ग्रंथाची नोंदणी करणे आवश्यक असते.या नोंदणीचा अभ्यासकास तर उपयोग होतोच पण त्याबरोबर हस्तलिखित संरक्षणासाठी देखील याची मदत होते. त्यासाठी नोंद अधिकाधिक सखोलआणि वस्तुनिष्ठ असणे आवश्यक आहे.हस्तलिखित ग्रंथांची नोंद दोन स्तरावर केली जाते. एक स्थानिक स्तरावर अर्थात् त्या-त्या संग्रहात आणि दुसरी राष्ट्रीय स्तरावर. प्रथमतः संग्रहाच्या ठिकाणी नोंदवही अथवा आधुनिक संगणकीय प्रणालीच्या मदतीने सूची करून नंतर राष्ट्रीयसूचीत त्यांचा समावेश केला जातो.भारत सरकारच्या राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन या प्रकल्पांतर्गत हस्तलिखित ग्रंथांची नोंदणी केली जाते.स्थानिक पातळीवर सूची करण्याच्या सोयीनुसार निरनिराळ्या पद्धती आहेत, तर राष्ट्रीयस्तरावर एकाच पद्धतीत नोंदणी केली जाते.नोंदणीचे उद्देश संग्रहांर्तगत नोंदणीचा उद्देश असतो की, आपल्या संग्रहात किती, कोणती, कशी हस्तलिखिते आहेत, ती कुठे ठेवली आहेत, हे समजावे आणि अभ्यासकांना ती सहज उपलब्ध व्हावीत.राष्ट्रीय पातळीवरील नोंदणीचा उद्देश देशात कुठे, किती, आणि कोणती हस्तलिखिते आहेत याची माहिती ठेवणे हा असतो.
नोंदणीचे घटक : हस्तलिखितांची नोंदणी करत असतांना साधारण घटक सारखेच असतात; परंतु त्यात आवश्यकतेनुसार काही घटक कमी अथवा जास्त असू शकतात. हस्तलिखित ग्रंथावर जी माहिती उपलब्ध आहे तीच नोंदवली जाते. जिचा उल्लेख नाही ते नोंदवले जात नाही, जर इतर जास्तीची माहिती नोंदणी करणाऱ्याला माहित असेल तर ते शेवटी टिप्पणी म्हणून लिहिले जाते.खालील घटकांपैकी शेवटचे तीन घटक हे फक्त विवरणात्मक सूचीमध्ये आढळतात. संग्रहांतर्गत नोंदणीत पुढील नोंदी केल्या जातात.
- क्रमांक – संग्रहात हस्तलिखिते ज्या क्रमाने दाखल होतात तो एक मुख्य क्रमांक हस्तलिखिताला देतात आणि त्यानंतर ते ज्या गठ्यात किंवा कपाटात ठेवले असेल तो क्रमांक दिला जातो.हस्तलिखितांना विषयानुरूप अथवा संग्रहानुरूप असे क्रमांक दिले जातात.
- विषय/ उपविषय– संशोधकांसाठी आणि संशोधित आवृत्तींच्या निर्मितीसाठी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. भारतीय हस्तलिखितांमध्ये साधारणतः वेद-संहिता, ब्राह्मणग्रंथ, वेदांग, कर्मकांड, पुराण, काव्य, स्तोत्रवाङ्मय, तत्वज्ञान, इतिहास आणि इतर शास्त्र इत्यादी विषयांचा समावेश होतो, त्यात विविध उपविषय देखील आहेत, त्यांची नोंद करणे आवश्यक असते.
- ग्रंथनाम–हस्तलिखित ग्रंथावर असलेलेच नाव सूचीत लिहिले जाते.हस्तलिखिताला इतर नाव असल्यास तेही नोंदवले जाते.ग्रंथाच्या पहिल्या किंवा शेवटच्या पानावर,अध्याय समाप्तीच्या वेळी अथवा ग्रंथाच्या शेवटी ग्रंथाचे नाव लिहिलेले असते.
- रचनाकार –ग्रंथाची रचना ज्याने केली त्याचे नाव. साधारणतः अध्याय अथवा ग्रंथ समाप्तीच्या ठिकाणी रचनाकाराचे नाव लिहिलेले असते.
- टीका –ग्रंथावर काही टीका असल्यास त्याचे नाव. काही ग्रंथांवर एकपेक्षा अधिक टीकाही असू शकतात, त्या सर्वांची नोंद केली जाते.
- टीकाकार – ज्याने टीका लिहिली आहे त्या टीकाकाराचे नाव नोंदवले जाते.
- भाषा/लिपी– हस्तलिखिताची भाषा आणि लिपी सूचीमध्ये नोंदवणे आवश्यक असते.
- लेखनिक – ज्याने हस्तलिखित लिहिले आहे त्याचे नाव. साधारणतः लेखनिकाचे नाव हस्तलिखिताच्या शेवटी आढळते.प्रत्येक हस्तलिखितामध्ये याचा उल्लेख असेलच असे नाही.
- काळ – हस्तलिखित जेव्हा लिहिले गेले तो काळ लेखनिकाने शेवटी लिहिलेला असतो. यात शालिवाहन शक, विक्रम संवत, संवत्सर, महिना, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र यांचा समावेश असतो. प्रत्येक हस्तलिखितामध्ये याचा उल्लेख असेलच असे नाही.
- पत्रसंख्या – हस्तलिखित ग्रंथांची पत्र सुटी असतात. पाठपोट मिळून एक पत्र होते. हस्तलिखितांवर पत्रक्रमांक लिहिण्याची पद्धत असते. पानक्रमांक क्वचित आढळतो. यातील काही पत्र हरवलेली असतील तर तेही नोंदवले जाते.
- पूर्ण/अपूर्ण- हस्तलिखिताचा शेवट उपलब्ध असेल तरच त्या हस्तलिखिताला पूर्ण म्हणतात, शेवट उपलब्ध नसेल तर ते अपूर्ण हस्तलिखित मानले जाते.
- चित्र –हस्तलिखितात चित्र किती आणि कोणती आहेत, ते सूचीत नोंदवले जाते.
- प्रकार –हस्तलिखित कागद, भूर्जपत्र, ताडपत्र, कागद, कातडीयापैकी कशावर लिहिले आहे ते नोंदवले जाते.
- आकार –हस्तलिखिताची लांबी, रुंदी आणि जाडी मोजून लिहिले जाते. शक्यतो हे सेंटीमीटर या एककात मोजले जाते.
- स्थिती –हस्तलिखित चांगले आहे किंवा खराब झाले आहे ते नोंदवणे आवश्यक असते.
- टिप्पणी/ वैशिष्ट्य– वरील घटकांव्यतिरिक्त इतर काही माहिती आवश्यक वाटल्यास त्याविषयी लिहिले जाते.
- प्रकाशित/अप्रकाशित–यावरून हस्तलिखिताची दुर्मिळता लक्षात येते.
- पहिली ओळ –विवरणात्मक सूचीत हस्तलिखिताची सुरवातीची ओळ लिहिली जाते.
- शेवटची ओळ –विवरणात्मक सूचीत हस्तलिखिताची शेवटची ओळ लिहिली जाते.
नोंदणीच्या पद्धती – स्थानिक पातळीवर नोंदणी करण्याच्या पद्धती-
- दाखल अंक सूची (Accession Register)– ज्या क्रमाने संग्रहात हस्तलिखिते दाखल होतात त्या क्रमाने त्याची सूची केली जाते.
- स्थान सूची (Location Register)–कोणते हस्तलिखित कोठे ठेवले आहे, हे या सूचीच्या आधारे समजते, आणि त्यामुळे संग्रहातील हस्तलिखित जलद शोधण्यास मदत होते. या सूचीबरोबर संग्रहाचा नकाशा असणे योग्य ठरते.
- स्थिती वृत्तसूची (condition Report)–ही सूची म्हणजे हस्तलिखित कोणत्या स्थितीत आहे त्यात असणारे दोष हे सांगणारा अहवाल. या अहवालाबरोबर छायाचित्रे असणे आवश्यक आहे.हस्तलिखित जतनासाठी निर्णय घेतांना याची मदत होते.
- महत्त्वाच्या हस्तलिखितांची सूची (Priority Register)– संग्रहात असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि ज्यांची अधिक काळजी घेतली पाहिजे अश्या हस्तलिखितांची सूची. आपत्ती व्यवस्थापनात या सूचीचा अतिशय उपयोग होतो. शक्यतो ही सूची गोपनीय असावी.
- प्रदर्शन सूची (Exhibition Register)– प्रदर्शनात लावलेल्या हस्तलिखितांची ही यादी असते, यात तात्पुरते आणि कायमस्वरूपी प्रदर्शित असे दोन्ही प्रकार असतात.
- आवक-जावक सूची(Inward-Outward)– फोटोकॉपी, झेरॉक्स, मायक्रोफिल्म, जतन अथवा अन्य कोणत्याही कारणासाठी संग्रहातून हस्तलिखित बाहेर पाठवले जाते तेव्हा आणि तेथून परत आल्यावर त्याची नोंद करणे आवश्यक असते.
- विषयवार सूची (Classified Catalogue)– संग्रहात कोणत्या विषयाचे किती ग्रंथ आहेत त्याची नोंद केली जाते. ही सूची अभ्यासक,संशोधक आणि विविध संशोधनप्रकल्प यासाठी सहाय्यभूत होते.
- वर्णानुक्रम सूची (Alphabetical Index)–हस्तलिखितांच्या नावाच्या पहिल्या वर्णानुक्रमाने सूची केली जाते.वाचकांना हस्तलिखिते शोधण्यासाठी या सूचीचा उपयोग होतो.
- त्रैवार्षिक सूची (Triennial)–संग्रहात दर तीन वर्षांनी दाखल होणाऱ्या हस्तलिखितांची सूची केली जाते.
- विवरणात्मक सूची (Descriptive)–संग्रहातील प्रत्येक हस्तलिखिताविषयी सविस्तर माहिती यात असते.
- वाचक सूची (User Index) – संग्रहाला भेट देणाऱ्या वाचकांची सूची.यात त्यांच्या नावाबरोबर संपर्काचा पत्ता, फोन अथवा मोबाईल क्रमांक असतो. संग्रहाला भेट देणाऱ्या वाचकांमध्ये विविध विषयांचे तज्ज्ञ असतात, काही वाचक व्यवस्थापनासाठी आपुलकीने मदत करू शकतात, विविध प्रकल्पांमध्ये या व्यक्ती प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहाय्य करू शकतात. आपत्काली त्यांची मदत घेता येते. कायदेशीर दृष्ट्याही या सूचीला महत्त्व असते.
- राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्याची पद्धती – भारत सरकारच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन या प्रकल्पांतर्गत भारतभर हस्तलिखित स्त्रोत आणि जतन केंद्राची साखळी उभी केली आहे. त्यात ‘MANUS DATA’ या नावाने एक डाटाशीट तयार केलेले आहे, त्यात प्रत्येक हस्तलिखिताची माहिती भरली जाते. राज्यभरातील केंद्रात त्या-त्या ठिकाणच्या हस्तलिखितांची माहिती गोळा करून राष्ट्रीय स्तरावर पाठवली जाते. राष्ट्रीयपातळीवर संकलित झालेली माहिती www.namami.org या संकेत स्थळावर टाकली जाते. त्याच्या उपयोग सर्व ठिकाणच्या अभ्यासकांना होतो.
संदर्भ : बापट श्रीनंद, जपून ठेवा आपुला ठेवा,भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २००५.
समीक्षक : निर्मला कुलकर्णी