मंडळाची स्थापना : प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधासाठी, तसेच पर्यावरणाची आरोग्यप्रतदा टिकविण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची (राज्य मंडळाची) स्थापना झाली आहे. जल अधिनियम १९७४च्या कलम ४ अन्वये आणि हवा अधिनियम १९८१च्या कलम ५ अंतर्गत राज्य मंडळ घटीत झाले आहे. राज्य मंडळास स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. राज्य मंडळास तसेच राज्य मंडळाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.
मंडळाची सदस्यसंख्या : या मंडळात जास्तीत जास्त १७ सदस्य असतात. या सर्व सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारतर्फे केली जाते. त्यांची सदस्यसंख्या, कामाचे स्वरूप व विषेश माहिती खालील कोष्टकात दिली आहे :
सदस्यसंख्या | कामाचे स्वरूप | विषेश माहिती |
१ (एक) | पूर्णवेळ/अंशवेळ | अध्यक्ष |
जास्तीत जास्त ५ | प्रतिनिधी | राज्य शासनाचे प्रतिनिधी |
जास्तीत जास्त ५ | प्रतिनिधी | राज्यात कार्यरत असलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी |
जास्तीत जास्त ३ | प्रतिनिधी | कृषी, मत्स्य व इतर उद्योगधंद्यांचे प्रतिनिधित्व करणारे |
जास्तीत जास्त २ | प्रतिनिधी | राज्य सरकारच्या कंपन्या किंवा निगमांचे प्रतिनिधित्व करणारे |
१ (एक) | पूर्णवेळ | सदस्यसचिव, भारतीय प्रशासकीय सेवेतील विशेष अर्हताप्राप्त अधिकाऱ्याची नेमणूक |
राज्य मंडळातील सदस्यांचा राजीनामा, अपात्रता, इत्यादींबाबतचा तपशील जल, हवा अधिनियमात नमूद केला आहे.
मंडळाची बैठक : राज्य मंडळाची बैठक तीन महिन्यातून किमान एकदातरी घ्यावयाची असते.
समिती घटीत करणे आणि तज्ज्ञांची नेमणूक करणे : राज्य मंडळास त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे विशिष्ट प्रयोजनांसाठी समिती घटीत करण्याचे अधिकार आहेत तसेच विशिष्ट प्रयोजनांसाठी तज्ज्ञांना केंद्रीय मंडळाशी तात्पुरते सहयोगी करून घेता येते.
मंडळाचे अधिकार व कार्य :
- व्यापक कार्यक्रम तयार करणे व त्याची अंमलबजावणी करून घेणे : राज्यातील प्रवाह आणि विहिरी यांतील पाण्याच्या प्रदूषणास तसेच हवा प्रदूषणास प्रतिबंध करणे, त्याचे नियंत्रण करणे किंवा ते कमी करणे यासाठी व्यापक कार्यक्रम तयार करणे व त्याची अंमलबजावणी करून घेणे.
- राज्य शासनाला सल्ला देणे : जल प्रदूषणास तसेच हवा प्रदूषणास प्रतिबंध, नियंत्रण किंवा ते कमी करणे याच्याशी संबंधित कोणत्याही बाबीवर राज्य शासनाला सल्ला देणे.
- प्रदूषणासंबंधीची माहिती गोळा करणे व तिचा प्रसार करणे : जल प्रदूषण व हवा प्रदूषण प्रतिबंध, त्याचे नियंत्रण किंवा ते कमी करणे यांसंबंधीची माहिती गोळा करणे व तिचा प्रसार करणे.
- जल प्रदूषणास प्रतिबंधास संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे : जल प्रदूषण व जल प्रदूषणास प्रतिबंध, त्याचे नियंत्रण किंवा ते कमी करणे यांसंबंधात अन्वेषण व संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे, ते पार पाडणे आणि त्यात सहभागी होणे.
- निःसृते यांचा शेतीसाठी वापर करण्याच्या पद्धती विकसित करणे : मल प्रवाह आणि सुयोग्य अशी धंद्यातील निःसृते यांचा शेतीसाठी वापर करण्याच्या पद्धती विकसित करणे.
- प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या प्रक्रिया व प्रदूषकांच्या पातळीच्या मर्यादा निश्चित करून देणे : कारखान्यातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या जल व वायू स्रोतांच्या प्रदूषण नियंत्रणाबाबतच्या प्रक्रिया व प्रदूषकांच्या पातळीच्या मर्यादा कायद्याप्रमाणे निश्चित करून देणे व त्यांची अंमलबजावणी करून घेणे.
- हवा प्रदूषणाच्या निःसारणासंबंधी मानके ठरवून देणे : केंद्रीय मंडळाशी विचारविनिमय करून आणि हवेच्या दर्जासंबंधी केंद्रीय मंडळाने ठरवून दिलेली मानके लक्षात घेऊन, औद्योगिक संयंत्रे व स्वयंचलित वाहने यांपासून वातावरणात होणाऱ्या उत्सर्जनासंबंधी अथवा जहाज किंवा विमान वगळता कोणत्याही इतर साधनांपासून वातावरणात होणाऱ्या कोणत्याही हवा प्रदूषणाच्या निःसारणासंबंधी मानके ठरवून देणे.
पर्यावरण अधिनियम–१९८६च्या अंतर्गत नियमावली आणि अधिसूचनांच्या अंमलबजावणीचे अधिकार : जल अधिनियम, १९७४ आणि हवा अधिनियम, १९८१ अंतर्गत राज्य मंडळाची स्थापना झाली आहे. परंतु पर्यावरण (संरक्षण) अधिनियम–१९८६च्या अंतर्गत, सर्वंकष पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने, घनकचरा व्यवस्थापन नियमावली–२०१६, महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियमावली–२०००, घातक कचरा व्यवस्थापन नियमावली–२०१६, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमावली–२०१६, प्लास्टिक कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियमावली–२०१६, ई-कचरा व्यवस्थापन नियमावली–२०१६, फ्लाय ॲश अधिसूचना–१९९९, ध्वनी प्रदूषण नियमावली–२००० इत्यादी विविध नियमावली व अधिसूचना अधिनियमित करण्यात आल्या आहेत. या विविध नियमावली आणि अधिसूचनांच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्य मंडळास दिलेले आहेत.
राज्य सरकारला राज्य मंडळास निदेश देण्याचे आणि निष्प्रभावी करण्याचे अधिकार : राज्य सरकारला राज्य मंडळास निदेश देण्याचे विशेष अधिकार आहेत. तसेच राज्य मंडळास निष्प्रभावी करण्याचे अधिकारही राज्य सरकारला आहेत.
संदर्भ :
- टिपणीस, आर. आर. पर्यावरण कायदे, पुणे, २०१६.
- cpcb.nic.in
- mpcb.gov.in
- mondaq.com
- youarticlelibrary.com
समीक्षक : स्वाती कुलकर्णी