उपनिषदे, बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे, व भगवद्गीता यांना वेदान्ताची ‘प्रस्थानत्रयी’ मानले जाते. सारा वेदान्तविचार या प्रस्थानत्रयीवर आधारलेला आहे. प्रस्थान याचा अर्थ ‘उगमस्थान’ अथवा ‘आधारभूत ग्रंथ’ असा होतो. वेदान्त आचार्यांनी आपले सिद्धांत मांडण्यासाठी व प्रस्थापित करण्यासाठी प्रस्थानत्रयींवर भाष्ये (स्पष्टीकरणे) लिहिलेली आहेत. भगवद्गीता जरी प्राचीन असली, तरी आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीचे तीवरील भाष्य आज उपलब्ध नाही. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील श्लोकांवर तसेच दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या दहा श्लोकांवर आचार्यांचे भाष्य नाही. दहाव्या श्लोकानंतर आचार्यांच्या भाष्यास प्रांरभ होतो.
शंकराचार्यांनी (इ.स. ७८८—८२०) पूर्वपक्ष, उत्तरपक्ष अशा संवादरूपाने विवेचन केले आहे व केवलाद्वैतसिद्धान्ताचे प्रतिपादन केले आहे. ज्ञान व कर्म यांचा समुच्चय गीतेत सांगितलेला नसून, कर्म गौण असून, कर्मसंन्यासपूर्वक ज्ञानानेच मोक्ष मिळतो हा शांकरसंप्रदायाचा सिद्धान्तच भगवंतांनी गीतेत अर्जुनास उपदेशिला आहे, असे त्यांचे मत आहे.
शंकराचार्यांनंतर त्यांच्या संप्रदायाचे अनुयायी मधुसूदनसरस्वती (ग्रंथ−गूढार्थदीपिका), श्रीधर (सुबोधिनी), आनंदगिरी आदी गीतेचे अनेक टीकाकार झाले. त्यांनी मुख्यत्वे आचार्यांचेच अनुकरण केले आहे.
भगवद्गीतेवरील ‘पैशाचभाष्य’ हे कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचे नसून स्वतंत्र असे भाष्य आहे. ते हनुमानाने म्हणजे मारुतीने लिहिले आहे, असे परंपरा मानते. कुरुक्षेत्रावर हनुमान अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर प्रतिष्ठित होता. त्यामुळे सर्वप्रथम भगवद्गीता त्याने ऐकली त्यानंतर भगवंताच्या आज्ञेवरून त्याने पिशाचाचे रूप धारण करून हे भाष्य लिहिले, अशी आख्यायिका आहे. परंतु काही विद्वानांच्या मते भागवतावरील टीकाकार हनुमान पंडितानेच हे भाष्य पैशाची भाषेत शंकराचार्यांचे भाष्य डोळ्यासमोर ठेऊन लिहिले आहे.
शंकराचार्यांनंतर सुमारे अडीचशे वर्षांनी रामानुजाचार्यांनी (इ.स. १०१७—११३७) विशिष्टाद्वैत संप्रदाय स्थापित केला. तो सिद्ध करण्यासाठी त्यांनीही स्वतंत्र भाष्ये लिहिली आहेत. त्यांच्यापूर्वी त्यांचे गुरू यामुनाचार्य यांनी ३२ कडव्यांची गीताअर्थसंग्रह नावाची टीका लिहिली होती आणि त्यावर वेदांतदेशिक यांनी गीतार्थ-संग्रह-रक्षा लिहिली. रामानुजांचे गीताभाष्य आणि त्यावर त्यांचे शिष्य वेदांतदेशिक यांनी तात्पर्यचन्द्रिका ही टीका लिहिली आहे. गीतेमध्ये ज्ञान, कर्म व भक्ती यांचे वर्णन असले, तरी तत्त्वज्ञानदृष्ट्या विशिष्टाद्वैत व आचरणदृष्ट्या वासुदेवभक्ती हेच गीतेचे सार आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
रामानुजांनंतर द्वैत संप्रदायाचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य उर्फ श्रीरामानंदतीर्थ (इ.स.सु. ११९९—सु. १२७८) यांची प्रस्थानत्रयींवर अर्थात गीतेवर (भगवद्गीता-तात्पर्य-निर्णय) सुद्धा भाष्ये आहेत. त्यातून ती द्वैतमत प्रतिपादक आहेत, हे दाखवितात. त्यांच्या गीताभाष्यावर त्यांचे शिष्य जयतीर्थ यांनी प्रमेयदीपिका ही टीका लिहिली. त्यांच्या मते निष्काम कर्माची महती गीतेत जरी गायली असली, तरी निष्काम कर्म हे साधन असून भक्ती ही अखेरची निष्ठा आहे. भक्ती सिद्ध झाल्यावर कर्माचरण केले किंवा नाही केले तरी त्यांत काही विशेष नाही, असे त्यांचे मत आहे.
शंकराचार्य, रामानुजाचार्य व मध्वाचार्य यांच्या सिद्धान्तांचा अभ्यास करून व्यंकटनाथ यांनी ब्रह्मानंदगिरीव्याख्या नावाचे स्वतंत्र भाष्य रचले. त्यांचे मत केवलाद्वैताकडे झुकलेले आहे, तरीही ठिकठिकाणी स्वत:चे स्वतंत्र व भिन्न मत त्यांनी मांडले आहे. त्यांनी दहाव्या अध्यायातील भगवंताच्या विभूतींवर भाष्य केलेले नाही; कारण त्या समजण्यास सुलभ असून पूर्वसूरींनी आधीच त्या स्पष्ट केल्या आहेत.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत गीतेच्या १८ अध्यायांपैकी पहिल्या चारांत कर्म, दुसऱ्या सातांत उपासना आणि पुढील अध्यायांत ज्ञान प्रतिपादित केले आहे, असे म्हटले असून आपण आपली टीका भावार्थदीपिका भाष्यकारांते वाट पुसत रचली आहे, असे स्वत:च्या ग्रंथाच्या अखेरीस म्हटले आहे.
राधाकृष्णभक्तिपर निंबार्काचार्य (तेरावे शतक) यांचा ‘द्वैताद्वैत’ किंवा ‘भेदाभेद’ नावाचा वैष्णव संप्रदाय आहे. त्यांनीसुद्धा भगवद्गीतेवर भगवद्गीताभाष्य तसेच ब्रह्मसूत्रावर वेदान्तपारिजातसौरभ नावाची टीका लिहिली आहे. निंबार्काचार्यांचे शिष्य श्रीनिवासाचार्य यांचे ब्रह्मसूत्रांवरील वेदान्तकौस्तुभभाष्य प्रसिद्ध आहे.
वैष्णवांचा तिसरा महत्त्वाचा संप्रदाय ‘शुद्धाद्वैत’ असून त्याचा पाया वल्लभाचार्यांनी (इ.स. १४७९—१५०१) रचला. त्यांनी भगवद्गीता व उपनिषद यांवर भाष्य लिहिलेले नसून ब्रह्मसूत्राच्या केवळ तिसऱ्या अध्यायावर अणुभाष्य लिहिले आहे. त्यांचे भगवद्गीतेवरील मत तत्त्वार्थदीप अथवा तत्त्वदीप या निबंधावरून कळते. या संप्रदायास ‘पुष्टिमार्ग’, शुद्धाद्वैती इत्यादी म्हणण्याचा प्रघात आहे. त्यांच्या मते ज्याअर्थी सांख्यज्ञान व कर्मयोग सांगून नंतर भगवंतांनी अर्जुनास भक्त्यमृत पाजून कृतकृत्य केले, त्याअर्थी निवृत्तीपर पुष्टिमार्गीय भक्ती हेच गीतेचे तात्पर्य होय.
या संप्रदायातील केशव काश्मीरीभट्टाचार्य यांनी भगवद्गीतेवर तत्त्वप्रकाशिका नावाची टीका लिहिली आहे. ज्यात गीतार्थ याच संप्रदायास अनुकूल आहे, असे दर्शविले आहे. अद्वैत संप्रदायातील मायामिथ्यात्व व कर्मत्यागावश्यकता हे सिद्धान्त या पंथात ग्राह्य धरले जातात. परंतु ब्रह्मात्मैक्यरूप मोक्ष प्राप्तीसाठी ‘भक्तीला’ अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. श्रीधरस्वामींनी आपल्या सुबोधिनी टीकेमध्ये गीतेचे जे तात्पर्य काढले आहे, ते याच प्रकारचे आहे.
संदर्भ :
- Jhabwala, S. H. Gita and its Commentators, Bombay, 1991.
- Sandhale, Shastri Gajanana Shambhu Ed. The Bhagavad Gita with Eleven Commentaries, vol.1, Bombay, 1935.
- टिळक, बाळ गंगाधर, श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, खंड १, कोल्हापूर, २०१३.
- देवधर, स. कृ. श्रीमत् आद्य शंकराचार्य विरचित श्रीमद्भगवद्गीता भाष्यम्, भाग १-२, पुणे, २००३.
समीक्षक : कांचन मांडे