कॅथरिन द ग्रेट : (२ मे १७२९— ६ नोव्हेंबर १७९६). रशियाची एक प्रसिद्ध सम्राज्ञी. श्टेटीन (प्रशिया) येथे एका उमराव घराण्यात जन्मली. तिचे पाळण्यातील नाव सोफिया ऑगस्टा फ्रेडेरीका होते. तिचे १७४५ मध्ये रशियाच्या तिसऱ्या पीटरशी लग्न झाले.
पीटर दुर्व्यसनी, कुरूप व रशियन लोकांचा तिरस्कार करणारा होता, म्हणून २८ जून १७६२ मध्ये तो गादीवर येताच, सरदार व लष्करी अधिकाऱ्यांनी कॅथरिनच्या साहाय्याने उठाव केला आणि पीटरला वारस म्हणून अपात्र ठरवून कॅथरिनला सम्राज्ञीपद दिले. तिने १७६२ ते १७९६ ह्या काळात देशाची सर्वांगीण उन्नती केली. तिने आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाचे स्थान उंचाविले. पोलंडचे विभाजन घडवून आणून (१७७२, १७९३ व १७९५) काही रशियन भाषिक प्रदेश मिळविले व तुर्कस्तानला विरोध करून काळ्या समुद्रावरील आपला हक्क प्रस्थापित केला. पुढे ऑस्ट्रिया व प्रशिया ह्यांत तिच्यामुळे ट्येशीनचा तह झाला.
रशियातील अंतर्गत कारभाराच्या सोयीसाठी तिने देशाचे लहान लहान विभाग पाडले. बँकेची स्थापना करून तिने व्यापारास उत्तेजन दिले. वैद्यकीय सुखसोयी व शिक्षणाचा प्रसार ह्या दृष्टीने तिची कारकिर्द महत्त्वाची समजली जाते. तिने खासगी मुद्रणव्यवसायास स्वातंत्र्य दिले व परकीय भाषेतील ग्रंथांचे अनुवाद रशियन भाषेत व्हावेत म्हणून प्रोत्साहन व अनुदान दिले. तिने आपल्या आठवणींशिवाय, नाटके व इतर विषयांवर विपुल लेखन केले आहे.
कॅथरिन एक महत्त्वाकांक्षी, मुत्सद्दी व देखणी स्त्री होती. सम्राज्ञीपदासाठी तिने रशियन भाषा व ग्रीक चर्च ह्यांचा अनुक्रमे अभ्यास व स्वीकार केला. तिचे आचरण नीतिबाह्य होते व तिला अनेक प्रियकर होते. त्यांपैकी बहुतेकांचा तिने आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घेतला. ती रशियात झार्को सेलो ह्या ठिकाणी ६७ व्या वर्षी मरण पावली
संदर्भ :
- Grey, Ian, Catherine The Great, Philadelphia, 1962.
- Thomson, G. S. Catherine The Great and the Expansion of Russia, New York, 1950.